सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

बहाणे




मरणाच्या रात्रीही त्याने
सारे हिशोब केले होते
कागदावर सगळे
चोख लिहून ठेवले होते
उद्याची खरेदी बेंकेची देणी
भागीदारांचे हिस्से हि
व्यवस्थित केले होते 

डॉक्टरच्या भेटीची
वेळ पक्की केले होती
कोर्टातील दाव्यासाठी
फी वेगळी ठेवली होती
मरे पर्यंत थोडक्यात
त्याला उसंत नव्हती

तो मेल्यावर
दोन दिवसांनी
पुन्हा दुकान चालू झाले
कोर्टातील खटल्याचे
दावेदार बदलले
गादीवर दुकानाच्या
नवे मालक बसले
नवे अक्षर नवे आडाखे
नवे देणे घेणे
सुरळीत चालू झाले

पण ..
सारे काही आटोपून
एकदिवशी त्याला
परिक्रमेला जायचे होते
अन घरात हे त्याने
कितीदा सांगितले होते
साद ऐकून कितीदा तरी
त्याने जायचे ठरविले होते 
एक एक काम पण
वाढत वाढत गेले होते

ते त्याचे बहाणे सारे
अजूनही जिवंत होते
बहाण्याचे फक्त त्या
वाहक बदलले होते
माईचे पाणी वाहत होते
अन कुणा कुणाला
साद घालत होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

कुणासाठी





कुणासाठी मनामध्ये
एक वादळ उठले
अवसेच्या मध्यरात्री
एकटेच उधाणले

विझलेल्या गात्रामध्ये
विसरले गीत होते
थिजलेल्या मनामध्ये
गोठलेले स्वप्न होते

कुठून ते आसावले
आर्त सूर तिचे आले 
दुभंगले मन माझे
प्रकाशाच्या स्पर्शी न्हाले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गर्दी आणि चेव




गर्दी म्हटले 
कि एक गोष्ट 
नक्की आढळते 
ती म्हणजे चेव 
त्यातही ती गर्दी 
समवयस्क समविचारी 
बिनधास्त अन उद्दाम 
असेल तर.. 
उफळणारी मस्ती 
नकोसा करते जीव 
तथाकथित शांतीप्रिय 
निरुपद्रवी नागरिकांचा 
कर्कशता कटुता 
उपद्रव यात पूर्णतः 
ढवळून निघूनही  
हाताची घडी 
तोंडावर बोट 
कारण आम्ही 
उत्सवप्रिय आहोत 
देवाच्या धर्माच्या 
नावावर बोलायची 
काय कुणाची 
आहे हिम्मत 
आणि हा बादरायण
संबध लावूनच 
साजरे होतात 
सारे धुडगूस 
उडवले जातात 
किमती फटके 
उधळले जातात
पोत्यांनी गुलाल 
तुमच्याच त्या 
अनिच्छेने 
दिल्या गेलेल्या 
वर्गणीतून 
विकत घेतलेले 
फुकटचे मनोरंजन 
मादक द्रव्यात 
येते फसफसून 

विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

देवा समोर डोके आपटता तो ...





देवाजीच्या समोर तो
तुमचे डोके आपटतो
मान हातात पकडून
दूर ढकलून देतो

तो तर फक्त त्याचे
काम करीत असतो
सांगणारा त्याला 
दुसराच कुणी असतो

नाही तर लाईन
संपेल तरी कशी
दानाची पेटी त्यांची
तुडुंब भरेल कशी

पैशाने येत असते
बेदरकार मुजोरी
संघटनेने येते अन 
बेताल बळजोरी

हे तर जगाला
सारेच माहित आहे
वर्षानो वर्षापासून
असेच चालू आहे

साऱ्याच देवळात हे
असेच घडत आहे
तुमच्या कँमेरात फक्त
आता दिसत आहे

बरे त्यांनी तुम्हाला का
निमंत्रण दिले होते
तुमच्याच मनी आशेने
इमले बांधले होते

लग्न व्हावे पद मिळावे
घर हवे पोर हवे
व्यापारात वृद्धी हवी
दुष्मनाचे नाव मिटावे

रोगातून बरे व्हावे 
आणि काय काय हवे
इच्छा संपत नाही
तोवर मागत राहावे 

म्हणून सांगतो तोवर तरी 
दु:ख मानू नका
त्यांच्या त्या वागण्याची
खंत ठेवू नका

त्याला मान पकडू द्या
देवा पुढे आपटू द्या
रडू नका पडू नका
नवस फेडण्या जरूर या 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

फासावर काय होते





फासावर काय होते
मला पाहायचे होते
लटकणाऱ्या देहाचे
मला आकर्षण होते

म्हणून एक दिवशी
मीहि ते नाटक केले
बांधूनी गळ्यात दोर 
स्टूल ढकलून दिले

छातीमध्ये दुभंगून 
प्राण कासावीस झाला
वेदनेत ताठलेला   
देह मग शांत झाला 

म्हणजे काय घडले
तरी नव्हते कळले
जाणीव आली तेधवा
समोर काही दिसले


कवळून आई मला
करीत आकांत होती
सुन्नपणे बाबा अन 
बसले खुर्ची वरती

आलेले पोलीस अन 
शेजारी जमलेले ते
संशयी अविश्वासाने
त्यांनाच पाहत होते

आता मजला आईला
स्पर्श येईना करता
आणि बाबांना ती सारी
हकीकत हि सांगता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

मृत्यू !

मृत्यू !
तसा म्हटला तर
पूर्णविराम असतो
साऱ्या कर्तृत्वाचा 
ऐश्वर्याचा माझेपणाचा
दारिद्रयाचा शोकाचा
आणि यातनेचा
खरतर तो कुणालाच
नको असतो
राजाला दारिद्र्याला
आजाऱ्याला भिकाऱ्याला
त्याला तिला तुला मला
जरी माहित असते
त्याची अटळता
कदाचित म्हणूनच
त्याची आठवण टाळत
असतो आपण जगत
आयुष्य भोगत
सतत अधाश्यागत
आणि होताच दर्शन
चुकून जरी त्याचे
नात्यामध्ये मित्रांमध्ये
शेजारी वा रस्त्यामध्ये
झटपट सारे
सोपस्कर उरकत
शक्य असेल तर
दुर्लक्ष करत
जाऊन बसतो
त्याच विस्मृतीच्या
आश्वस्त कोषात
पण...
आपल्या जाणीवेची
एक किनार
कितीही दडपली तरीही
असते सदैव फडफडत
क्षणा क्षणाचा
हिशोब सांगत
आणि आपण असतो
निरुद्देश धावत 
मृत्यू आपल्याला
गाठे पर्यंत .

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १५ सप्टेंबर, २०१३

तुला माझा मानतो मी




तुला माझा मानतो मी
तुला जाणू  पाहतो मी
अंधारात मीच माझ्या
मला शोधू पाहतो मी

फार काही दूर नाही
वाट जरी चांदण्याची
खिळलेत पाय माझे
भास खरा मानतो मी

केव्हातरी श्वासात या
चंदनाचा गंध होता
तोच श्वास आज पुन्हा
देवळात शोधतो मी

माथ्यावरी अबीर नि
गळा माळ तुळशीची
तोच तो असे मी वा
सोंगात या नटतो मी

लाख लाख यत्न माझे
जप तप ध्यान काही
व्यर्थ खेळ वाटे जरी
करू तेच जाणतो मी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...