रविवार, ५ जुलै, २०१५

स्पर्श ओले..





आठवांच्या पावसाला
किती धरू कसे धरू
वेचलेले क्षण क्षण
उरी ओझे काय करू

माझ्या सवे जाईलही
माझ्या स्मरणाची गाथा
किती अन कुणा वाटू
देही डोई किती कथा

ठरलेल्या चाकोरीत
वाहुनिया जाते पाणी
नवा ऋतू नवी वर्षा
नवेपनी जुनी गाणी

सांभाळता सांभाळले
हातातून ओघळले
हळू हळू स्पर्श ओले
कुण्या हाती विसावले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ४ जुलै, २०१५

मन मोकळे करू म्हटले तर






मन मोकळे करू म्हटले तर
तूच अशी बोलू लागलीस की
त्या शब्दांच्या धबाब्याने  
मी पुन्हा भरून गेलो
हळूच दार अगदी जपून
सावध उघडू लागलो तर
सोसाट्याचा वारा होत तू
आत घुसलीस थेट थेट
अन मी पाचोळा होवून
उगाचच उडतच राहिलो
तुझे आसमानी स्वप्न
तुझे आरसपानी मन
तुझे पेटलेला राग
तुझा उडालेला रंग
या साऱ्या ढंगात
पुन्हा हरवून गेलो
आता आता तर
या मनाचे करायचे काय
हे ही मी विसरुन गेलो
माझे मन गेले आता
तुझे मन माझे झाले
तू वादळ माझ्यातले
मी आकाश तुझे झालो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/








गुरुवार, २ जुलै, २०१५

बरच बोलून झाल्यावर ..






बरच बोलून झाल्यावर
ती वेळ येते
आता काय बोलावे याची
खात्री नसते
खरतर अजून खूप खूप
बोलायचे असते
पण त्या बोलण्याची  
सुरवात न होते
बोलून टाकावे मनातले
कधी वाटते
पण ओठातून एकही
अक्षर न उमटते
मग एक पूर्ण विराम
एक टिंब उमटते
मिटल्या ओठातील वादळ
छातीमध्ये भरते
साऱ्या अस्तित्वास व्यापून
निद्रेमध्ये उतरते  
रात्रभर ओठावर माझ्या  
तुझेच नाव येते
रोजचीच गोष्ट असे ही
रोज हे घडते
बोलण्यात जर घडले
काही नको ते
तुटून जर गेले कधी
मैत्रीचे हे नाते
नकोच मग थांबेन मी   
मज भय वाटते
जोवर तुझे बोलणे मज
सवडीने भेटते  
माझे स्वप्न माझे जगणे
अर्थ काही पावते  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...