शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

राजकुमारा





सत्तेच्या दुधावर वाढलेल्या राजकुमारा
सलामांच्या झुल्यावर जोजवल्या राजकुमारा
तुला इथले दु:ख कधी तरी कळेल का ?
सोन्याचे पाय तुझे या मातीचे होतील का ?

त्या सगळ्यांना वाटते तूच आहेस कैवारी
सत्तेचे भुके करती तुकड्यासाठी लाचारी
इच्छा असो वा नसो तुला ते द्यावेच लागेल 
त्यांच्यासारखा होशील तू शेवटी असेच घडेल

कधी कधी मला तुझी फार कीव वाटते
जगणे कारण तुझे हे तूझे कधीच नसते
ठरलेले गुलाम तुझे ठरलेले सलाम कारण 
नशिबाने आलास तू घेवून शापित वरदान

 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

उसवलेला खिसा






कामावरून आल्यावर
आज हि ते दार उघडते
चहा पाणी खाणे वगैरे
तसेच सारे काही होते
पण माझे असूनही
तर घर माझे नसते
कुठल्याही खोलीत बसता
भिंती खायला उठतात
पंख्याचा आवाजाने ही
डोक्यात घण बसतात
जमा केलेल्या वस्तू
गाणी सिनेमा पुस्तके
सारे सारे मला   
वाटू लागतात परके 
मनाला दाटून घेते
अथांग रितेपण
कणाकणी दाटून येते
अनादी एकटेपण
मुळातच काहीतरी
बिनसलेले असते
तो तुटलेला धागा
तो बिनसला टाका
मुळीच सापडत नाही
आणि मी ,
उसवलेला खिसा होवून
लोंबत राहतो
माझ्या अस्तित्वावर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


अर्धा डाव ..

 
 
चाळीस पन्नाशीच्या वयात
स्थिरावल्या संसारात
एकदिवस अचानक
जेव्हा त्याला कळते
संपू आला डाव आता
पुढे जायचे एकटे
जुळलेल्या सुरातले
गाणे हरवून जाते
एक जिनसी पिळातली
वीण सुटू लागते
त्याला तर मुळी सुद्धा
एकटे जायचे नसते
तिलाही कधी सुद्धा
एकटे राहायचे नसते

किमोची ती आवर्तने
वाया गेलेली असतात
आजाराची बीजे त्या
खोलवर रुजली असतात
आशा निराशेत झुलतांना
साठवलेली पै पै
उपचारात घालवतांना
सारी शक्ती हरवूनही
लाचार नसते ती
सारे काही विकायला
रस्त्यावर राहायला
तयार असते ती
याला आता काही सुद्धा
अर्थ उरला नाही
हे त्याला पक्केपणी
कळलेले असते
त्याने आपले प्राक्तन
स्वीकारले असते

एके दिवशी सकाळी
ती कामाला निघते
तो तिचा हात घट्ट धरतो
अन तिला विनवू लागतो
प्लीज तू जावू नको
आता फक्त तुझी
सोबत तेवढी राहू दे
बस तुला बघत बघत
उरले जीवन जगू दे

ती आतून एकदम खचते
वरवर त्याला समजावते
बरेच काही बोलते
खोटे खोटे रागावते
पण त्याचा हट्ट
काही केल्या सुटत नाही
तीच त्याची आर्जवे
काही केल्या मिटत नाही

शेवटी ती रजा टाकते
तिच्यासाठी जगणे तर
अजूनही अवघड होते
हळू हळू तो झिजत असतो
तिला पाहून रडत असतो
तरीही तिच्या सहवासात
त्याला आधार मिळत असतो
एक दिवस ती घटना घडते 
विस्कटलेले विश्व तिचे
उजाड होवून जाते
त्याचे भोगणे संपते
तिचे सुरु होते


 विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

मोडू म्हणूनिया कधी



मोडू म्हणूनिया कधी
नाते नच मोडते रे
सोडू म्हणुनिया कधी
प्रेम नच तुटते रे

सुख दु:खी बांधलेल्या
गाठी जन्मा सवे येती
नाही म्हणूनि का कधी
अव्हेरती बीजा माती

लक्ष लक्ष योजने ती
पक्षी दिगंतरा जाती
साद घालताच कुणी
पुन्हा परतुनी येती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सूत्र

सूत्र ***** देऊन सूत्र जीवनाची सारी तुझ्या हातात  आता मी रे निवांत आहे वाहत श्वासात जगणे चालू आहे नि धावणेही चालू आहे यशापयश दोघ...