सोमवार, ३१ मे, २०२१

माझ्यातला मी

माझ्यातला "मी"
🌵🌵🌵🌵

माझ्यातला "मी "
मला न कळतो 
परी चालवतो 
जीवनाला ॥

माझेपणी उभी 
जीवनाची सत्ता 
परी '"मी"' चा गाता 
सापडेना ॥

जोडू मोडुनिया 
"मी" च्या सावलीला 
वाहतो कोणाला 
कोण येथे ॥

म्हणतो "मी" ज्याला 
लागेना हाताला 
पारा पकडला 
चिमटीत ॥

आहे तरी नाही 
असा "मी" जो काही 
जैसा जैसा पाही 
सर्वकाळ ॥

फुटू देत दत्ता 
"मी" पण गोठले
जाणिवी निदेले
विक्रांतच्या ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, ३० मे, २०२१

अमृत अंगणी


अमृत अंगणी
*********

ज्ञानदेव मेघ
करुणा अपार
वोळे वारंवार
विश्वासाठी ॥

म्हणुनिया चाड
उपजली चित्ती
आपण कोण ती
जाणण्याची ॥

अमृत अंगणी 
चोच उघडूनी 
चातक होवूनी 
उभा राही ॥

कुठला थेंब तो 
असेल रे माझा
कुठल्या ढगांचा 
ठाव नाही  ॥

थेंबा थेंबावर 
काय नाव असे
ठाऊक ते नसे
मज लागी ॥

असंख्य अपार 
बरसती मोती 
जयास भेटती
भाग्याचे ते  ॥

परी या पक्षाची 
इवलीशी आर्ती 
थेंबुट्या पुरती 
ज्ञानदेवा ॥

होईल सुदैवी 
विक्रांत जगता
कृपेची लाभता 
तुझी सर ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

 

शनिवार, २९ मे, २०२१

गजवदना


गजवदना
🌺🌺🌺

हे गजवदना 
गौरी नंदना 
नमितो चरणा 
मी तव बालक ॥

देवा दयाळू 
भक्तवत्सलु 
सदा कृपाळू 
नाव तुझे रे ॥

मंगल चरणी 
तुम्हीच येउनी 
घेता करूनी 
कार्य सारी ॥

तुजला पाहता 
विघ्न पळती 
सुखा उगवती 
कोंब नवे रे ॥

तुझ्या भक्तीविन 
अन्य न  मागणं 
मी हेच मागणं 
मागे तुजला ॥

नामस्मरणी 
चित्त रंगुनी 
तल्लीन होऊनी 
जावू द्या ॥

तुझ्या प्रीतीचे 
भावभक्तीचे 
गाणं हे साचे 
मला स्फुरो ॥

शब्द लाघव 
मनीचे मार्दव 
अचूक भाव 
साकारू द्या ॥

तुझेच घेऊन 
तुजला वाहून 
करतो नमन 
सर्वाधिशा ॥

विक्रांत अज्ञानी 
घे सांभाळूनी 
जनी वनी मनी 
अन एकांती ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

चाफा फुले

चाफा फुले
********

फुले चाफ्याची 
केशर पिवळी 
घमघमणारा 
सुगंध भारली ॥

आज अचानक 
समोर आली 
मधु स्मृतींनी 
ओंजळ भरली ॥

श्री गिरणारी 
पाऊल पडता 
नाव तुझे अन 
ओठी स्फुरता ॥

लक्ष फुलांचा 
हाच दरवळ 
वेढून मजला 
होतास जवळ ॥

पथा वरती 
पथा भोवती 
वाहना मध्ये
अवती भवती ॥

भान हरवले 
शिखरी गेले 
अंतरात वा 
खोल घुसले ॥

झिंग नसूनी 
होतो झिंगलो 
फांदीचे जणू 
पानच झालो ॥

कणोकणात
दत्त भिनला 
दत्त भेटला 
या विक्रांतला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

शुक्रवार, २८ मे, २०२१

माणिक प्रभू


श्री गुरू माणिक प्रभू 
****************
दिव्य अद्वैत प्रकाश
करी भक्तीत प्रवेश
नित्य निर्गुण असून
घेई लीलाधारी वेष 

