शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

माझे शब्द....








माझे शब्द कळोत कुणा
असे मागणे नाही माझे
माझे शब्द रुजोत मना
असे सांगणे नाही माझे

वाहणारे हे शब्द माझे
झऱ्या वाऱ्या मधील गाणे
कळल्याविन क्षितिजाचे
रंगामध्ये उधळून जाणे

होते वहीत कितीक वर्ष
हव्यासावाचून निजलेले
तसेच आता मित्रासंगती
गळा भेटून निवलेले

शब्द उमटले शब्दासाठी
पोटातून या ओठावरती
हवे नकोचा प्रांत सोडून
जगण्या अर्थ देण्यासाठी

मी माझा विक्रांत हा शब्द
पाहतो आता शब्दावाचून
जाणला अन अर्थ वाटतो
ओळी मधल्या जागेमधून

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

काष्ठ शिरी वाहतांना






वेदनेविन वेदना
अनवाणी पाऊलांना
गिळूनिया दु:चाले
जीवन समरांगणा

सृजन गीत कोवळे '
वक्षावरी अंकुरले
पेटले आकाश उग्र  
तनमन जळू गेले

काष्ठ शिरी वाहतांना
जन्म जणू काष्ठ झाला  
बंदिवान दो कुसात
जन्म आला अन गेला
 
गाडली नजर पथी  
जीवन साथी मानला
श्वेदी भिजुनी लाखदा
सदा कोरडा राहीला  

भार खांदी  घेऊनि
श्वास गेला थकुनी
चालायचे दूर अन
पेटणे चूल अजूनी

खुडलेला  जन्म तिचा
गंध कळल्या वाचुनी
का असे अर्थावाचुनी
धावते जीवन अजुनी

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

देवाच्या गावाला






कैसी व्हावी कृपा मज दीनावर
देव दिगंबर पहावा मी ||
कैसा कानी पडे दृढ नाभीकर
हात डोईवर वसावा तो ||
अखंड धुनीचा होवून सेवक
भजावा पावक तेजोराशी ||
कैसी विभूती ती लागेल या देही
देहासी विदेही करणारी ||
सुटेल बंधन सरेल संसार
राहीन अंतर दत्त पदी ||
विक्रांत निघाला देवाच्या गावाला
अंतरी वळला गूढ मार्ग ||


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...