रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

संताचे दर्शने








 





 


संताचे दर्शने सुखावले मन

घडले साधन काही एक ||

संतांचे संगती कळले उपाय

चुकलेले पाय सावरले  ||

संतांचे भाषण हळूच फुंकर

पोळले जिव्हार शांत झाले ||

संतांचे चरणी  लागला विक्रांत

हरवला पथ दिसू आला  ||




डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

माझे शब्द....








माझे शब्द कळोत कुणा
असे मागणे नाही माझे
माझे शब्द रुजोत मना
असे सांगणे नाही माझे

वाहणारे हे शब्द माझे
झऱ्या वाऱ्या मधील गाणे
कळल्याविन क्षितिजाचे
रंगामध्ये उधळून जाणे

होते वहीत कितीक वर्ष
हव्यासावाचून निजलेले
तसेच आता मित्रासंगती
गळा भेटून निवलेले

शब्द उमटले शब्दासाठी
पोटातून या ओठावरती
हवे नकोचा प्रांत सोडून
जगण्या अर्थ देण्यासाठी

मी माझा विक्रांत हा शब्द
पाहतो आता शब्दावाचून
जाणला अन अर्थ वाटतो
ओळी मधल्या जागेमधून

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

काष्ठ शिरी वाहतांना






वेदनेविन वेदना
अनवाणी पाऊलांना
गिळूनिया दु:चाले
जीवन समरांगणा

सृजन गीत कोवळे '
वक्षावरी अंकुरले
पेटले आकाश उग्र  
तनमन जळू गेले

काष्ठ शिरी वाहतांना
जन्म जणू काष्ठ झाला  
बंदिवान दो कुसात
जन्म आला अन गेला
 
गाडली नजर पथी  
जीवन साथी मानला
श्वेदी भिजुनी लाखदा
सदा कोरडा राहीला  

भार खांदी  घेऊनि
श्वास गेला थकुनी
चालायचे दूर अन
पेटणे चूल अजूनी

खुडलेला  जन्म तिचा
गंध कळल्या वाचुनी
का असे अर्थावाचुनी
धावते जीवन अजुनी

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...