बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

आदीशक्ती

आदिशक्ती
********
चित्ताची जाणीव चैतन्य राणीव 
जीवाचा या जीव आदिशक्ती ॥

खेळे महाभूती माय कुंडलीनी 
रूप रस गुणी साकारूनी ॥

प्राणाची वाहणी करे माऊली ती 
निरपेक्ष रीती भूतमात्री ॥

मन पवनाचाच्या राहूनिया संधी 
पांघरूनी गुंथी अज्ञानाची ॥

माय मी आंधळा आलो तुझ्या दारा 
डोळीयाचा सारा दूर करी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

काळकुट

 
काळकुट
*********
थांबलेले काळकुट ते पुन्हा वाहू लागले 
नसानसात पुन्हा का रे द्वेष जळू लागले ॥

कुणी किती थांबायचे हे भान गळू लागले 
मिठीतील मित्र उरी खंजीर मारू लागले ॥

झाकली जखम होती आत रक्त कुजलेले 
मनोमनी कोंडलेले ते साप पळू लागले ॥

गाव बदलून कोणी घर छान सजवले 
हक्कदार मानलेले ते भिंती पाडू लागले ॥

काहीतरी हवे होते ठिणगी निमित्त झाले 
भरलेली दारू आत विस्फोट घडू लागले ॥

मरणाचे भय देही वेदनांचे ओझे उरी 
जगतांना तेच जुने का स्वप्न सलू लागले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

आकाश


आकाश
*********

कधी पाहतो आकाश मी
माझ्यात सांडलेले 
हरवून  साऱ्या दिशा
अनंत जाहलेले 

तुटतात बंध खुळे 
देहात भरलेले 
एक विमुक्त गाणे 
उरते नभातले 

तू कोण कुठून आला 
हे प्रश्न मुळातले 
नुरतात अंश त्यांचे 
जणू बाष्प ऊन्हातले

ते नसतेच मागणे रे  
तेव्हा मागीतले 
ते असते रिक्त क्षणाने
सर्वस्व ओतलेले

ते येते असे उगाच 
वाटते मनास आले 
कळते इथेच होते 
पेशीत साठलेले .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

सरताच डाव

सरताच डाव
*********

सारे कालचे बहाणे झालेच आहेत जुने 
प्रत्येक मैफीलीचे रे असते तेच ते गाणे 

हा हट्ट कालचा का येतसे पुन्हा नव्याने 
उलटून जाता ऋतू मान टाकली उन्हाने 

जग खुळे भोवताली शोधे अजून चुकणे 
वाटा न राहिल्या रे आहे तयास सांगणे 

ना मिळणार कुणाही ते मनातील मागणे 
का लोभ हा उद्याचा वांच्छी जुनेच जगणे  

बघ राहू दे फुलांना अन्यथा मातीत जाणे 
ती स्मृतीच सुगंधाची अंती मनात स्मरणे 

रे विक्रांत कळे काय सरले तुझे खेळणे
सरताच डाव उरे मग कुणा देणे घेणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

तेजोनिधी

तेजोनिधी
********

कशाला रे देसी फुका मानपान 
रूते तनमन संसारात ॥

सुखाची भोंगळ दुःखमयी काया 
मिरवतो माया डोईवर ॥

पुरे झाले देवा गळा लागे फास
 झाला कासावीस प्राण माझा ॥

कृपेचा दयाळू उभा दीनासाठी 
असे काय खोटी कीर्ती तुझी ॥

देई विलक्षण तुझा एक क्षण 
करी पेटवण ठिणगीने ॥

अवघे अंधारी जगताचे गाडे 
करी उजियडे तेजोनिधी ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

ओझे

ओझे
*****

नको व्यवहार वाटे हा संसार 
परी खांद्यावर भार आहे ॥

का नच कळे हा जन्म चाललेला 
अर्थ हरवला असा तसा . ॥

हातात येऊन जाते हरवून .
सुख वेडावून पुन्हा पुन्हा ॥

अन उरलेले बळ हे जन्माचे 
वदे करुणेचे शब्द तेच ॥

त्राही त्राही मज जड झाले ओझे
व्यर्थ जीवनाचे भक्तीहीन ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 




गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

विश्वास

विश्वास
*******
घुसू दे पायात लाख काटेकुटे
दत्ता तुझ्या वाटे मुकु नये ॥

चालतो मी वाट दिशा धरुनिया
नच जावी वाया धडपड ॥

दिशा हरवता तम काजळता 
हात देई हाता प्रेमाचा रे ॥

दिवा विझताना यत्न सरतांना 
विश्वास या मना राहू दे रे ॥

सरता विश्वास अर्थ ना कशाला 
विक्रांत काळाला प्राप्त होवो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...