मंगळवार, ५ मार्च, २०१३

वांड गुराची गोष्ट



वांड गुराची शेपूट पिरगाळून
त्याला आणावे गोठ्यात बांधून
तसे माझे लग्न ठरवून
उभे केले मला मांडवात आणून
अन बांधावे गळ्यात एक खोड
तसे बांधले संसार जोखड
दिले मग पुन्हा सोडून
हिंडतोय मी तेव्हापासून
सांगत जगाला ओरडून
अलंकार हा फारच छान
या घ्या सारे अडकवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ४ मार्च, २०१३

आरती प्रभू

                                       
                                                

आरती प्रभू नावाची
एक गूढ गोष्ट आहे
कधी कळणारी तर
कधी नच कळणारी
कधी कळतेय असे  
वाटत असतांनाच     

आपणा भोवळणारी   
हरवून टाकणारी       
हि गोष्ट घेवून जाते    
आपल्याला धुंदावत    
हिरव्यागार रस्त्याने    
पाखरांच्या गाण्यातून  
झऱ्याच्या नादामधून    
सुमधुर स्वप्नातून        
आळूमाळू रूपातून          
हळू हळू आपणही        
आत जातो नादावून
एका अनाकलनिय
अनोख्या दुनियेत
अन तिथे ती गोष्ट
आपल्याला एकदम
एकटे सोडून जाते
मग जाणवतात
मोहक वाटणाऱ्या त्या
वृक्षांच्या फांदी फांदीत
लपलेले अजगर
हिरव्या पानामागील
काळा काळा अंधार
पायाखाली सळसळ
झुडूपात वळवळ
उरतो केवळ एक
जीवघेणा एकांत
अन हि गोष्ट संपते

विक्रांत प्रभाकर


रविवार, ३ मार्च, २०१३

लग्नाची गोष्ट




नवीन लग्न झाल्यावर
सुख येते अंगावर
सुखाच्या लाटेवर
दिवस जातात भरभर .
हळू हळू सुखाची
नशा जाते उतरत
बारीक सारीक गोष्टी
मग राहतात खुपत .
वडीलधाऱ्यांनी दिलेला
मंत्र तडजोड आठवत
आवडी निवडीस जातो
थोडी मुरड घालत .
गुणदोषां सकट
संसार चालतो ओढत
मुलाबाळात कामात
वर्ष जातात उलटत .
एक दिवस अचानक
मुलं  मोठी होतात
एकटेच आहोत आपण
येते आणि ध्यानात .
ज्याला प्रेम मानलं होत   
ते काही वेगळच होत
तडजोडी मग साऱ्या
वाटू लागते फरफट .
अश्यावेळी काय करावे
कुणासाठी जगावे
सार सार सोडून दयावे
का दिवस रेटत जगावे .
एका कडेलोटावर
येवून जीवन उभे राहते
निर्णय काही घेतला तरी
हार हि आपलीच असते .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



ll नर्मदा ll









रेवा तीरावर l संपावे जीवन
पापाचे क्षालन l व्हावे सा-या ll ll
नर्मदा हरच्या l घोषात चालून
दयावी उडवून l भवचिंता ll ll
तप:पूत मन l तप:पूत तन
अवघे होवून l जावे तेथे ll ll
माईच्या प्रेमाने l भिजुनिया चिंब
पात्रातील थेंब l तिच्या व्हावे llll
सोडुनिया भिती l काळजी उद्याची
जगावी रोजची  l सुख दु:ख llll
तीरावर उभे l संतांचे आशीष
तयाने जीवास l मार्ग लाभ llll
कितीदा ऐकली l माईची ती माया  
जीव तिच्या पाया l जडलासे llll
साद घालतसे l युगे युगे वाहे
चल लवलाहे l आता तिथे ll ll
जावे परीक्रमे l तिये दर्शनासी
उतावळी ऐसी l होय मना llll


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



चित्र



हलके हळवे

धूसर धुकट

चित्र उमटते

पुसट पुसट .

चित्र लडिवाळ

मधाळ लाजरे

चित्र नखरेल

नाजूक नाचरे .

चित्र थिरकते

लयीत फिरते  

चित्र मनातील

गझल बोलते .

कधी उन्हातील

ओले रिमझिम

कधी जलातील   

शारद चमचम .

कधी श्वासातील

धगधग उष्ण

कधी वेळूतील

तगमग कृष्ण .

प्रियतम तरी

जाते निसटत

रंग नभातील

डोही हरवत .


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २ मार्च, २०१३

दु:खाने चिंब भिजलेली ...





दु:खाने चिंब भिजलेली
कविता वाचतांना  
दु:खाने कदमदलेले जीवन
ओढत चालतांना
किती आधार वाटतो मला
त्या शब्दांचा
शब्द सांगतात मला
दु:खाचे चिरंतन सत्य
मानवी जीवनाचे अटळ प्रारब्ध
आणि माझी व्यथा होते
साऱ्या मानव जातीची
माझ्या दु:खातील मीपण
जाते वितळून
मग मी वेगळा होवून ,
सारे दु:ख खिशात ठेवून
थोपटतो त्याला असू देत म्हणून
आणि मानतो आभार
दु:खाच्या प्रत्येक कवितेचे
वेदनेची फुले वेचणाऱ्या
प्रत्येक कवीचे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...