मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

जुना मित्र भेटला




जुना मित्र भेटला
भर भरून बोलला 
जुन्या आठवणींना
मिळाला उजाळा ..
इतिहासाच्या बाईंचे
राजकीय विचार
जीवशास्त्राच्या बाईंनी
दिलेला  मार  ..
परफेक्ट नोट्स देणारे
भौतिकचे सर
न कळे कसे झालेले
आमचे हेडमास्तर ..
पुन्हा जणू सारे
झाले होते गोळा
काळ जणू होता
हळूच मागे सरकला ..
मित्रांच्या आठवणी
परीक्षेच्या आठवणी
मधल्या सुट्टीत
गाईलेली गाणी ..
मग हलकेच तो म्हणाला
ती मेघा कुठे असते रे ?
सहज आठवले
म्हणून विचारले रे !
त्या वेळी त्याचा आवाज
झाला होता वेगळा
डोळ्याच्या कोपऱ्यात
भाव होता भिजला ..
त्या क्षणी तो
नव्हता या जगात
खोल खोल आत
होता काही पाहत..
पाहता पाहता
लगेचच सावरला
विषय बदलून
दुसरे बोलू लागला ..
मग मलाही तेव्हाचे  
ते सारे आठवले
आम्ही त्याला तिच्यावरून
होते खूप चिडवले ..
तो तेव्हा रागवायचा
त्वेषाने नाही म्हणायचा
पण ती समोर दिसताच
आनंदाने फुलायचा ...
वर्ग चालू असतांना
हळूच तिला पहायचा
सुट्टीत तिच्या गल्लीत
बहाणे काढून जायचा ..
आणि तिला हि तो
नक्कीच आवडत असावा
तिच्याही डोळ्यात तेव्हा
फुले चांदण्यांचा ताटवा ..
शाळा संपली दोन्ही पाखरे
दोन दिशांना उडून गेली
डोळ्यातील भेट त्यांची
डोळ्या पर्यंतच राहिली ..
तो आता स्थिरावला होता
नोकरीत मोठ्या पदावर होता
सुंदर श्रीमंत पत्नी व
दोन मुलांचा बाप होता ..
ती कोठे आहे हे
मलाही माहित नव्हते
एकदा कधी रस्त्यावर
मी तिला पहिले होते ..
सोबत तिच्या तेव्हा
एक गोड मुल होते
जीवन तर सदैव
पुढेच वाहत असते ..
त्याच्या त्या कहाणीला
काहीच अर्थ नव्हता
साऱ्याच कळ्यांनी फुलायचे
असा काही नियम नव्हता ..
पण त्या रेशमी कहाणीची
एक स्मृती सदैव रेंगाळत
होती त्याच्या मनात
होती खुपत की होती सुखावत..
कुणास ठावूक मी हि
विषय मग वाढवला नाही
त्या त्याच्या चिर सौख्याला
वर्तमानात आणले नाही ..  
पण तो मित्र मला
पुन्हा खूप आवडू लागला
पुन्हा भेटला म्हणूनही
आणि अजून वर्गात आहे म्हणूनही  ..

