मंगळवार, ४ मार्च, २०१४

बाईसाहेब ...





फिरायला आल्यागत
ती रोज कामावर येते
असा अविर्भाव जणू
आमच्यावर उपकार करते
येतांना धावतपळत येते
ऑफिसात घुसते सही करते
मग सारा मामला आरामात
गप्पा टप्पात वेळ घालवते  
न चुकता केंटीन मध्ये जाते
छान पैकी नाश्ता करते
केंटीनवाल्याला उगाच झापते
अवतीभोवती मुआईना करीत
एकदाची स्थानापन्न होते
पण एकटी मुळीच बसणार नाही
काम जास्त करणार नाही
घोर अन्याय हा कधीसुद्धा  
मी सहन करणार नाही
ताडकन उठत खुर्चीवरून
काम सारे सोडून देवून
साहेबाशी भांडायला येते
कुणी बाजूला असेल तर
मोजून मापून काम करते
होईल तेवढे बाजूस ढकलते
कोण किती फायदा घेते
यावर सारे लक्ष्य ठेवते
तिला नियम माहित सारे
फायद्याचे तर तोंडपाठ आहे  
तिचा कावा सदैव गनिमी
खिंडीत गाठणे माहित आहे
म्हणा बेरकी म्हणा नाटकी
तिजसाठी या पदव्या आहेत
गोड बोलते कधी रडते
साऱ्या लीला फसव्या आहेत
बारा गावाचे पाणी प्याली
म्हणते मी वाघीण आहे
जागोजागी होवून हाकलण
सुडबुद्धीची नागीण आहे
दूर राहणे तिज पासून
हाच एक मार्ग असतो
माहित आहे जगास साऱ्या
खुदा काही लोकास डरतो
कधी काही बिघडेल तिचे
कुणास काही ठावूक नसते
मना सारखे करता तिच्या
अधिकाधिक फायदा घेते
धरले तर नक्की चावते
सोडले तर नक्की पळते
काय करावे अश्या जीवाला
चुकला ब्रह्मदेव हे कळते 

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २ मार्च, २०१४

सकाळ (नर्मदाकाठची कविता )




हिरवळी पानावर
काळसर मातीवर
इवलाले दवबिंदू
कोळीयांच्या जाळीवर

ओल साऱ्या झाडावर
किनारी दगडावर
जलपऱ्याची पावुले
उमटली फुलावर

पाण्यामधून धूसर  
धुके जात होते वर
श्वासातील उष्ण बाष्प
थंडगार वाऱ्यावर

झोतामध्ये तीक्ष्ण शीत
होती पण उबदार  
माईची सोबत अन  
हात सुन्न हातावर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/









शनिवार, १ मार्च, २०१४

फुटपाथवरची मुलं ....



फुटपाथवर खेळणारी
अनवाणी पायांची
मळक्या कपड्यांची
आक्रमक मुलं...
काही कळल्यावाचून
असभ्य भाषेतून  
आईबहिणी वरून
शिव्या देणारी मुलं...
शिव्यांनीच संबोधन
शिव्यांचीच विशेषण
शिव्यांचीच अवतरण
मुखात पेरलेली मुलं...
गल्लीगल्लीतून उगाच   
उनाड धावणारी
गाड्यासमोर बिनधास्त
बेफिकीर पळणारी
निरंकुश सशक्त
तेज तर्रार मुलं....
सिनेमाच्या कथातून
घेत घेत प्रशिक्षण
गुंड रोड छाप हिरोला
आपला आदर्श मानून
थंड उद्धट मग्रूर
संवाद बोलणारी मुलं....
त्यांचे डोळे शाळेला कंटाळलेले
हात अवेळीच पैशाला चटावलेले
ती  स्वैर विमुक्त बेपर्वा
जीवनाचे व्यसन लागलेली मुलं....
त्यांना पहिले की
मला आठवतात ते
गावच्या माळावर
वेडेवाकडे आडवेतिडवे
वाढलेले प्रचंड तण.....
अवती भवतीच्या साऱ्या
लहान झुडूपांना खाली दाबून
वारेमाप धसमुसळेपणान
पसरलेले सैराट रान...
त्यांची तीष्ण काटेरी
धारधार पानं
अन तीव्र उग्र तिखट
ओल्या गंधानं
दरवळलेले माळरान ...
कुणाचीही पर्वा केल्यावाचून
उद्दंडपणे जीवनाकडून
उन वारा पाणी
घेणारे ओरबाडून  
राकट चिवट रानवट आणि बेपर्वा ..
जीवनाचे आदिम रसायन  
धमन्यातून खेळवणारी मुलं....
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  




वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...