शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

दत्त सापडत नाही





अजूनही दत्त
सापडत नाही
हरवलो मी ही
काय कुठे ||

भोगाचे गरळ
पिवून सकळ
निजली केवळ
जगदंबा ||

एकेक चक्रास  
लागले कुलूप
वाटता हुरूप
मावळला ||

भिकाऱ्यांच्या गर्दी
पांघरून डोई
याचक मी होई
पोटासाठी ||

तसे बरे आहे
गीत बित गाणे
नीज बरी येते
भजनात ||

शब्दी उंडारता
मानही वाढतो
दिलासा मिळतो
खोटानाटा ||

काढुनिया माळ
करी दत्त दत्त
चाललो गुत्यात
त्याच जुन्या ||

सुटला विक्रांत
वेडा होई पुन्हा
भूकेजाला तान्हा
दत्तासाठी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

मरण मागे होते



थकलेले हात अन
मरण मागे उभे होते
सांभाळण्यास सावरण्यास
फक्त तुझे नाव होते
अटळ अंत असूनहि  
भयाचे काहूर दाटे
अर्ध्या या डावाला
मन बिलगत होते
बाजुला अज्ञात चेहरे
जणू रुख निर्जीव होते,
कश्यासाठी धावणे
कुणासाठीआणि कुठे
पोहचलो ते ठाणे ही
रिते रिते होते ,
अगतिक पाय अन
आंबलेले रक्त होते
किती संभाळाशी दत्ता ,
कि हे हि तुझे एक नाटक होते

विक्रांत प्रभाकर
 http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

प्रकाश दाटता






अवघा प्रकाश दाटला कल्लोळ

दिशांना भोवळ अस्तित्वाची ||

नारायण नभी नारायण मनी

भरे कणोकणी दिव्य आभा ||

रंगांचे विभ्रम चाकाटले चित्त

सुवर्णाचा पोत जीवनाला ||

सरला अंधार गात्रात दाटला

डोळिया पाहीला दिव्यारूण ||

सरे कुतूहल सृष्टीचे सकळ

अनंत अपार निरंजन  ||

अंतर्बाह्य शुद्ध निजात्मज्योती

कापुराची वाती विक्रांत हा || 



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/




बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

एक झाड..





एक झाड अन चार फांद्या
असेच काही जगणे असते
लक्ष विखुरली गवत पाती
तरी कुणाशी नाते नसते  

सदैव आपल्या अवकाशात
अस्तित्वास असे टिकवणे
अन मुळाशी खोल खोलवर
ज्ञात अज्ञात ओल शोधणे

म्हटले तर छानच असते
हिरवी फांदी हिरवी पाने
अन कुणाची वाट पाहत
फुलाफुलातून असे बहरणे

दोन दिसांचा ऋतू नंतर
तिच धूळ माती वाहणे
जलकण आशा तहानलेली
सदैव उरात होरपळणे

एक वादळ पानापानात  
सर्वस्वाला व्यापून उरले
अन विजेची तार लखलख
ल्याया तनमन उत्सुकले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

|| गोरक्ष विभूती ||






जन्मास येताच 
गुरु बांधी गाठी
गोरक्ष विभूती
महाश्रेष्ठ ||

गुरुसेवा तप 
करुनी निर्मळ
ज्ञानाचे केवळ 
रूप होय ||


वैराग्ये प्रखर 
कर्तव्य तत्पर
झाला गुरुवर 
उतराई ||

गुरूदेवासाठी 
राम हनुमान
बाजूला सारून 
ठेवियले ||


मोहाचा सागर 
विषय आगर
स्त्रीराज्य सुंदर 
ठोकरले ||


कनकाची माती 
मातीचे कनक
मच्छिंद्रा कौतुक 
दाखविले ||


दत्त मानसीचा 
जाहला चकोर
दृष्टी पदावर
अहर्निशी  ||


विक्रांत पोथीत 
बुडाला प्रेमाने
गोरक्ष तेजाने 
सुखावला  ||




डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...