शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

अपघात



अपघात
******

सकाळपासून रात्रीपर्यंत
लोक असतात धावत

कुणीही कुणाला
नाही ओळखत
या शहरात

नाही म्हणजे
तरीही सगळी
माणसे असतात
शिकलेली सुसंस्कृत
उच्च पदस्थ
पण आता फक्त
गर्दी असतात

एका मागून एक
गाड्या येत असतात
पुढे जायचे असते
प्रत्येकाला
केवळ पुढे
पण कसे जणू याच चिंतेत
सारे अस्वस्थअसतात

अन मिळताच सिग्नल
सारे सुसाट पळत सुटतात


रस्ताही हरवत नाही
गाड्याही संपत नाहीत


होतो अचानक एक अपघात
अन् चाके सगळी थांबतात
आई गं बाप रे अर्रेरे
चित्कार जिवंत उमटतात

सुन्न होतात काही
तर काही
पुन्हा चालू लागतात

बंद दरवाजे काही मनाचे
उघडणे विसरले असतात


तास काही मिनिटांतच
रस्ता साफ होऊन जातो
तोच धूर तीच धूळ
पुन्हा श्वास बधीर होतो


अन त्या गदारोळात
जीवन मरणाच्या या संघर्षात
कुणासाठी कुणी तरी
आपला जीव धोक्यात घालतो
मरणाच्या दारातून
कुणी कुणाला खेचून आणतो

मानवतेचा मंगल एक
प्रकाश सर्वत्र पसरतो
एका अनाम ऊर्जेचा
स्पर्श प्रत्येक मनास होतो

तेव्हा
...

फूटपाथच्या सिमेंटी रुजलेला
एक पिंपळ हळूच हसतो

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

दत्ता तुझा काही भास





दत्ता तुझा काही भास
मिरवितो माझा श्वास
पिटतो नि ढोल मोठा
पाहा म्हणतो जगास ॥

वाचलेल्या चरीत्रात
धडा  एक वाढवतो
गोवुनिया स्वतः त्यात
दिवा स्वप्न रंगवितो ॥

मनातील आसक्तीला
जणू तुझे रूप देतो
बदलून हवे पण
धन्य धन्य म्हणवितो ॥

सत्त्वाचिया माडीवरी
रजा तमा धुत्कारतो
अहा थोर अहंकार
दत्त पदी मिरवितो ॥

जाणीवेत ठसठस
जीव सैरभैर होतो
सोडू कसे हातातले
रिक्तपण नाकारतो ॥ 

पाहणारे डोळे पण
आंधळे ते होत नाही
खळखळ तळमळ
द्वैताची सरत नाही
***
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

सेवा ही घडेना




 सेवा ही घडेना
 ***********
काही केल्या देवा
सेवा ही घडेना
कारणी लागेना
देह माझा ॥

व्यर्थ गेला जन्म
बघ संसारात
देह राखण्यात
रात्रंदिनी ॥

तुझी याद जरी
बाळगी मनात
परी जगण्यात
वहावतो ॥

मनाचा बंधक
देहाचा याचक
मुढ कवतुक
संसाराचे॥

तुझ्याविना दत्ता
जीव रात्रंदिस
होई कासावीस
व्याकूळ हा॥

तुझा अपराधी
जरी मी अनंत
तुझाच विक्रांत
आहे ना रे॥
**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

ती गेली खाली पडून

ती गेली पडून
**********

ती मेली पडून खालती
सुमन कोवळी पोर होती
स्वप्न साजरे होते डोळी
गोड खळी गालावरती

दोष कुणाला द्यावा कुणी
वा स्वीकारूनी जावे पुढती
असंख्य लोटी जन धावते
दक्षिणेकडे हे जगण्यासाठी

रोज मुठीत प्राण आपुला
गर्दी मधला घेऊन जाती
कुणास ठाऊक उद्या कोण
पकडत असेल गाडी शेवटी

अगो बाळ ग तू नच मेली
तुला मारले या शहराने
रुळाजवळ अन हरवले
जीवन भरले मधुर गाणे

उद्या तरीही तोच लोंढा
कोंडवाडा डब्या मधूनी
धावेल पुन्हा जीव घेऊनी
 मरणाशी नि पैज लावूनी

आणि पुन्हा पडेल कुणी
नाजुक राकट हात निसटूनी
रडेल मी ही सवे आणखीन
एक बातमी येईन छापूनी

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

++++

दत्ताने वेढला




दत्ताने वेढला
*********

तुज लागी दिले
मन माझे देवा
आणिक ती सेवा
करू काय ॥

लावी कामकाजा
लावी व्यवहारा
लोक उपकारा
मर्जी तुझी ॥


घाली ज्ञान चारा
देई ध्यान वारा
भक्तीचा साजरा
वृक्ष करी ॥

हरेक प्रवाहा
आश्रयो उदारा
गंभीरा सागरा 
कृपानिधि   ॥

होऊनी तुझा मी
मागतो तुजला
द्वैतात प्रेमाला
बळ भारी ॥

विक्रांत वेगळा
हिम पाण्यातला
दत्ताने वेढला
सर्वव्यापी ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

मोडली चाकोरी




मोडली चाकोरी
*****
पडोनिया गेला
बघ हातातला
संशय जोडला
जीवाने या॥

सुटोनिया पळे
बळे जो बांधला
श्रद्धेच्या खुंट्याला
अहंकार ॥

मोडले तोडले
घर ते बांधले
आशेचे थोरले
साक्षात्कारी ॥

उदास वासना
जळे संवेदना
दत्ताची कामना
जोपासली ॥

विक्रांत उघडा
जाहला डोंगर
वृक्ष माथ्यावर
पेटलेला ॥

पाहातो कौतुक
दत्त अभ्यंतरी
मोडली चाकोरी
गंतव्याची ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

++++

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

बीज



बीज
***
बीजाचा विस्फोट
जाहला समूळ
म्हणूनिया मूळ
रुजू आले ॥


किडल्या बीजास
काय गती असे
माती होत हसे
कणकण ॥


भाग्याचे अंकुर
भेटली कुणास
हिरवे पणास
लपेटून ॥


जीवनाचे खेळ
जीवना ठाऊक
जगणे घाऊक
जगणाऱ्या ॥


केवळ ही कृपा
करी माय बापा
पुण्य अन् पापा
मोजू नको ॥


विक्रांत बीजात
कोटी संभावना
परी थेंबा विना
उणा दुणा ॥


ओघळ पाघळ
दयेच्या दयाळ
श्रीदत्त कृपाळ
दयाघना ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
++++

 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...