शनिवार, ११ जानेवारी, २०१४

धर्मशाळा (नर्मदाकाठच्या कविता )







धर्मशाळा पडक्या छताची
कोसळण्याच्या मार्गावरची    
तिची होणार नाही दुरुस्ती
आता बुडणार सारी वस्ती 
 
उंच थोरला प्रशस्त जोता
घडीव दगडी पक्का ओटा
कधी कुणी तो होता बांधला
साधूसंत नि जनसेवेला  

जन हजारो राहून गेले
साधू चातुर्मासात थांबले 
त्या झिजल्या पायरीवरले
ते निशाणही बुडी चालले

गावी तरीही माणुसकी ती
मैयावरची भक्ती नि प्रीती
मुळी उणी ना कधी जाहली  
तशीच गाढ ओथंबलेली

कधी कुणी वाटेत अडला 
रात्र होता इथेच थांबला
भीतच ओट्यावरी निजला
कधीच गेला नाही भुकेला 



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

प्रवास (नर्मदाकाठच्या कविता )









सर्वदूर केवळ
पाण्याची खळखळ
अन पायाखाली
पाचोळ्याची सळसळ  
कुणीही नाही
आजूबाजूला
अथवा कुणाची
चाहूल कानाला
किती चालायचे
माहित नाही
किती चाललोय
माहित नाही
मनाला त्याची
मुळी शुध्दच  
उरली नाही
पोहोचणे किंवा
न पोहोचणे यास
जणू आता
काही अर्थच
उरला नाही
अस्तित्वाच्या
कणाकणात
विरघळलेली
तुझी साथ
श्वासाच्या
अंतापर्यंत
हवी हवीशी
वाटणारी ..
थबकली पावुले
वाटले मनास
इथेच हा पथ
संपावा प्रवास

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

आई (नर्मदाकाठच्या कविता )




तुझ्या पाण्यावर तरंगणारी
छोट्या छोट्या दिव्यांची रांग
त्या तेजाने उजळलेले तुझे रूप
पाहता पाहता मला
माझी आई आठवली
देवा समोर डोळे मिटलेली
तशीच सात्विक उजळ
माझा जीवनाधार असलेली
अन जाणवले
ती तूच होतीस तिथे
ती तूच आहेस इथे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...