शनिवार, ७ जून, २०१४

नाति चरामि






आता घर हे धर्मशाळा
निजणे खाणे दोन वेळा
परक्या भिंती परकी नाती  
बोलचालही कामापुरती
जगल्याविना जगे तरीही
कुणा न माहित इथे काही
ती न माझी, उरलो तिचा मी
बोल हरवले नाति चरामि
काय असेही असते जगणे
देहा मधूनी उगा वाहणे
हाक मारतो कुणास कुणी
जरा कळू दे मज जिंदगानी
 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




दारी धुत्कारला



हळू हळू मनातुन 
व्यक्ति पुसल्या जातात
वेड्या खुळया आठवणी  
टाकुन दिल्या जातात

आधारावर जयांच्या 
जन्म येथे तरतात 
जीवलग तेच जीवा 
निराधार करतात

सोन्यासारखे दिवस 
उगाच व्यर्थ जातात
दु:खामध्ये जगण्यास 
स्वप्न जणू फुलतात

गांजलेला भिकारीही  
हाका मारून थकतो
नवीन आशा घेवुनी   
दुस-या दारात जातो

भिका-यास पण कधी
हक्क निवडीचा नसे 
घरी दारी धुत्कारला 
सखी त्याचे भाग्य तसे

विक्रांत प्रभाकर 

शुक्रवार, ६ जून, २०१४

सहज सकाळी सखी






सहज सकाळी सखी
पुनरपि येताच तू
बहरूनी वृक्षावरी
पुन्हा आले नवे ऋतु
दाटुनी गर्द  मेघांनी
आकाश लागले झरू
दु:ख मिटुनी पाखरे
मनी लागले उतरू
तुझे हास्य कणोकणी
देही लागे वीज नाचू
आनंदाने एक गीत
शब्द लागतात रचू  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ५ जून, २०१४

प्रेमकांक्षा







दिन गेला सुना सुना
तुझ्या माझ्या भेटीविना
सखी तुझ्या डोळ्यातील
चंद्र आज पहिला ना

प्राणोत्सुक आतुर मी
तरीही होतो थांबलो
बहकलो होतोच की
नजरेत त्या बांधलो

वाट होती थबकली
वाट तुझी पहातांना
वळणावर उगा मी  
तिला साथ करतांना

का शामला भुलविशी
सारे काही सुटतांना
पुन्हा बुडे कृष्णडोही
आमंत्रुनी मी दु;खांना

जळलो असे कितीदा
आग लागून स्वप्नांना
पुन्हा जागते मनी का
प्रेमकांक्षा विझतांना

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...