सोमवार, ४ एप्रिल, २०१६

|| दीप ||



|| दीप ||

असा अंधार कोवळा
गात गात्रात पाझरे
दीप एकच बेडर
भल्या पात्रात लहरे

नच लागावी नजर
माय लपेटे पदर
बाळ डोकावते हळू
येई पुनव बहर

जाई दूरवर कुणी
भेट आता ती कसली
नाही निरोपात व्यथा
वाट पाऊली सजली

क्षण कातर उमले   
वाळू चांदव्यात ओली
किती युगांचा पिंपळ
नवी सळसळ बोली

जन्म देहाचे हे ओझे  
कधी कुणास कळले
धून अवधूत चाले 
ज्याचे त्यानीच पाहीले

विक्रांत प्रभाकर तिकोणे


गुरुवार, ३१ मार्च, २०१६

दत्ताच्या गावात





जगाचा बुडाडा
कळला कळला
फुटला मिटला
आपोआप  

मनाचिया वाटा
तुटल्या विझल्या
डोहात बुडाल्या
एकांतीच्या

अंधारात दीप
लवतो तेवतो
एकटा भिडतो
वादळाला  

मनस्वी जगणे
जनात वनात
नाही कश्यात
घालमेल

कळली जीवास
ठरली चाकोरी
मरण चाकोरी
काळ ओघी

दत्त नाचवितो
उगा इथे तिथे
सत्य गवसते
कणोकणी

विक्रांत जगात
राहतो मनात
दताच्या गावात
कौतुकाने  ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे








मंगळवार, २९ मार्च, २०१६

चाले पारायण




कुणाची ती वाट
पाहतोय कोण
मितीत दाटून
आपूलिया  ||

स्पर्शाचे अंतर 
स्पर्शल्या वाचून
नभाचे दालन
मिटलेले   ||

सजून धजून
जीवन नटून
उभे ओशाळून
कधीचेच ||

कधीचा चालला
पाषाण प्रवास
प्रतिक्षेचे घास
गिळूनिया ||

मातीवर माती
जन्म थरावर
अजून अंकुर
आशावादी ||

फडफड पानी
दुमदुमे कीर्ती
बुजल्या खणती
खाणाखुणा ||

चाले पारायण 
कळल्या वाचूनी
शब्दांची करणी
शब्द जाणो

मनाच्या अंगणी
विक्रांत अजुनी
हातात धरुनी
दत्तनाम ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, २७ मार्च, २०१६

ओल




जीवनाची कृपा
धबाबा कोसळे
अंतरी उसळे
लाट वेडी  ||

येते अन जाते
चित्र कुठलेसे
परी ज्ञात नसे
केव्हाचे ते ||

रंगांचे तुकडे
कपटे जोडले
डोळ्यात सजले
मिटूनही ||

संपेल चालले
स्वप्न लिहलेले
रक्तात दाटले
गूढ जग ||

किनाऱ्यास हट्टी
निग्रही पावुले
अनवाणी चाले
लाटासवे  ||

एका अर्थासाठी
जीवन कुरोंडी
करूनिया थडी
गेले पीर ||

कलकले काळ
धमण्यात ताल
आनंद कल्लोळ
कणोकणी ||

पहातो विक्रांत
अंतरात खोल
आदिम ती ओल
अजूनही ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २६ मार्च, २०१६

बॉस दु:ख



सांभाळू कसे या
सर्व शहाण्यांना
माझ्या डॉक्टरांना 
बुद्धिवान ||
गोल फिरवते 
मजला मेट्रन
हवे ते करून
खरे म्हणे ||
करी युनिअन
सदा दणादण
भांडण तंटण
ठरलेले ||
ऐकती न आज्ञा
करुनी बहाणा
तया सेवकांना
काय सांगू ||
म्हणतो साहेब
ऑफिस सांभाळ
त्यांना काळवेळ
पण नसे ||
धावतात रुग्ण
येतात कावून
सुरु ना अजून
ओपीडी का ||
व्यर्थ ते रिपोर्ट
जाती पुनपुन्हा
अर्थ त्याचा कुणा
कळेनाची||
कसल्या मिटींगा
जाणे फासावर
क्षुद्र सत्वसार
विसरून ||
येतो जातो कुणी
जड कार्पोरेटर
त्या तंबीवर
हसणे ते ||
काही झाले तरी
तुम्ही जबाबदार
सगळ्यांचा मार
खाणे पडे ||
सत्तेविन सत्ता
नको मज आता
करावी स्वहाता
सेवा बरी ||
दत्ता तुझे ओझे
तूच बा सांभाळ
मजला आभाळ
रिते हवे ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे



गुरुवार, २४ मार्च, २०१६

किती खोडकर दत्त




मागावया सांगे
करुनी बहाणा
आणि मग चुना
लावी कारे ||
साठवतो काही
पुण्याची गाठोडी
चोर गावी वस्ती
करवसी ||
पोटातली भूक
मनात कोरून
जिव्हेस सांगून
मजा पाही ||
भरे मग पोट
करतोस थाट
पक्वान्नाचे ताट
देई बळे  ||
किती खोडकर
दीनांचा दयाळू
जाणिला कृपाळू
विक्रांतने  ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे


प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...