शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

लग्नाआधीचा घटस्फोट.






लग्नाआधीच आमुचा घटस्फोट झाला
प्रेमाचा माझ्या पार विचका होवून गेला
खर्च तिचा नाही मज कधीच परवडला
खिसा माझा तिजला नाही पसंत पडला
वडा आईने केलेला नाही तिला आवडला
चीनी डिश नाही माझ्या घश्यात उतरला
साधेपणा माझा तिला बावळटपणा वाटला
देहप्रदर्शनाचा सोस नच मजलाही रुचला
तिच्या माझ्या पहिल्या भेटीचा सोहळा
चार डोळ्यात धुंद तेव्हा फुलुनी आलेला
तो वसंतही होता जणू कागदी फुलातला 
लागताच झळ सत्याची रंग उडून गेला 

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

जुने तुझे पत्र



जुने तुझे पत्र
हृदयाशी घेवून रडतांना
स्मरणांची यात्रा
नयनांतून झरतांना
हरवलो मी माझ्यातून
एकरूपलो त्या क्षणा
होतास तेव्हा तू ...
कधीकाळी लिहिलेले
ते शब्द जीवघेणे
बंदिस्त तुझ्या व्यथांनी
पिळवटून उमटलेले
त्या दुःखाच्या सांत्वनास
नव्हतेच सामर्थ्य शब्दास
भांबावून गेलो होतो
मी तुझ्या भावनावर्तात .
ते तुझे अखेरचे पत्र ठरले
पुस्तकी उपदेश माझे
सारे व्यर्थ गेले
ते तुझे पत्र अजून मी जपतो
तुझ्या प्रेमाचे ,विश्वासाचे
दव त्यातून टिपतो
असहाय माझ्या विवशतेने
कितीदा तरी तडफडतो
तुझा स्पर्श झालेली अक्षर
कितीदा उरी कवटाळतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१३

इवल्या सत्याला




इवल्या सत्याला | जप जीवापाड |
अंकुराचा वड | होत असे ||१
विटाळ कधी ना | मानवा जन्माचा
|
प्रकाश गर्भाचा | तेथ असे ||२
मागचा हिशोब | मागेच असू दे |
नव्याने येवू दे | तुज डोळे ||३
पंखाना आधार | असते आकाश |
केवळ विश्वास | तेथ नसे ||४
तुझ्या पाठीवर | कुणाचे ना ओझे |
वाकल्या देहाचे | व्यर्थ भास ||५
काय सांगू तुज | आणखी अजून |
तुच वेटाळून | शब्द माझे ||६

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

नर्मदा मैया (अजूनही)



नर्मदा मैया 
अजूनही तुझे अष्टक
माझ्या ओठातून
नीट नाही फुटत
अजूनही तुझ्याकडे
येणे नाही घडत
कोसतोय मी स्वत:ला
का न मी तुझा होत
इतकी वर्ष आयुष्याची
उगाच आहे भटकत
आता चालव मला
तुझ्या किनाऱ्याने
प्रेमाच्या चाकोरीत
जीवनाच्या अंतापर्यंत
अमरकंटक ओंकारेश्वर
मिठीतलाई नेमावर
पुन्हा पुन्हा परिक्रमेत 
जन्म जगणे अवघे जावे
तुझ्याशी एकरूप होत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

बांद्रा स्टेशन बाहेर.....



माणसांची गर्दी
भोंगातील आवाज   
श्रद्धेने रस्त्यावर
चाललेले नमाज
रंग बिरंगी डिश
ठेवलेल्या सजून 
गरम मसाल्यांचे
गंधीत वातावरण
कडक बंदोबस्त
सावध खाकीधारी
इवल्या शेरवानीत
मुले गोरी गोरी
हिरव्या पताका
सुरमी नजरा
कर्मठ गंभीर
अल्ला हू चा नारा  
नवे कोरे बुरखे 
उत्साहाने भरले
बाजरी गढलेले
हात मेहंदी सजले
आलो मज वाटे
दुसऱ्या जगात
बसलो अवघे
कौतुकाने पाहत


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

हजारो कविता या इथे




हजारो कविता या इथे
आंतरजालावरील महासागरात
रोज रोज पडत असतात
काही सुमार असतात
काही अफाट असतात
कधी यमक वृतात
कधी मुक्त छंदात
आपल्या अस्तित्वासाठी 
धडपडत असतात
या गतिमान प्रवाहात
जेव्हा मी सोडतो
माझ्या कवितेची
कागदी होडी 
तेव्हा मला माहित असते
ती थोडावेळ तरंगणार
हेलकावे खाणार
अन अखेरीस वाहून जाणार
इतर हजारो कवितेगत
मन क्षणभर दु:खी होते
पण लगेच लक्षात येते
या होडीला वा त्या होडीला
अर्थ नाही कशाला
महत्व आहे ते फक्त
होडी सोडण्याला
ती वाहणारी हलणारी
अन हळूच बुडणारी
होडी पाहण्यात
जो आनंद असतो
तोच कवितेचे कारण
आणि परिमाण असतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

कौर सिस्टर .





कौर सिस्टर .

ती सदैव सज्ज येथे
हाती घेवून ईमान आहे |
जीभ नव्हे तिची ती  
तेज अकाल कृपाण आहे |
नानकांचे प्रेम ती
गोविदांचा बाण आहे |
रुग्णांसाठी माय मवाळ
आळश्यासाठी सैतान आहे |
आत बाहेर काहीच नाही
स्वच्छ आरश्या समान आहे |
हि इतर कोण असणार
कौर माझी बहिण आहे  |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...