रविवार, ३ मार्च, २०१३

लग्नाची गोष्ट




नवीन लग्न झाल्यावर
सुख येते अंगावर
सुखाच्या लाटेवर
दिवस जातात भरभर .
हळू हळू सुखाची
नशा जाते उतरत
बारीक सारीक गोष्टी
मग राहतात खुपत .
वडीलधाऱ्यांनी दिलेला
मंत्र तडजोड आठवत
आवडी निवडीस जातो
थोडी मुरड घालत .
गुणदोषां सकट
संसार चालतो ओढत
मुलाबाळात कामात
वर्ष जातात उलटत .
एक दिवस अचानक
मुलं  मोठी होतात
एकटेच आहोत आपण
येते आणि ध्यानात .
ज्याला प्रेम मानलं होत   
ते काही वेगळच होत
तडजोडी मग साऱ्या
वाटू लागते फरफट .
अश्यावेळी काय करावे
कुणासाठी जगावे
सार सार सोडून दयावे
का दिवस रेटत जगावे .
एका कडेलोटावर
येवून जीवन उभे राहते
निर्णय काही घेतला तरी
हार हि आपलीच असते .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



ll नर्मदा ll









रेवा तीरावर l संपावे जीवन
पापाचे क्षालन l व्हावे सा-या ll ll
नर्मदा हरच्या l घोषात चालून
दयावी उडवून l भवचिंता ll ll
तप:पूत मन l तप:पूत तन
अवघे होवून l जावे तेथे ll ll
माईच्या प्रेमाने l भिजुनिया चिंब
पात्रातील थेंब l तिच्या व्हावे llll
सोडुनिया भिती l काळजी उद्याची
जगावी रोजची  l सुख दु:ख llll
तीरावर उभे l संतांचे आशीष
तयाने जीवास l मार्ग लाभ llll
कितीदा ऐकली l माईची ती माया  
जीव तिच्या पाया l जडलासे llll
साद घालतसे l युगे युगे वाहे
चल लवलाहे l आता तिथे ll ll
जावे परीक्रमे l तिये दर्शनासी
उतावळी ऐसी l होय मना llll


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



चित्र



हलके हळवे

धूसर धुकट

चित्र उमटते

पुसट पुसट .
 

चित्र लडिवाळ

मधाळ लाजरे

चित्र नखरेल

नाजूक नाचरे .
 

चित्र थिरकते

लयीत फिरते  

चित्र मनातील

गझल बोलते .
 

कधी उन्हातील

ओले रिमझिम

कधी जलातील   

शारद चमचम .
 

कधी श्वासातील

धगधग उष्ण

कधी वेळूतील

तगमग कृष्ण .
 

प्रियतम तरी

जाते निसटत

रंग नभातील

डोही हरवत .


विक्रांत प्रभाकर
https://kavitesathikavita.blogspot.com /

शनिवार, २ मार्च, २०१३

दु:खाने चिंब भिजलेली ...





दु:खाने चिंब भिजलेली
कविता वाचतांना  
दु:खाने कदमदलेले जीवन
ओढत चालतांना
किती आधार वाटतो मला
त्या शब्दांचा
शब्द सांगतात मला
दु:खाचे चिरंतन सत्य
मानवी जीवनाचे अटळ प्रारब्ध
आणि माझी व्यथा होते
साऱ्या मानव जातीची
माझ्या दु:खातील मीपण
जाते वितळून
मग मी वेगळा होवून ,
सारे दु:ख खिशात ठेवून
थोपटतो त्याला असू देत म्हणून
आणि मानतो आभार
दु:खाच्या प्रत्येक कवितेचे
वेदनेची फुले वेचणाऱ्या
प्रत्येक कवीचे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

विदेही प्रीत


प्रवासात दूरच्या त्या
बाजूस होती माझ्या तू
स्पर्श सारे तुझे मग
देही माझ्या आले उतू ;

म्हटलो तुला रस्ता हा
नच संपवा कधीही 
हसली नुसतीच तू
नच समजुनी काही ;

थरथरत हिवाने
मजला बिलगलीस
सहज किती माझ्या
देहात वीज झालीस ;

मुक्त केस तुझे होते
भोवती गंध भारले
यौवनाचा वृक्ष देही
पान पान थरारले ;

तुला परी त्याची मुळी
जाणीव नव्हती काही
तुझी अबोध भावना
मग आली माझ्या देही ;

शुभ्र चंद्र पौर्णीमेचा
रिक्त सारे आभाळही
विसरुनी वादळास
प्रीत ही झाली विदेही  ;

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

काजव्यांची दिवाळी



तझ्या हाती काजवे ,
हळुवार देत होतो ;
हात तुझा हाती माझ्या ,
हलकेच घेत होतो ;

तो स्पर्श तुझा नवखा,
जणू की मागत होतो ;
चांदण्याच्या मोहराने,
देहात फुलत होतो ;

निरागस हासत तू ,
सारेच हाती घेतले ;
उजळल्या डोळी तुझ्या ,
मग मीच गात होतो;

घेवूनी क्षणात पुन्हा ,
तू तया सोडून दिले ;
काजव्यांची दिवाळी ती,
मीच उजळत होतो ;

विक्रांत प्रभाकर 




रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

माझ्या तुकोबाचे



माझ्या तुकोबाचे l बोल करुणेचे
भरले दयेचे l कृष्णमेघ ll ll
शब्दो शब्दी असे l शुद्ध कळकळ l
व्हावेत सकळ l सुखी इथे ll ll
तिथे मुळी नाही l कसला पडदा l
आरसा नागडा l  मना दावी ll ll
मुक्तीचे मौतीक l प्रत्येक शब्दात l
देई फुकटात l आल्या गेल्या ll ll
परी जपूनिया l ठेवी हृदयात l
तोच भाग्यवंत l भक्त सखा ll ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...