रविवार, ८ मे, २०१६

स्वप्न पेटले






स्वप्न उदास उधार

भर रानात पेटले

कसे किती करू गोळा

प्राण देहास विटले



देव नभात असावा   

जणू अभ्राचा पसारा

पुण्य गंजले साचून

होय डोळ्यात निचरा



दहा दिशांनी गिळली

आस उरातली ओली

साद घालावी कुणाला

चहू बाजूला पोकळी



अश्या भयाण राती

घरी अंकुर फुटला

ओठ लाल ओलसर

जीव ओझ्याने वाकला



डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे



शनिवार, ७ मे, २०१६

बळ दत्तात्रेया






कशाला पाहिसी
बळ दत्तात्रेया
कारण भांडाया
देसी उगा

काय अहंकार
मनात पोसशी
उगाच घालसी
नरकात  

इवल्या जगाचे
इवले नाटक
चाले कटकट
रातंदिन

बांधी ओटीपोटी
तान्ह्या लेकरास
घेवून घरास
जाई आता

तुझिया प्रेमाची
उरावी तहान
जगण्या कारण
तूची एक

करावे विक्रांता
पुन्हा शून्य असा
तव प्रेम पिसा
दत्तराज

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/







गुरुवार, ५ मे, २०१६

तुझ्यासाठी दत्ता..







तुझ्यासाठी दत्ता
जन्म ओळगीन
जग हे सोडीन
आनंदाने ||
नको द्रव्यदारा
सुखाचा जोजार
इंद्रिया लाचार
करू नको  ||
तुझिया पदास
देवूनिया मिठी
पुनरपी उठी
घडो नये ||
जगाचा बाजार
चालो सुखनैव
सरूनिया धाव
मरो वृत्ती  ||
चालतो विक्रांत
तुजला शोधत
भक्तीचा मागत
एक कोर  ||

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...