बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

अर्धा डाव ..

 
 
चाळीस पन्नाशीच्या वयात
स्थिरावल्या संसारात
एकदिवस अचानक
जेव्हा त्याला कळते
संपू आला डाव आता
पुढे जायचे एकटे
जुळलेल्या सुरातले
गाणे हरवून जाते
एक जिनसी पिळातली
वीण सुटू लागते
त्याला तर मुळी सुद्धा
एकटे जायचे नसते
तिलाही कधी सुद्धा
एकटे राहायचे नसते

किमोची ती आवर्तने
वाया गेलेली असतात
आजाराची बीजे त्या
खोलवर रुजली असतात
आशा निराशेत झुलतांना
साठवलेली पै पै
उपचारात घालवतांना
सारी शक्ती हरवूनही
लाचार नसते ती
सारे काही विकायला
रस्त्यावर राहायला
तयार असते ती
याला आता काही सुद्धा
अर्थ उरला नाही
हे त्याला पक्केपणी
कळलेले असते
त्याने आपले प्राक्तन
स्वीकारले असते

एके दिवशी सकाळी
ती कामाला निघते
तो तिचा हात घट्ट धरतो
अन तिला विनवू लागतो
प्लीज तू जावू नको
आता फक्त तुझी
सोबत तेवढी राहू दे
बस तुला बघत बघत
उरले जीवन जगू दे

ती आतून एकदम खचते
वरवर त्याला समजावते
बरेच काही बोलते
खोटे खोटे रागावते
पण त्याचा हट्ट
काही केल्या सुटत नाही
तीच त्याची आर्जवे
काही केल्या मिटत नाही

शेवटी ती रजा टाकते
तिच्यासाठी जगणे तर
अजूनही अवघड होते
हळू हळू तो झिजत असतो
तिला पाहून रडत असतो
तरीही तिच्या सहवासात
त्याला आधार मिळत असतो
एक दिवस ती घटना घडते 
विस्कटलेले विश्व तिचे
उजाड होवून जाते
त्याचे भोगणे संपते
तिचे सुरु होते


 विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

मोडू म्हणूनिया कधी



मोडू म्हणूनिया कधी
नाते नच मोडते रे
सोडू म्हणुनिया कधी
प्रेम नच तुटते रे

सुख दु:खी बांधलेल्या
गाठी जन्मा सवे येती
नाही म्हणूनि का कधी
अव्हेरती बीजा माती

लक्ष लक्ष योजने ती
पक्षी दिगंतरा जाती
साद घालताच कुणी
पुन्हा परतुनी येती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

स्वीपर साहेब





खाकी कपड्यामधला साहेब
गुपचुप ड्युटीवर यायचा
वरवर झाडू मारायचा नि   
मस्तपैकी ताणून द्यायचा

माझे काम झाले आता
जास्त सांगू नका काही
हे देणे किंवा आणणे ते
सांगतो माझे काम नाही

ज्याचे काम त्याने करावे
तत्व त्याने ठेवले धरून
त्याला काम नव्हते म्हणून
सकाळी जायचा छान उठून

त्याच्या अंगावर कधीही
धूळ चढली दिसली नाही
खरतर त्या खाकी रंगाची
खास किमया होती हि

प्रोमोशन होताच साहेब
वरच्या पदाला गेला
शुभ्र पांढरे घालून कपडे
ऐटीमध्ये मिरवू लागला

काम सारे बदलले अन
डोक्यावर येवून पडले
पण कुठले काम साहेबाने
त्या कधीच नव्हते केले

काम सोपे होते ते पण  
त्याने कधीच नव्हते शिकले
सतत येणारे काम मग
त्याला संकट वाटू लागले

आजूबाजूच्या लोका तेव्हा  
साहेब पटवू लागला
चहापाणी देवून आपले
सारे काम उरकू लागला

सिनियारीटीचा धाक कधी
आपल्या देवू लागला
वा युनियनच्या नावाखाली
गोंधळ घालू लागला


आजही त्याच्या कपड्यावर
धूळ काही दिसत नाही
शुभ्र पांढरे कपडे त्याचे
सत्य मुळी लपवत नाही

आला साहेब कामावर
का चालला कळत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

घरे पडतात



घरे पडतात
माणसे मरतात
घर पडे पर्यंत
माणसे त्याच
घरात राहतात
आपल्याच निवाऱ्यात
दफन होतात
नवीन चांगल्या
सुरक्षित घरात
राहायला कुणाला
नाही आवडत
पण जेव्हा हे
शक्य नसत
आपला जीव
धरून मुठीत
तिथेच त्यांना
रहाव लागत
हवाला ठेवून
देवावर नशिबावर
कारण तस म्हटले तर
आभाळाचे छत
केव्हाही पडू शकत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

देवबाप्पा




दहा दिवस
सजवलेले
नटवलेले
नमस्कारले
गणपती
हळू हळू
होतात
विसर्जित
पाण्यात
लाटांच्या
कल्लोळात
वेगवान
प्रवाहात
झगमगणारी
कांती
लखलखणारे
मुकुट
विरघळती
पाण्यात
देवबाप्पा
तुमचीही
जर का
हि स्थिती
माणसे
का रडती 
आपल्या
प्रारब्धाला 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

माणूस अजूनही जिवंत होता






दुखणारे पाय
अवघडला खांदा
कोपऱ्यात मी
दूर लोकलचा
दरवाजा होता
शंभर लोकांनी
अडविला रस्ता
जणू कडेकोट
तट होता
उतरायचे स्टेशन
जवळ जवळ
येत होते 
गर्दीचा कवच
अधिकाधिक
आवळत होते 
धक्के बसणार
मान दुखणार
सारे काही
पक्के होते
खूप वर्षांनी
आलो तरीही
इथले नियम 
माहित होते
घेतली बँग
गळा टाकली
दरवाज्याकडे
कूच केली 
आणि एक
नवल घडले
माझ्या पिकल्या
पांढऱ्या केसांनी
थकल्या भागल्या
वृद्ध चेहऱ्यानी
काहीतरी किमया
केली होती
माणसे वाट
देत होती
कठोर भिंत
वितळत होती
थोडा असा
थोडा तसा
होत होतो
थोडा ओढून
थोडा ढकलून
पुढे पुढे
जात होतो
आणि शेवटी
चक्क मी
दार गाठता
झालो होतो
त्रास झाला
होणार होता
धक्का बसला
बसणार होता
परंतु तरीही
गर्दी मधला
मज सांभाळणारा
वाट देणारा
माणूस अजूनही
जिवंत होता


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

तिसऱ्या लेनचा स्वामी




तिसऱ्या लेनचा
स्वामी आहे मी
कुणासाठीही लेन
सोडणार मी नाही

हॉर्न वा सायरन
कितीही वाजोत
कुणाकडेही कधी
पाहणार मी नाही

होवू दे गलका
वा शिवराळ कुणी
या माझ्या कानाने
ऐकणार मी नाही

मला न घाई
कुठे पोहोचायची
तुमच्या लेनलाही
शिवणार मी नाही 

सुसाट जा पुढे
दोन्हीही बाजूनी
कर्तव्य न मजला 
विचारणार मी नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...