सोमवार, २१ एप्रिल, २०१४

धुपाची धुंदी ...





धुराच्या लोटात
धुपाची धुंदी
पाजळला प्रकाश
डोळियांच्या वाती |
दुमदुमला ध्वनी
रंध्रा रंध्रातुनी
विरघळलो मी
ॐकार होवुनी |
साऱ्या आसमंती
फुलोरा पर्वती
धुंदावला श्वास
भ्रमराच्या गती |
म्हणावा शून्य  
आकार प्रचंड
अंधार कराळ
वा प्रकाश चंड |
अहो देवराया
सावरा सावरा
कल्पांती उदक
नयनात आवरा |


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, २० एप्रिल, २०१४

गडणी ..




सावळी सुंदर गडणी खुळी
कारुण्य डोह सावळ्या डोळी
तरीही धडाडे कडक बिजली
तडफ करारी जगाने पहिली
तिजला काही सांगण्या जावे
अवघे असते आधीच ठावे
विचारू जाता कुठले कोडे
खट्याळ बोल भूलीस पाडे
जरासी अल्लड तरीही गंभीर
नीटस बोलणे तेज तर्रार
अलिप्त अजाण सावध सुजाण
विश्वासू सदैव मैत्रीण सुजाण  

विक्रांत प्रभाकर

शनिवार, १९ एप्रिल, २०१४

घटस्फोटाच्या रात्री ..




नक्कीच ती सुखात असेल
त्याला उगाच वाटत होते
कडवट ओठ सिगारेट धूर
दीर्घ हवेत सोडत होते
आता हक्क त्याचा तिच्या
कशावरही उरला नव्हता
येणे जाणे जगणे तिचे
काही फरक पडणार नव्हता
एक कागद एक सही
सारे किती पटकन झाले
वर्षानुवर्ष गरळ साठले
क्षणात शाईमधून झरले
ओ हो सुटका झाली शेवटी
त्याची तिची आणखी कुणाची
छती दाटल्या धुम्र अभ्राही
आज नव्हती घाई निघायची
तरीही पोकळ, पोकळ पोकळ
एक रितेपण दाटले होते
ओझे आले का ते गेले  
त्याला अजून कळत नव्हते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

वदती अधर





वदती अधर (उपक्रमासाठी)
*********

ताम्र करडे
रेखीव डोळे
सूर्य किरण
जणू सांडले

आणि तरीही
मवाळ ओले
जणू आताच
व्याकूळ झाले

काही भुरके
तसेच पिंगट
केस कपाळी
होते लहरत

सुरेख तरीही
उदास हसणे
दु:ख थिजले
होते पाहणे

स्वर्गीचीच ती
जणू अप्सरा
प्रिया हरवली
दूर सागरा

त्या विरहाचे
दु:ख शापित
वदती अधर
काही नकळत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...