शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

ओंकार तू







निराकारातून उमटला            
करुणामय आकार तू            
मिती जन्मदाता प्रश्न           
विश्वसंकल्पा आधार तू
महास्फोटाआधी दाटली
अनाकलनीय उर्जा तू
नेणिवेचा अथांग सागर
नि जाणीवेचा गर्भ तू
ज्ञानाची सीमा मानूनही
चक्रावणारा अनंत तू  
विज्ञानाची घुसळण इवली
सदा सर्वदा अस्पर्श तू
थकली बुद्धी ठकला विचार
इतुका अगणित अपार तू
माझ्या मनी सजविलेला
ज्ञानेशाचा ओंकार तू

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

खिळखिळे दार






खिळखिळे दार झाले
खचल्यात भिंती काही
सांभाळले त्यात होते
घरावीन खूप काही

जरी एक छत होते
निवाऱ्यास काही काळ
कुणासाठी पेटलेला
काळजात होता जाळ

कितीवेळ थांबायचे
भंगुरता शाप देही
थांबू थांबू म्हणुनीही
रे थांबता आले नाही 

वादळल्या पावसात
कणकण पडणार
स्मृतीरंग स्पर्शगंध
मागे काही नुरणार

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/









शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

नादान झाल्यावर





नादान झाल्यावर
कुणाला समजवण्यात
काय अर्थ असतो
हात हिसडून गेल्यावर
कुणाला थांबवण्यात
काय अर्थ असतो
ते जात आहेत बेगुमान
निर्ढावलेल्या मनानं
पैश्याच्या चमचमत्या
काळ्या डोहाकडे
देह्सुखाच्या क्षणिक
उथळ डबक्याकडे  
किती अवघड असतं
जिवलग मित्रांची अशी
घसरण पाहतांना
समोर दिसतो आहे
दु:खाचा असमाधानाचा
अपरिहार्य महासागर
पण त्यांनी डोळे मिटले आहे
ते जणू तरंगत चालले आहे
धनगंधाच्या हवेवर  
अन मला इच्छा असून
प्रार्थनाही करता येत नाही
ते सुखी राहावे म्हणून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...