रविवार, २९ जुलै, २०१२

पैजणे

थबकत थिरकत तुझी पावुले
येता वाजत
रुणझुण रुणझुण गाण वाटते
चाले पायात

डौल तुझा दंभ ही उमटतो
अचूक तालात
नाजूक पावला भार होतसे
असे जाणवत

या ध्वनीने चकित झाला
थबकून राहिला वात
पद तळीची मृतिकाही
शहारली सुखावत

पुराण वृक्ष वट म्हणाला
ऐकले हे प्रथमत
पुन्हा उर्वशी म्हटला पर्वत
डोळे आपले उघडत

आणि आसमंत धुंद झाले
राहिले तुजकडे  पाहत
तशीच चालते मंदपणे तू
सा-यांना  दुर्लक्षत

पायी ल्याली  सजली तुझिया
ती पैजणे धन्य होत
हाय अभागा करतो हेवा
त्याचा मी सतत

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

फार फार वर्षापूर्वी

फार फार वर्षापूर्वी
या जगात काही
निराळीच माणस होती .
त्या निराळ्यात..
एक वेगळीच ईच्छा होती
एक वेगळीच आस होती
आपल्या उगम पर्यंत पोहचायची
त्यांची तळमळ तीव्र होती
त्यांचे जीवन भेदून ती
शून्या पर्यंत भिडत होती
अंतरात खदखदते पेटलेपण 
डोळ्यात सैरभैर  वेडेपण
घेवून ती जगत होती
ब्रह्मांडातील कणाकणात
त्याची आच पोहचत होती
त्याची दाहकता अशी होती
की सृष्टीकर्ताही स्तंभित झाला
मनात म्हणाला
कळले रहस्य सृष्टीचे तर
जगणेच संपून जाईन
नकळे त्याला काय सुचले
दुसऱ्या दिवशी पहिले
तर त्या पेटलेल्या माणसांची
होती झाडे झालेली
हिरवीगार तजेलेदार
जणू आपल्या आदिमा
पर्यंत पोहचलेली
अन तेव्हापासून
ज्याला जीवन कळते आहे
तो झाड होत आहे

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २६ जुलै, २०१२

ये तूच मग तेथे

दारात ज्यांच्या धुत्कार गर्जतात
पायरीवरी अन श्वान भुंकतात 
स्वामित्व त्या घराचे नकोच केव्हा मला
दरिद्री स्वागताचे अप्रूप असे मला

त्या उभारल्या भिंती भीतीत चिणलेल्या
अन रोखल्या झडपा संदेही आक्रसलेल्या
घेवूनी धानिकतेला काय करावे असल्या
जगणेच शाप त्यांना पदी बांधल्या साखळ्या

दे मोकळे आकाश  झोपडी  विस्कटलेली
दे स्वतंत्रता  हृदयी  स्वागता  उत्सुकलेली
दे प्रेममयता ती भीती मुळी नसलेली
ये तूच मग तेथे  शोधीत जागा आपुली

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २५ जुलै, २०१२

श्री साईंनाथाय नम:

श्री साईंनाथाय नम:

तुझी करुणा दयाघना
ओघळली पुन्हा जीवना
तव प्रीतीची प्रचिती आली
पुन्हा एकदा मना

तू तो माझा तारणहार
सदा संकटी सावरणारा
हात धरुनी हाक मारता
सुखरूप घरी पोहचवणारा

तूच घडविले वाढवले मज
नकळत माझ्या मम दातारा
तव प्रेमाच्या ऋणात राहू दे
हेच मागणे पुन्हा उदारा

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २३ जुलै, २०१२

व्यर्थाच्या झाडाला

व्यर्थाच्या झाडाला
अर्थाचेच फळ
अर्थाच्या फळात
व्यर्थाचेच बीज
असा वृक्ष तू
वाढता वाढतो
व्यापुनिया  विश्व
कुठेही नसतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspt.in/

हा जन्म गूढ

जिथे जीव जडतो
स्वप्ने पाहू  लागतो 
जळतात फुले तिथे
प्राणात तम भरतो

हे प्राक्तन कसले
सूड भरल्या हाताने
कुणा सटवीने लिहले
मज कळेना असले

का पाहूच नये ती
बाग फुलांनी भरली
का धावूच नये ती
वाट हिरवळ दाटली

हा छंद तारकांचा
का मनातून जाईना
रुतले पाय मातीत
नजर खाली ढळेना

हा जन्म गूढ कोण
कुण्या वाटेवर चालवी
हे गंभीर इशारे का
दिश्या सारख्या वळवी


विक्रांत

http://kavitesathikavita.blogspot.in/

नीरव

   


नीरव शांततेत
सरोवर प्रशांत
घनदाट वृक्षात
वेढलेला एकांत

निळ्या आकाशात
निस्तब्ध वात
मनातील तरंग
स्तब्ध मनात

तुझ्या अस्तित्वाचे
स्पंदन  कणाकणात
आनंदाची उर्मी
दाटलेली अंतरात

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह) ******* कशाला श्रावणा येशी माझ्या दारा  घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा  तुजला पाहता आठवते कुणी   एकटे पणाची खंत ये द...