शनिवार, ५ जुलै, २०१४

तुझे नाव..





दिनरात मनात मी
प्रिया तुलाच पाहते
येता जाता नाव तुझे
मीच मला ऐकवते

लपवूनी मेंदीमध्ये
आद्याक्षर रेखाटते
नक्षीदार बेलबुट्टी
सभोवती सजवते

पानावर कधी तर
कधी ओल्या वाळूवर
तुझे नाव सदोदित
जपते या ओठावर

संगणकी परवली
तूच असतो लपुनी
अन कवितेत माझ्या
सदैव नावावाचुनी

रे सुखानी मज या
आज असे भारावले
तुझे नाव रोमरोमी
मी तूच रे तूच झाले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

कविता जगणे





माझ्या सोबत
बाजूला बसून
माझ्या कविता
कुणी ऐकते

कधी वाहवा
मस्त उमटते
कधी फसली
स्पष्ट सांगते

माझ्या कवितेत
तिचे असणे
तिला मला
नित्य आवडते

डोळ्यात तिच्या
इंद्रधनू अन
गालावरती
वर्षा येते

खरच सांगतो
कविता जगणे
याहून सये
वेगळे नसते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, ३ जुलै, २०१४

मागणे !







मला माझी
पाटी स्वच्छ
पुसायला
बळ दे |
पळणाऱ्या
मनाला या
थांबावया
वेळ दे |
तुझ्या दारी
उभा आहे
सदोदित
जाग दे |
चुकलेला
पथ माझा
येवूनिया
साथ दे |
रडूनिया
झाले फार
हसण्याचे
वर्म दे |
पिसाट या
जीवनाला
जगण्याचे
कर्म दे |
मागतांना
मागण्याचा
अंत साऱ्या
होवू दे |
प्रेम दीप
तुझा मनी
रात्रंदिनी
तेवू दे |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, २ जुलै, २०१४

प्रेमाला मी भीत आहे




कलंकित देह माझा
कलंकित मन आहे
पदी तुझ्या वाहू कसं
मलीन जीवन आहे

फसलेल्या जन्मातील
एक रानभूल आहे
लुटलेल्या बागेतील
फेकलेलं फुल आहे

नाव तुझे घेवू कसं
उरामध्ये खंत आहे
अपमान वंचनेत
अजुनी जळत आहे

तुझे हात आश्वासक
मज धीर देत आहे
डोळ्यातून कृपा प्रेम
बरसात होत आहे

वदलास कधी कुठ
प्रेम देहातीत आहे
मागील ते तुझं सारं
भूतकाळ फक्त आहे

येशील तू कधी तरी
सदैव स्वागत आहे
नात्या पलीकडचं हे
तुझं माझं नात आहे

सुखावते ऐकुनी मी
माझं कुणी इथं आहे
जळलेलं मन पुन्हा
उमलून येत आहे

तुझी प्रीत तुझं गीत
सुख पालवीत आहे
अजूनही माझ्या पण
प्रेमाला मी भीत आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...