मंगळवार, १९ जुलै, २०१६

गुरुराय माया





अनंत हातांनी
अनंत रूपांनी
दिलेय मजला श्रीगुरुरायानी ||१||

माझ्या याचनेचा
माझ्या यातनेचा
अंत सहजच टाकला करुनी ||२||

कधी पदतळी  
काटे ही टोचली
परी थकता मी नेले उचलुनी ||३||

पाहणे रूपाला
हट्ट मी धरला  
घटोघटी होता परि तो लपुनी ||४||

कळलेच नाही
तेधवा जे काही 
जाणवे अवघे पाहता वळूनी ||५||

साऱ्या कामनांचा
स्वामी तो सुखाचा
सदा परी मज गेला ठकवूनी ||६||   

आता न मागतो
त्यालाच वाहतो
तन मन प्राण सारे ओवाळूनी ||७||

गिरनार राया
गुरुराय माया
पाहतो विक्रांत शरण जावूनी   ||८||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  













शुक्रवार, १५ जुलै, २०१६

दत्ता तुझी आस






दत्ता तुझी आस
लागली प्राणास
जाळतात श्वास
रात्रंदिन ||१

दत्ता तुझा भास
होतसे मनास
जीव हा उदास
तळमळे ||२

जावे गिरणारी
धावुनी माहुरी
वा गाणगापूरी
वाटे सदा ||३          

बघ इथे आता
जीव न रमतो
कासावीस होतो
तुजविन ||४

संसाराचे ओझे
वाही कसेबसे
पांघरून पिसे
लौकीकाचे ||५

काय तुज देणे
भक्ती अवघड
विक्रांत हा जड
आवडेना || ६

माऊलीच्या पोटी
राग बरा नाही
द्वाड लेकराही
पोटा धरी  ||७

आणि काय तुज
मागू सांग आई  
चरणासी घेई  
विक्रांता या ||८

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  

                  






मंगळवार, १२ जुलै, २०१६

वाटे वैकुंठाच्या जाता






वाटे वैकुंठाच्या जाता
मध्ये पंढरी साजरी
सवे ज्ञानदेव माझा
दाटे सुखाची उकळी

नसे हव्यास मोक्षाचा
आस स्वर्गीय लोकाची
दिव्य भरली भोवती
यात्रा चैतन्य रुपाची

कोण म्हणतो अभंग
कुठे वाजतो मृदंग
टाळ नादात नाचात
सवे सोबती श्रीरंग

मुक्त रांगड्या प्रेमाचा
ओघ वाहतो धबाबा
मुक्ता सोपान निवृत्ती
गळा तुकोबा चोखोबा

व्यर्थ लौकिक सरले
जीव शिवास भेटले
दत्त कृपेने विक्रांत
ऐसे ऐश्वर्य देखिले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  

         




         


रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...