बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

अशीच येतेस




अशीच येतेस अन मला
एक गाणं देवून जातेस
उगाच हसतेस अन मला
माझा विसर पाडून जातेस
वेडे व्हायचे तसे माझे
वय आता राहिले नाही
प्रेमा मध्ये धुंद होणे
पण अजून सरले नाही
साराच बहार वसंतातील
हाती हवा का पडायला
खूप असे हे सौख मिळे
डोळ्यांना या हृदयाला
सारे दु:ख हलके होते
देहामध्ये या भिनलेले
मनामध्ये पुन्हा जागती
सूर काही अन विझलेले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

तुटलेल्या झुंबराचा ...





तुटलेल्या झुंबराचा
पायाखाली खच झाला
पावूलांना भय त्याचे
काल डाव रंगलेला

मांडू मांडू म्हणूनिया
स्वप्न मांडता न येते
दु:ख भरलेले भांडे
नच कलंडून जाते

सुखाचीही स्मृती अंती
उरी दु:ख पाजळते
टाकुनिया दिले काटे
ठसठस नच जाते

जळूनिया जाता रान
त्यात कुणी किती मेले
एका किटकाचे विश्व
कधी कुणी मोजियले


विक्रांत प्रभाकर

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

देहावर पडणारी पाल....






त्याची ,
पहिली प्रतिक्रिया
असते नकाराची
सहज टाळण्याची
पण..
वयाचे समजुतदारपण
पैशाचे शहाणपण
व्यवहाराची लागण
त्याला ,
घ्यायला लावते 
यु टर्न
त्याचं
उसन हसण
उसन वागण
माझ्या
येते अंगावर
नको असून
देहावर पडणारी
पाल होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


  

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...