रविवार, १४ जुलै, २०१३

टी.व्ही.पाहणाऱ्या मुलांवर





सोफ्यावर बसतात
वेफर चॉकलेट घेवून
मुले सदा रंगतात
कार्टून चँनल लावून
शाळेत जाण्यापूर्वी
शाळेतून आल्यावर
झोपतांना थोडे जरा
रोज सकाळी उठल्यावर
खेळायला जात नाही
त्यांना मुळी मित्र नाही
असले तरी ते ही
कार्टून सोडून येत नाही
अँनिमेक्सचे तत्वज्ञान
शिनचान गुरु होतात 
रामायणी संस्कारांना    
आताच अशक्य म्हणतात
आई बाबा कामा जाती
थकुनिया घरी येती
पगाराच्या बेरजेवर
सुख समीकरणं सारी जुळती
घरामध्ये आजी वगैरे
आजकाल बहुदा नसते
असली तरी तिलाही
तिचे जगणे हवे असते
रिटायरमेंट पेन्शनचे
सुख भोगणे हवे असते
टीव्हीचे दावण पोरांना
छान बांधून ठेवते
पी.सी. असेल तर मग
ते फारच गोमटे
बाकी,बाहेरची दुनिया
तरी काय धड आहे
विपरीत कुठे कुठे
काय काय घडत आहे
त्याहून बरी मुले घरात
रमोत टीव्ही काँम्पुटरात 
चार भिंतीत निदान
सुरक्षित राहतात
नजरे समोर दिसतात
टी व्ही पीसी म्हणूनच
सगळ्यांची गरज आहे
चुकतय जरी बरच काही
तरीही नाईलाज आहे

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/





गुरुवार, ११ जुलै, २०१३

होवू दे आघात

होवू दे आघात
साहतो आघात
साहता साहता
ठिणगीची आहे
वाट मी पाहत 
होईल मग
सारे भस्मसात
परंतु तोवर
होवू दे आघात
साहतो आघात
ठिणगीचा जन्म
आहे निश्चित
त्यासाठी पण
होणे आहे तप्त
साहत आघात
म्हणून म्हणतो
होवू दे आघात
साहतो आघात

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ९ जुलै, २०१३

स्वामी स्वरुपानंदानी..






जिथे आणून ठेवले  
ज्ञानेश्वर माऊलींनी
तिथून पुढे नेले
स्वामी स्वरुपानंदानी

जवाहर अगणित
दिले मज माऊलींनी
वापरावे कुठे किती
शिकविले श्री स्वामींनी

एकेक अलंकार तो
दाविला अतिप्रेमानी
कलाकुसर त्यातील
अवघी उलगडूनी

पाहतांना तया ऐसे
नवीन मी त्या दिठीनी
नवलाईने तयाच्या  
गेलो पुन्हा हरखूनी

दिव्य अनोख्या दीप्तीनी
पुन्हा स्तिमित होवूनी
कृपेनी पुनरपी त्या
अवघा चिंब भिजुनी

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, ८ जुलै, २०१३

यौवन




उसळत्या उत्साहाने यौवन
भेटते जीवनाला रसमसून
सोनेरी पंख लावून
उडते भविष्यात आनंदान
अपार उत्सुकतेन भारून
अनंत आशेने उजळून
साजरे करत छोटेसे क्षण
आयुष्य होते जणू एक स्वप्न

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अर्धाकप प्रेम






आज दुपारी
नकळत चहा
दिडकप झाला
तुला द्यायला
मी दुसरा
कपही उचलला
तू नाही
हे आठवताच तो
टचकन हिरमुसला
तू तर आता
दूर कुठेतरी  
कामावर चहा
घेत असशील
मला माहित आहे
या चहाला नक्कीच
मिस करीत असशील


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ६ जुलै, २०१३

कानफाटा



बुजक्या कानाच्या कानफाटा मी
अलख निरंजन ध्वनी मनी
होम धडाडे सोहम अंतरी
अन देहाच्या वीणेमधुनी
तत्वमसीचा नाद झंकारी
पवनच्या या वावटळीतून
मन उसळते देह सोडून
जाते वरवर स्थिर होवून
निजते घेवून शून्य उशाला
त्या निद्रेत मी नसलेल्या
असते केवळ निळे आकाश
भरून उरतो शुभ्र प्रकाश
स्वप्न हि कुणा कळू लागते
जीवनाचा अट्टाहास

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...