विक्रांत

http://kavitesathikavita.blogspot.in/







शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

गोंदवलेकर महाराजांची शिकवण




राम राम राम
वाचे ना आराम
एकच हे काम
करा सुखे

बाकी ते सारे
होणार होणारे
चिंता नको रे
करूस जीवा

परी ना सोपे
मन हे नाटोपे
बसताच झोपे
केले वश

विचार हि उगा
घालती पिंगा
भोगुनी जगा
अतृप्त सदा

परी तयासही
एकच उपाय  
नाम घेत जाय
दृढपणे  

मनाचे शत
पुन:पुन्हा वाचावे
हरिपाठा जावे
अन्यन शरण

कृपाळू ते संत
धरतील हात
देतील साथ
साधनेत

नामाचा तो व्यय
न करी क्रोधी 
न लागो उपाधी
कुठलीच

नामासाठी नाम
हेच साध्य साधन
अंतरात खुण
घ्यावी ओळखून

सगुण ते निर्गुण
अंतरी जाणून
अन्यन शरण
जावे तया

चित्ती समाधान
रामेच्छे जीवन
ऐसे हे साधन
करावे जाणून


विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

ज्ञानेशाच्या दरबारी




ज्ञानेशाच्या दरबारी 
लावियली हजेरी
शब्दातून वारी
केली पुनःपुन्हा

अर्थरूपी अबीर
उधळला अपार
त्याचे मनावर
जाहले मुद्रण

तृप्तीने गेलो
अवघा भरून
जाय समाधान
ओसंडून

चित शब्दकळा
नव्या नवतीची
तहान मनाची
दुणावली


विक्रांत 
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

ए .आर .डी .एस पेशंट

रात्री ८ वाजता आलेला पेशंट
होता धापा टाकत सांगत
तीनच दिवसांचा ताप फक्त
दुपार पासून दम आहे लागत

पाहताच त्याला
ऐकताच हिस्टरीला
लगेच कळून चुकले मला
पेशंट ए .आर .डी .एस  आला

तरूण तीस वर्षाचा
धडधाकट देहाचा
कर्ता सवरता स्वामी घराचा
बाप मुलांचा पती कुणाचा

डायग्नोसिस कसले ते
डेथ सर्टिफिकेटच होते  
त्याला कळण्या आधी
मरण मला दिसत होते

भराभरा अॅडमिशन केले
त्याला आय.सी.यु.त नेले
अन वाटले होते तसेच
व्हेंटीलेटर वर टाकले

आता हाती काही नव्हते
मशीन काम करत होते
बघता बघता सॅटूरेशन
आणि झाले खाली पडते

चार तासाचा पाहुणा  
आमचा होता तो
त्याच्या त्या प्रवासाचा
मी फक्त साक्षी होतो

कळूनही मृत्यू
टाळता आला नाही
जाणूनही आजार
रुग्ण बरा झाला नाही

पुढचा सारा सोपस्कार
उरकला खरा  
हात ठेवून खांद्यावर
मृत्यू गेला जरा .

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

दर्शन रांग


दर्शन रांग लांब पसरत  
होती सरकत नम्रपणे
लक्ष घड्याळी चप्पल आठवत
उजळणी करत मागण्यांची  
अदृष्यातून काही अपेक्षित
श्रद्धा म्हणत लाचारीला  
जे न मिळे ते पकडू पाहत
लाच देत  दिव्यत्वाला
आखडत वर पाकीट सावरत
भाव आणत खात्रीवाचून
मिळवण्याला इहपर लोकात
चाले धूर्त गुंतवणूक

विक्रांत              

आत्मकृपा


कृपेवाचून गुरूच्या
देव भेटणार नाही
कृपेवाचून स्व:तच्या
गुरु भेटणार नाही

विफल  यत्नांच्या
बसून मनोऱ्यावर
साद हृदयातून जोवर
उमटणार नाही

आत्मकृपा तोवर
होणार नाही


विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१२

हॉस्पिटलच्या बेडवर


दोन वर्षाचे पोर
हॉस्पिटलच्या बेडवर
तुटुनिया दोर
आयुष्याचा
भोवताली डॉक्टर
स्वीकारून हार
अन आवारावर
करे आया
वाहे ऑक्सिजन
रित्या नळीतून
अर्धी इंजेक्शन
भोवताली
सुन्न बाप
बहिऱ्या कानान
डॉक्टरांच म्हणन
ऐकत उभा
वऱ्हांड्यात माय
घे भिंतीचा आधार
आसवांचा पूर
वाहे ऐकटीच
रक्त दाटले डोळ्यात
पिळ पडे आतड्यात
मन चिणले भिंतीत
ओल्या दगडी 

विक्रांत



रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...