बुधवार, २ मार्च, २०१६

दु:खे दाटुनिया दत्ता






दु:खे दाटुनिया दत्ता
जरी बरळलो काही
घाली अपराध पोटी
मज अन्य कुणी नाही

आहे मनच शेवटी
तुज सारेच माहिती
किती सांभाळू तयास
पुन्हा भरती ओहोटी

जरी माखलो पापाने
चित्त दुश्चित्त तापाने
सारे होईल निर्मळ
तुझ्या पावन कृपेने

दत्तनाम अमृताने   
सरते व्याधींचे करी
आलो शरण व्याकूळ
विक्रांता हृदयी धरी


विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

तया गाणगापुरी





कुणीतरी न्या हो मज तया गाणगापुरी
मूर्ती अदृष्य परी पद दाखवा ती गोजीरी ||
सुस्नास करुनी मी भीमा अमरजा तीरी
धन्य होईन प्रदक्षिणे तया पिंपळ उंबरी ||
चार घटिका कुंडाशी त्या पाराशी थांबुन
लीला चरित्र ते छान गुरु कौतुक आठवीन ||
भक्त सोयरे देखीन तया डोळ्यात साठवीन
भूमी पावित्र चुंबुन तेथ नतमस्तक होईन ||
तया पादुका वरी माझा जीव ओवाळीन
तया पालखीच्या भोई मी चरणी लोळीन ||
तया चैतन्य प्रवाही ऋणी याचक होईन
कण विभुती होत अवघा जन्म हा देईन ||
कली असुनी जन्म ब्रह्मपदासी मिरवीन
अर्थ ऐसा मी माझ्या भक्तीने बदलीन ||
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

श्वासांचे वादळ



आला श्वास रिंगण घाले
गेला श्वास विंझन वारे
हळवा स्पर्श उष्ण हलका
कळतो तरीही अलिप्त परका
थांबे क्षणभर दाटते वादळ
क्षणही उरतो नावाला केवळ
हुळहुळणारा त्रिवेणी संगम
मधुर गहिरे गूढसे स्पंदन
मोर पिसारा फकिरी हलका
स्पर्शे मस्तकी देवूनी झटका
घडते काही घडल्यावाचुनी
विक्रांत आकार पडल्यावाचुनी

विक्रांत प्रभाकर तिकोणे


आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...