बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

चालले सोबत

चालले सोबत
**********

चालले सोबत कोण हात हातात देऊनी 
चालले सोबत कोण काठी हातात होऊनी

सावरले कुणी तव बळ पायात देऊनी 
काय घडते रे कधी हे घडविल्या वाचुनी 

पहिलीच पायरी ती जरी होती शेवटची 
पुरविली त्याने परी हौस या रे मनाची 

सवे हरेक भक्ताच्या ती माय चालत होती 
हात पायाखाली तीच हलके ठेवीत होती 

वल्गना ती चालल्याची जरी करी कधी कुणी 
देत असे शाबासकी  तीच श्रोताही होऊनी 

किती आणि काय वानू सांभाळले ठायी ठायी 
वाहिले सर्वस्व उणे कसा होऊ उतराई 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

डॉ रजनी जगताप सेवापूर्ती निमित्त

डॉ रजनी जगताप सेवापूर्ती निमित्त 
********
तुम्ही जर एकदा रजनीला भेटला 
तर तिला विसरूच शकत नाही 
तिचे वागणे बोलणे असणे वैशिष्ट्यपूर्ण आहे 
कारण ती एक हटके व्यक्तिमत्व आहे 

तिची मते ठाम आहेत त्या मता मागे 
एक वैचारिक आणि अनुभवाचा पाया आहे 
दुसऱ्याचे मत ती स्वीकारतच नाही असे नाही 
पण स्वतःची मते सहसा बदलत नाही 
केवळ जग चालते म्हणून ती चालत नाही 
कदाचित रजनी सर्वांनाच पचनी पडत नाही 
सर्वांनाच रुचत नाही पण 
एकदा का तुम्हाला तिची केमिस्ट्री कळली 
की तिच्या एवढी साधी व्यक्ती कोणीच नाही
रजनीची मते आणि स्वभाव हा मूल्याधारित आहे 
ती न्यायप्रिय आहे स्वातंत्र्यप्रिय आहे 
त्यात मांगल्याच स्पर्शही वात्सल्याचा अंश आहे 
तिच्यातील कठोरता करूणेतून आलेली आहे 
तरीही तिला जगाचे छक्के पंजे फारसे कळत नाहीतअसेच कधी कधी वाटते.
सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे राजकारण तिला उमजत नाही 

कारण ती एका नदीसारखी आहे 
ती पुढे जात राहते समोर येणारे सारे खड्डे भरत 
खडकांना फोडत वाळूची खेळत 
ती कड्यावरून झेपावते वळणांना मोडते 
तर कधी संथपणे वाहत राहते 
कड्यावरून झेपावतांना मस्ती करताना दिसते
तिच्यातील न लोपलेले बालपण 
ते संथपणे वाहताना दिसते 
तिने जाणलेले जगलेले जीवन 
ते तिचे वळणे घेताना दिसते 
तिने भोगलेले टाळलेले कडवट क्षण 

ती एक नैसर्गिक योद्धा आहे 
धाडसीपणा हा तिचा अंगभूत भाव आहे 
तिने असंख्य घाव झालेले आहेत 
आणि आत्मबलाने त्यांना बरेही केले आहे 
अनेक दृष्ट अदृष्ट शत्रूंना तोंड दिले आहे  
आणि सर्वांना पुरून ती उरली आहे 

ती हळुवार मनाची संवेदनशील व्यक्ती आहे 
दुसऱ्याच्या दुःखाने विरघळणारी 
ते मनापासून दूर करण्याचा प्रयत्न करणारी 
ती कर्तव्यनिष्ठ आहे 
कामात परफेक्ट होण्याचा प्रयत्न ती करते 
ती प्रामाणिकता तिच्यात आहे
म्हणून कर्तव्य टाळाटाळ करण्याची लोक 
तिला आवडत नाहीत 

खरंतर रजनी या शब्दाचा शब्दशः अर्थ 
रात्र असा आहे अन रात्र सदैव गूढ असते 
तसेच रजनी खूपशी गूढ आहे 
रजनीत दिसत असतात 
असंख्य तारे अनेक ग्रह उपग्रह नक्षत्र 
तसेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत 
काही कळतात काही कळत नाही
तरीही अल्हाद देतात 
आणि रात्री उमलतात अनेक फुले
मोगरा जाई जुई प्राजक्त निशिगंध 
जे शुभ्रता आणि सुगंध यांनी भारलेली असतात
तद्वत रजनीत ही शुभ्र सद्गुनाची सुमने 
भरलेली आहेत

