गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

ज्ञानेश्वरी ११:३२४

ज्ञानेश्वरी ११:३२४

म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।
आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥ 
ज्ञानेश्वरी ११:३२४
*************
मागे सरू जाता नावडे संसार 
व्यर्थ नि असार जाणवतो ॥१

अडविते चित्त करे प्रतिकार
केर घरभर तैसा गमे ॥२

आणिक पुढती तू ही तो कळेना 
हाती गवसेना काही केल्या ॥३

अनंत अगाध नाही ज्यास पार
इंद्रीय गोचर नाही कदा ॥४

अशा संकटात पडलो मी घोर 
सुटून आधार मानलेले ॥५

बावरले मन गांगरले चित्त 
स्वरूपात दत्त केव्हा होशी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

तळवटी


तळवटी
*******
आता कौतुकाचा पुरला सोहळा 
जीव झाला गोळा तुझ्यामध्ये ॥१

काय आणि कैसे मागावे तुजला 
मागण्या नुरला हेतू काही ॥२

येई मनावर वायूची लहर 
परि ती ही पर जाणवते ॥३

सरला धिवसा काही मी होण्याचा 
अर्थ असण्याचा लहरींना ॥४

अवघा खळाळ पाहतो निराळा 
बुडी घेतलेला तळवटी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

खोटे


खोटे
*****

तुझे येणे आहे खोटे
तुझे जाणे आहे खोटे
डोळा उमटले चित्र
प्रतिबिंब आहे खोटे

स्वप्न असेच असते
जरी साच की वाटते 
जाग येताच बोधाची 
सुख निद्रेचे सरते 

अंत नसेच दुःखाला 
जरी मनास वाटते 
नच होती सुरवात 
कधी तया न पटते 

जन्म म्हणे तो ही खोटा
काळ कळला कुणाला 
धागे काळे नी पांढरे 
कुणी नाही विणायला 

जग तरंगते गमे
कुण्या सूक्ष्म पोकळीत
मन कल्पित विराट 
कुण्या शून्य आकाशात

बघ बघ बघ बघ 
उभा राही स्तब्ध फक्त 
फट कुठली उजेडी 
कुठे घडतोय स्फोट 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 










सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

सुरेश बोहीत

सुरेश बोहित 
********
सुरेश मला भेटला नागपाड्याच्या
एसटीडी क्लिनिकमध्ये 
तिथे व्यतीत केलेल्या दीड एक वर्षाच्या 
मैत्रीपूर्ण वातावरणात सुरेश जोडला गेला 
पुढे वशिलेबाजीच्या राजकारणात 
माझी तिकडून उचल बांगडी झाली 
आणि ही सोबत तुटली 
बदलीनंतर हे तुटणे अपरिहार्य असते 
परंतु अगरवाल रुग्णालयात आल्यावर
सुरेश पुन्हा सापडला आनंदाने भेटला 
सुरेशचा मूळ स्वभाव मैत्रीचा प्रेमाचा आहे
त्याची भाषा लाघवी मृदू आणि नम्र असते
त्याला कोणी वैरी असेल असे मला
चुकूनही वाटत नाही 
समोरच्या व्यक्तीला प्रसन्न ठेवायची 
नैसर्गिक गुणवत्ता त्याच्यात आहे
 त्यात लाळकोटेपणा मुळी सुद्धा नाही
थोडी व्यवहारिक किनार असेलही त्याला
 पण अजीजीची भाषा कधीच नसते 

नोकरी नीटपणे प्रामाणिकपणे करताना 
सोबत्यांना सांभाळून घेणे 
वरिष्ठांचा विश्वास मिळवणे
हे त्यांनी करण्यासाठी केले असेल 
असे मला वाटत नाही 
कधी चहापाणी पाजून तर कधी गोड बोलून
त्याने खूप माणसे जोडली होती 
नोकरी कशी करावी हे सर्वांनी सुरेशकडून शिकावे 
सुरेश केवळ इथल्या जीवनात यशस्वी नव्हता 
तर त्याने संसार तेवढाच नेटका केला होता आहे 
मुला मुलींना शिकवून आपल्यापेक्षा 
उंचावर त्याने नेऊन ठेवले आहे
साऱ्याच लोकांना ते जमतं असं नाही 
म .न .पा.तील बरेच कामगार व्यसनाधीनता 
कर्ज आणि गैरहजारी या चक्रात सापडतात 
पण सुरेश त्या थोड्या सावध आणि हुशार लोकांमध्ये मोडतो 
जो यात कधीच अडकला नाही 
तो सुखी होता सुखी आहे आणि सुखी राहील 
 या बद्दल मला तीळ मात्र संशय नाही 
तरीही परमेश्वर त्याला सुखी आनंदी 
आणि आरोग्य ठेवली ही प्रार्थना 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

कोडे

कोडे
*****
कुणा कळू आले कोडे जीवनाचे 
नाव सुटण्याचे घेते ना जे ॥१
एक एक बिंदू जोडतो धरतो 
तरी निसटतो एक बिंदू ॥२
वरवर सोपे किती हे दिसते 
छळची मांडते घेता हाती ॥३
वेळ व्यय होता कळून हे आले 
सुटणे ठेवले नाही यात ॥४
दुष्ट खोडकर मांडलेला डाव 
साळसुद आव आणुनिया ॥५
कळू आला खेळ व्यर्थ उठाठेव 
टाकून या डाव दिला मग ॥६
आता मी पाहतो अडलेले कोडे
हट्टी तरी वेडे चिडलेले ॥७
कळता व्यर्थता सरेल हा खेळ 
ज्याची त्याची वेळ ठरलेली ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.blog
☘☘☘☘ 🕉️ 
 

