शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

आदेश कानात








नाथ महाराज
करा माझे काज
सवे दत्त राज
रूप दावा ||

विरक्तीचा अंश
ओपुनी हृदयी
ओढूनिया घेई
पदावरी ||

अलख ओठात
निरंजन मनी
मुद्रा घाली कानी
पंथराज ||

मग मी दयाळा
तुझिया दाराला
बांधून जीवाला
राहीन रे ||

तुजला भजत   
काजाशी जगेन   
दुनिया पुजीन  
शिवरूपे ||

आदेश कानात
ओपा माझे नाथ
विक्रांत मनात
तळमळी ||



विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

संतसंग






केले दत्तराये उपकृत मला
संतसंग दिला मागितला ||
सत्संगाची राजे प्रभूचे प्रेमिक
भक्त अलौकिक भेटविले ||
एकटा उदास चालतांना वाट
गोकुळीचा थाट दावियला ||
ज्ञानाचे पुतळे ध्यानाचे पर्वत
भक्तीरूप व्यक्त सखे केले  ||
जीजी आलो आता माझ्या मी माहेरा
मिळाला निवारा जीवास या ||
आता मनोमळ सहज जाईल
पावेन निर्मळ निजरूप ||
सरो नाव गाव मागतो विक्रांत
संताच्या दारात जन्म जावो ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

प्रेत जळल्या नंतर ....





प्रेत जळले
स्मशान हलले  
लाकडी धुरात
जग पांगले  

गेले ते गेले
चला राहिले
याद करत 
बाटलीस भिडले

काय भरोसा
असे उद्याचा
चकना राहीला
आज तयाचा

गुण आठवत
कुणी रडले
कुणी उस्न्यावर
पाणी सोडले

काही तरी
हवाच होता                  
हा ही बहाणा
वाईट नव्हता

असेच कारण
होऊ आपण
मनोमनी ते
होते जाणून 
 
ती ही मग
जाणीव गेली
नशा दाटली
हवी असली

बोंब उसळली
का रे गेला
उगाच व्यर्थ
उरला कल्ला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...