शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

अट्टाहास




अट्टाहास  मनाचा 
श्रेष्ठत्वाचा ,अधिकाराचा 
अन जयजयकाराचा
जेव्हा पडतो
धुळीत कोलमडून
हास्यास्पद होवून

अहंकारची लत्करे मग
पिसाट भुते होवून
झपाटू लागतात
येणाऱ्या जाणाऱ्या
प्रत्येक सावलीस
मग सारे  रान 
चरकु लागते अन
धरु लागते दूरची वाट

मनातील भेगा
अधिकाधिक वाढतात
विखुरते  अस्तित्व
असंख्य तुकड्यात 
वाहतात हातातून
जमवलेले  सुखाचे कण
हळूहळू  जाणिवेची
शक्ति घालवून
पड़ते बुद्धि गहाण
भासमान तरंगांना
अन
उकिरड़ा  उपसणाऱ्या
अर्धवटागत मन
सुखाचा नवा मार्ग
शोधू लागते त्याच घाणीत

डॉ विक्रांत प्रभाकर
 http://kavitesathikavita.blogspot.in/



गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

रुतलेली आठवण





मला घेरून राहिलेलं
एकाकी एकटेपण
माझी फुटकी नाव अन
निरर्थक वल्ह्वणं
माझे हाक मारणं
माझे गळा सुकवणं
सारे काही दिसत असून
डोळ्यात धुक दाटणं
अन अचानक एका
उंच लाटेच उठणं
नखशिखात भिजायच ठरवून
कोरड ठणठणीत उरणं ...
मग मी होतो
नाव वल्हे पाणी अन
एक रुतलेली आठवण

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

देहाचे कौतुक





काय या देहाचे करावे कौतुक
सदा भूक भूक करे जगी |
सदा रोगराई असे पाचवीला
तरीही स्वत:ला कंटाळे ना |
शिणे रात्रदिन लागला पोटाला
मरूमरु आला कष्टाने या |
जरी लडखडे व्यर्थ बडबडे
सुटेनाची कुठे मोह लोभ |
अहो देवराया दत्त दिगंबरा
सांभाळा सांभाळा याला आता |
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...