शनिवार, २५ मार्च, २०१७

फसली बिचारी



फसली बिचारी
***********

सुख उधळण
जीवनी करून
आलास घेवून
क्षण काही ||

अतृप्तीचे दान
आकंठ घेवून
हृदयी कोंदण
केले तुज ||

देसी रात्रंदिन
आठव यातना
काहीच सुचेना
तुजविना ||

नच ये मजला
सांगता साजणा
प्रीतीच्या भावना
शब्दांमध्ये ||

भक्तीच्या वाटेने
जीवन अर्पावे
रुपा वा धरावे
मनामध्ये ||

म्हणती राधिका
फसली बिचारी
आनंद कल्लोळी
हृदयात ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे





शुक्रवार, २४ मार्च, २०१७

धन्य गिरनार



माझे ते माहेर |
क्षेत्र गिरनार |
बाप दिगंबर 
आहे तिथे ||

भाग्याचे सोयरे
तुम्ही बंधुराज
आला दत्तराज
भेटूनिया ||

सासुवासिनी    
करी विनवणी
एकदा घेवूनी
जावा तिथे ||

करता स्मरण
सुखाचे स्फुरण
आनंदाचा कण
होय विक्रांत ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


गुरुवार, २३ मार्च, २०१७

अमावस्या पांघरून




अमावस्या पांघरून
उगवतो चंद्र कधी
असूनही नभांगणी
दृष्टी येत नाही कधी ||

अशी प्रीत नशिबात
येवू नाही कुणा कधी
मिटूनही अस्तित्वाला
थांग लागतो ना कधी ||

लाख स्वीकारतो जन्म
मन स्वीकारत नाही
जळूनिया जाते जग
कुणा कळतच नाही ||

हासुनिया मिरवता
शब्द सजतात जरी
कुणाविना जगतांना
शर घुसतात उरी ||

उधळल्या कुसुमांना
झेलण्यास गेलो कधी 
पावसात निखाऱ्याच्या
ब्र ही मुखी न ये कधी ||
 
पथावरी आखलेल्या
जीवनाचे गाडे चाले
कुणा इथे फुरसत
कोण कुणाविना गेले ||

ताटव्यात गुलाबाच्या
कुणीतरी मग्न आहे
भुरळतो वाटसरू
थोडे डोकावण आहे ||

चला नसे हे ही थोडे
गंध गुलाबाचा आला
पाया खाली काटे तरी
जन्म फुकट न गेला ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 


बुधवार, २२ मार्च, २०१७

तिढा




तिढा
****

तुला उगा पाहण्याला  
मन उत्सुक असते
तुझ्या मुग्ध हासण्याला 
मन अंतरी कोरते  

तुझ्या क्षण असण्याला
रोज प्रार्थत असते
निमिषांच्या भेटीमध्ये
युगांचे तम मिटते

तू असून भोवताली  
योजन दूर असते  
तुडवीत नव्या वाटा
जगणे तुला शोधते

हे कसे सुटावे कोडे
तू आयुष्य व्यापलेले
वा भास हातामधले
असोत हाती भरले

मी उधळू भावनांना
का उगा होवून वेडा
तू सांग राधिके मज  
हा कसा सुटावा तिढा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




मंगळवार, २१ मार्च, २०१७

कृपा







 कृपा

वळवाच्या पावसागत ते तिचे येणे  
अपेक्षा नसतांना धो धो बरसणे
आणि मज देवून जाणे ||
शीतलता ||

हे उपकार म्हणावे जीवनाचे
की वरदान कुठल्या तपाचे
सुकलेल्या तरूवराचे ||
जीवन ती ||

ती एकांतात फुललेले गाणे
ती निरवतेत उमटले तराणे
माझे मलाच कळणे ||
आत्मरूप ||

आलीस पण सांग का थांबशील 
वा झुळूक होवून निघून जाशील    
सांग चांदणे नभातील ||
किती काळ ||

हे सुख ओघळले न मागता
हे फुल उमललेले न सांगता
हे गीत उमटले गाता गाता ||
अवचित ||

मी जाहलो आभाळ आता
मी वारा मुक्त चिंब सरिता   
जीवन कृपा ओघळता ||
मजवरी ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 




रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...