दत्त अनंत आकाश
होय मुर्त चि सुवेश
करी पूजन अग्नीचे 
जणू अग्नीचाच अंश ॥

तेज प्रदीप्त सूर्याचे 
जणू ठेविले काढून 
अन मार्दव शशीचे
प्रेमे जाते ओसंडून॥

असे दीनदुबळ्यांचा 
प्रभू नित्य सहचारी 
प्रेम भक्तीला भक्तांच्या 
नित्य भुकेला अंतरी ॥

गीते अद्भुत सुरेख 
ज्ञान भक्ती मिरवती
अन् गातांना प्रेमाने 
जीवा येई अनुभूती ॥

काही भेटी झाली गीती 
काही जाणीव विक्रांती 
अंश किरणांचा लाभे 
जडे तयावर प्रीती ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, २७ मे, २०२१

भक्त रक्षक

भक्त रक्षक 
💮💮💮

दत्त करुणा निधान 
भक्त रक्षण हे वाण
हाती त्रिशूळ धरून 
करी रिपूचे हरण ॥

खल निर्दालन करी 
वधि दुर्जन तस्करी 
भस्म लावून कपाळी 
प्रिय आपले स्वीकारी ॥

दत्त तर्कटा अघोर 
दत्त पतीता कठोर 
जीवप्राण ओवाळीता
दत्त प्रेमाचे माहेर ॥

दत्त सांभाळी सावरी 
नसे कथा पुराणाची 
भक्त सांगतात ओठी
हे तो बोलो प्रचितीची॥

दत्त समर्थ जगात 
नरहरी वल्लभात
स्वामी शंकर होऊन 
सदा राही लेकरात ॥

धूळ तयाच्या पायाची 
विक्रांत शरण जातो 
दुःख संकटाची सेना 
उडे फुंकरी पाहतो ॥
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

बुधवार, २६ मे, २०२१

बुद्धत्व


बुद्धत्व
******

सत्याच्या शोधात बाहेर पडतात 
आजही अनेक राजपुत्र 
अनेक धनिक पुत्र 
कुबेर विद्वान सरस्वतीपुत्र 
उच्चविद्याविभूषित 

भोगाच्या अन  भौतिक सुखाच्या 
परमोच्च शिखरावर पोहोचूनही 
परत येतात मागे 
अतृप्ती असमाधान असंतोषाचा 
वन्ही पेटून अंतरात 

होय आजही जन्म घेतात 
महावीर बुद्ध रमण रामकृष्ण व कृष्णमूर्ती
आणि निघतात शोधाच्या त्या वाटेवर 

सारेच पोहोचतात मुक्कामावर 
असे जरी नाही 
पण वाहत राहते ती ऊर्जा 
प्रवाहित होत देह देहांतरात 
कारण उर्जेला कधीच नसते मरण 
अन मग होताच विलय 
घडताच विघटन 
त्या ऊर्जेचे त्या प्रज्ञेचे त्या प्रश्नाचे 
एका महान शून्यात 
गहन ऊर्जेच्या सागरात 
बुद्धाचा जन्म होतो 

अन् हजारो बोधिसत्वांच्या हृदयात 
जागी होते एक अभिलाषा 
आशा मुमुक्षा तितिक्षा 
शक्यतेच्या क्षितिजावर उमटलेली 
स्वप्नाहून सुंदर सत्यता 

गौतमाचा बौद्ध होणे 
असतो एक मानबिंदू 
मनुष्य जीवनासाठी 
संपुर्ण मानव प्रजातीसाठी 
तो असतो विषय
अभिमानाचा आशेचा आस्थेचा  

एक आधार 
त्या शोधकर्त्यांना
एका सार्थ मदतीसाठी,
मार्गदर्शनासाठी

बुद्धत्व ही फक्त एक 
नवी आचारसंहिता नसते 
बंडखोरांसाठी 
ती एक आंतरिक क्रांती असते 
आमूलाग्र बदल घडवणारी 
मानवाचा महामानव घडवणारी
म्हणूनच त्या मानबिंदूचे 
स्मरण नमन अभिनंदन करणे ही 
मानव जातीने कृतज्ञापुर्वक 
करायची  गोष्ट आहे .
नमो बुद्धाय .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...