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

राजदत्त तांबे

राजदत्त तांबे 
**********
तसे तर राजदत्त तांबे 
हे माझ्या परीघाबाहेरी व्यक्तिमत्व . 
महानगरपालिकेच्या सूर्यमालेतील 
पगार रुपी सूर्याभोवती फिरणारे 
आम्ही सारे ग्रह तारे .
काहींची गती सोबत असते .
काही क्वचित भेटतात 
तर काही फक्त दिसतात . 
तर काही नजरेच्या टप्प्यातही येत नाहीत .
या  मध्ये तांब्याचे परिभ्रमण हे 
जवळ होत होते सोबत होत होते 
पण त्यांचे व माझेआभा मंडळ 
तसे एकमेकांना भेदत नव्हते . 
अगदी इच्छा असूनही .

पण त्यांचे भ्रमण डोळ्याला सुखवित होते .
त्यांचे व्यक्तिमत्व सदैव नम्र सौम्य 
सौजन्यशील आश्वासक व सहकार्याचे होते . 
त्यांचे बोलणे लाघवी मृदू मैत्रीपूर्ण होते .
त्यांचे काम हे पूर्णतः प्रामाणिक 
आणि नोकरीला न्याय देणारे होते .
त्यांचे हे गुण त्यांच्या देहबोलीतूनही प्रकट होत .

 खरंतर एखादे डिपार्टमेंट 
एखाद्या प्रमुखाच्या  हातात देऊन 
प्रशासकाला निर्धास्त राहता येते 
तसा तो डिपार्टमेंटचा प्रमुख असावा लागतो 
एक्स रे डिपार्टमेंटच्या बाबतीत .
तिथे तांबे असल्यामुळे मी सुखी होतो .
तिथे फारसे पाहावे लागत नव्हते . 
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 
आवड निवड हेवेदावे राजकारणअसते 
जणू काहीतरी पेल्यातील वादळे असतात  
त्याला ती पिऊन जिरवावी लागतात 
आणि विसरूनही जावी लागतात 
तांब्यांना ते कसब जमले होते .

 खरंतर त्यांचे बाहेरचे  नाटकाचे जग 
चमकते झगमगते पिवळ्या प्रकाशाचे होते 
तर हे एक xray चे जग अदृश्य किरणां चे  होते 
अशा या दोन विरोधी जगात ते जगत होते 
एकात त्यांचे मन होते तर दुसऱ्या त्यांचे तन होते 
त्यांचे नट दिग्दर्शक असणे
 नाट्य क्षेत्रात वावरणे कलेत जगणे 
हे सगळ्यांच्या कौतुकाचे कारण होते .

शाळेत गणपतीत केलेल्या एकांकिका 
यांचा अंगावर पडलेला मंद
पिवळा प्रकाश मी अनुभवला आहे 
त्यामुळे त्यात काय सुख आहे हे मी जाणतो 
 म्हणून त्या अनेक भाग्यवंतातील 
एक तांबे आहेतअसे मी म्हणतो 
खरच आवडते काम करायला मिळणे
हेच तर आनंदाचे जगणे असते 
मग ते सर्व काळासाठी असो 
किंवा काही काळासाठी असो 
ते त्यांना मिळाले आहे 
आणि कदाचित निवृत्तीनंतरचा काळ 
ते त्या जगातच रममान होतील 
हे मला माहिती आहे 
म्हणून त्या पुनःशुभारंभाच्या प्रयोगासाठी 
त्यांना खूप खूप शुभेच्छा
पुन्हा घंटा वाजू दयात अन पडदे उघडू दयात .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

सावली

सावली 
******
तो आता थकला आहे वृद्ध झाला आहे 
त्याला रणांगणावर बोलावू नका 
त्याच्या हातात शस्त्र देऊ नका 
त्याला जगू द्या थोडे त्याचे जगणे 
त्याला कळू द्या थोडे त्याचे जगणे 
तसा तो मित्रत्वाची भाषा जाणत नव्हता
विनयशीलता मानत नव्हता 
जमाव घेराव मर्मभेदी बोलणे 
बोलतच राहणे ऐकून न घेणे 
ही त्याची खास शस्त्रे 
अपमान करणे आघात करणे 
तोंड सुख घेणे ही त्याची शैली 
होय त्यांनी घेतले आहेत 
शेकडो शिव्या शाप तुमच्यासाठी
अनुभवलेत त्या प्राक्तनाने दिलेले वार
पण आता पुरे, 
तुमच्या इवल्या मागण्यासाठी 
तुमच्या खुळ्या महत्त्वकांक्षांसाठी 
नका लावू त्याला पाषाण उचलावयाला 
रथ ओढायला, रणशिंग फुंकायला 
होय तो येईल ही कारण ते
त्याच्या रक्ताचे गाणे आहे 
तो भांडेल ओरडेल कारण की ते 
त्याचे जगणे आहे 
मित्रांनो एवढेच सांगणे आहे 
झाड आता थकले आहे .
त्याला मोडून पडू देऊ नका 
जी सावली उपभोगली आहे तुम्ही 
तिच्याशी कृतघ्न होऊ नका
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...