सोमवार, १३ जानेवारी, २०१४

बंद झाली दार सारी








बंद झाली दार सारी
प्राण गर्द अंधकारी  
ओठास लावून कडी
कोंडिले मी कढ उरी

कालच्या त्या जगण्या 
अर्थ आज नाही जरी
भूतकाळी  धावतात
स्वप्न खुळचट सारी

मी न जरी कालचाच
कालची ती हि नाही
आजच्या या प्रकाशास
परि ते मंजूर नाही

जळू दे हे जग सारे
व्यर्थ जगण्यास झाले
अथवा अस्तित्व माझे
जड जीवनास झाले 

विक्रांत प्रभाकर  



रविवार, १२ जानेवारी, २०१४

राजघाट-बिडवानी (नर्मदाकाठच्या कविता )





  किनाऱ्यावर थबकलेले
साचलेले पाणी
बुडालेल्या घाटावर
अवघडलेले पाणी
जागेवाचून स्नानाला
खोळंबले भक्तवर
त्या त्यांच्या विनंतीस
मैयाही निरुतर
आवारात मंदिराच्या
घुसलेल्या गाड्या
अतिपरिचयात
झालेली अवज्ञा
धीरगंभीर प्रसन्न
एकमुखी दत्त
चैतन्यानी दाटलेले
जागृत आसमंत
कुठल्याही धनाविन
ऋण मुक्तेश्वर
भरलेले पाणी तरीही
पंपाचा आधार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

धर्मशाळा (नर्मदाकाठच्या कविता )







धर्मशाळा पडक्या छताची
कोसळण्याच्या मार्गावरची    
तिची होणार नाही दुरुस्ती
आता बुडणार सारी वस्ती 
 
उंच थोरला प्रशस्त जोता
घडीव दगडी पक्का ओटा
कधी कुणी तो होता बांधला
साधूसंत नि जनसेवेला  

जन हजारो राहून गेले
साधू चातुर्मासात थांबले 
त्या झिजल्या पायरीवरले
ते निशाणही बुडी चालले

गावी तरीही माणुसकी ती
मैयावरची भक्ती नि प्रीती
मुळी उणी ना कधी जाहली  
तशीच गाढ ओथंबलेली

कधी कुणी वाटेत अडला 
रात्र होता इथेच थांबला
भीतच ओट्यावरी निजला
कधीच गेला नाही भुकेला 



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...