काही लोक रात्रीला घाबरतात 
कारण रात्र त्यांना नीट कळलेली नसते .
जे खरोखर रात्र पाहतात जाणतात 
त्यांनाच रात्र आवडते 
तिथे जमलेल्या सारे त्यामुळेच भाग्यवान आहोत 
आपण रजनीला जाणतो तिला ओळखतो .
तिच्या निगूढतेवर आणि चांदण्यावर प्रेम करतो

 ती जीवन रसाने भरलेले सळसळते जीवन आहे
 तिच्या सेवापूर्ती निमित्त हिला खूप खूप शुभेच्छा
 अशीच आनंदी रहा हसत रहा 
आणि मुख्य म्हणजे गाणे गात रहा .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

द्वारकेत

द्वारकेत
******
त्याची गाणी दूर दूर 
द्वारकेच्या तीरावर 
तिची गाणी हुरहुर 
हृदयाच्या जळावर 

लिहुनिया किती वेळा 
पुसतेच ओळ ओळ 
पुन्हा पुन्हा अंतरात 
उमटते नवी ओळ

किती ओळी किती शब्द 
भरूनिया दिशा दाही 
किती जन्म किती अंत 
ओठावर येते काही 

यमुनेचे जल जरी 
यमुना उरत नाही 
हरवते विखुरते 
नाद लय चित्र वही 

लाटावर लाट उठे 
त्याला सारे सारे कळे 
ओठ मन मिटलेले 
त्याची खोली कुणा कळे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

पालखी

पालखी 
***
दत्त कुणा भेटतो का 
भेटतो वा साईनाथ 
वाहूनिया पालखीला 
चालूनिया घाट वाट

दत्त कुणा कळतो का 
करूनिया थाटमाट
सुटते का अंतर्गाठ 
करूनिया पूजा पाठ

चालण्यात तप घडे 
चालणे ते कुणा कळे
माळेमध्ये जप चाले 
स्मरणे ते कुणा वळे 

जीवनाशी गाठ पडे 
जगणे घडले तर 
अन्यथा येतेच आणि 
पुन्हा ती जातेच लाट 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

पॅरोलवर

पॅरोलवर
********
ती सुखाच्या शोधात गेली दूर दूरवर 
चार मोकळ्या श्वासासाठी 
पैसा पाणी उधळत 
चार दिवस स्वातंत्र्याचे सारे काही विसरत 
अवघडलेल्या नात्यातून सुटका करून घेत 
मनातून तिला जरी होते माहीत 
ते तिचे सुख पॅरोल वरचे आहे
बंदी शाळा घर तिचे वाट पाहत आहे 
तो. .
तो घरी एकटाच त्याच चक्रात फिरत 
बस लोकल चाकोरीत 
रोज त्याच त्याच पिळत 
होता तेच जीवन जगत 
त्याने तिला मुळीच फोन केला नाही 
कशी आहे म्हणून विचारले ही नाही 
तुरुंगाने का कधी स्वतःची 
द्यायची असते आठवण करून 
अन् अचानक त्याला ही आले कळून 
की तो सुद्धा पॅरोलवरच आहे म्हणून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

वाट

वाट
****
ती वाट चांदण्याची दिव्य पौर्णिमेची 
तुझिया दारीची आठवतो 

पाय थकलेले श्वास फुललेले 
मन आसावले दर्शनाला 

आठवे शिखर पूर्वेचा शृंगार 
मन निर्विकार शांत झाले 

आणि परतणे त्याच त्या देहाने 
घडले घडणे घडूनिया 

पुन्हा पुन्हा मन तेथे लूचू जाई 
कासावीस होई परततांना

तूच ठरविले तिथे येणे जाणे 
बहाणे गाऱ्हाणे खेळ सारा

बोलाव अथवा नको बोलावूस
देवा जे दिलेस तेही खूप

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

मरण हौस

 हौस 
********
माझी मरणाची  हौस 
दत्ता पुरणार कधी 
जरा जन्म ऐसी व्याधी 
सांग सुटणार कधी 

पोट टीचभर खोल 
रोज भरणे तरीही 
स्वप्न बेफाट बेभान 
नाही सरत कधीही 

किती फिरावे धावावे 
रोज तोच तोच दिस
व्यर्थहीनता जन्माची 
करे मज कासावीस 

कोडे सुटता सुटेना 
फोड फुटता फुटेना
दुःख ठसठस खोल
मुळी हटेना मिटेना 

किती करशील थट्टा 
किती पाहशील अंत 
झाली कुस्करी मस्करी 
उरी दाटलेली खंत 

जन्म विक्रांत ओंडका
वाहे कुठल्या डोहात 
देह चंदन बाभूळ 
नाही फरक पडत 

ओल जगाची देहात 
स्वप्न धूनीचे मनात 
येई उचलून घेई 
प्राण दाटले डोळ्यात
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...