बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

अनुवाद


हे प्रभू दत्तात्रेया
या माझ्या विनम्र प्रार्थनेने
माझे हृदय होते पुलकीत
माझा जीव थबकतो थरारतो 
प्रत्येक हृदय कंपनात
माझा आत्मा आसावतो व्याकुळ होतो
तो तुझा दैवी प्रकाश 
जावा उतरत माझ्यात म्हणून

ते तुझे अस्तित्व देते मला 
निरव उदात्त शांती 
त्या तुझ्या मिठीत हरवतात माझ्या चिंता 
तुझी प्रगाढ चैतन्यमय सर्व व्यापकता
होते माझ्यासाठी दिशादर्शक तारा 
त्या माझ्या अफाट अनंत प्रवासात 
तो कधी असतो जवळ हृदयात
तर कधी अति दूर अंतराळात
वेदनांच्या या दुःखद प्रवासात 
स्वप्नांच्या रंगीत आकाशात 
तो असतो माझा 
परम शांती प्रदायक पथदर्शक प्रकाश

माझ्या प्रत्येक श्वासात अन 
ओठावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रार्थनेत 
मला मिळते शक्ती सामर्थ्य 
जे येत असते तुझ्या अर्चनेने

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

शंकर महाराज

शंकर महाराज
************
अष्टावक्र अवलिया 
बालोंन्मत अवधूता 
अप्राप्य साऱ्या जगता 
परि प्रेमे भेटे भक्तां ॥१
उग्र मुद्रा तीक्ष्ण डोळे 
नजरेत वीज खेळे 
देही असून विदेही 
अष्टसिद्धी पायी डोळे ॥२
बोलावून पायी देवा 
दिले मज गूढ सुख 
परी वाढली रे भुक 
प्रीती दुणावे अधिक ॥३
ज्ञान देई भक्ती देई  
भाळी लावी रे विभूती 
कली मळ सरो सारा 
धडाडून दे विरक्ती ॥४
लोभ सरो मोह सरो 
हृदयात प्रेम झरो
होत कलंदर तुझा 
अलक्षात चित्त हरो ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
/kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

दत्त गाणी


दत्त गाणी
********
तुझ्यावरी लिहलेली 
दत्तात्रेया तुझी गाणी 
सांभाळली हरवली 
कुठे कधी नेली कुणी  ॥१
तुझ्यासाठी तुझी गाणी 
उमटली माझ्या मनी 
मोठेपणा काय त्यात 
जन गेले विसरूनी ॥२
भक्ती माझी वाढली का
जरी मज ठाव नाही 
कवितेत मिरविले 
तेही माझे नाव नाही ॥३
जयासाठी शब्द होते 
तया हृदयात गेले 
हेलकरी रिक्त हस्त 
चाकरीचे काम झाले ॥४
शिजेल मी वाहीलेले 
येईल प्रसाद हाती 
तोवरी रे माथ्यावरी 
वाहीन रे मी ही पाटी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

दुर्गा काली तारा हो !

तू दुर्गा काली तारा हो !
***************
तू कर सेवा, रात्रं दिन जागून
तू वाचव जीव, रक्ताचे पाणी करून 
त्यांना फरक नाही पडणार
ते पशु नाही सुधारणार
त्यांच्यासाठी तू नाहीस डॉक्टर
नाहीस मानवतेचे मंदिर
त्यांच्यासाठी तू फक्त आहेस
एक स्त्री शरीर

खरतर तू कुणीही अस 
पोलीस वकील कलाकार 
कलेक्टर मालक मॅनेजर 
त्यांना खरच फरक नाही पडणार
मिळताच ती दुष्ट संधी 
ते तुला ओरबाडून खाणार 

कुठलाही क्षण बेसावध तुला
नाही राहून चालणार 
तेज तर्रार कृपाण तुला 
सदैव बाळगावी लागणार
कारण ते कधी कुठल्या रूपात येणार 
तुला कधीच नाही कळणार 
कधी मित्र कधी आप्त कधी मदतगार
कधी संरक्षक कधी राखणदार
तर कधी मृग सोन्याचे होणार

म्हणून तू रहा संघटित 
सखी मैत्रीणींच्या सोबतीत 
पण होऊ नकोस बंदिस्त 
पुन्हा त्याच चौकटीत
कारण तिथेही त्यांचे हात
अगदी सहज पोहोचतात 
भिंती आड अंधारात 
अधिक पशू राहतात

बाकी कायदे शासन प्रशासन 
सारेच व्यर्थ आहेत 
हजारो वर्षापासून 
तू बळी पडत आहेस 

अनअत्याचार हे नेहमीच 
दुर्बळावर होत असतात 
सबळांच्या वाटेस कधी
कोणी जात नसतात 

म्हणून तू सबळ हो सशक्त हो 
रंभा मेनका उर्वशी नको
दुर्गा काली तारा हो !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

माझा ज्ञानेश्वर

माझा ज्ञानेश्वर
***********
भेटला रे सखा जीवीचा हा जीव
हृदयात गाव आनंदाचा ॥१
उजळले दैव भाग्या ये अंकुर 
देव ज्ञानेश्वर पहियले ॥२
रूप लावण्याचा सजीव पुतळा 
सूर्य तेज कळा मुखावर ॥३
स्वप्न जागृतीत येत विसावले 
दुःख हरवले शोक चिंता ॥४
जाहले कल्याण आलिया जन्माचे
अलंकापुरीचे अंक झालो ॥५
सुखावले स्पर्श सुखावले डोळे
सुखाचे सोहळे इंद्रियात ॥६
सुखावली मती सुखावली गती 
सुखावली रीती जगण्याची ॥७
जाहलो सुखाचे अवघे चरित्र
सुखाने सर्वत्र  घर केले ॥८
माय बाप सखा माझा ज्ञानेश्वर 
कृपेचा पाझर कणोंकणी ॥९
काय सांगू किती बोलावे वाचेनी
पुरेना ग धनी शब्द कमी ॥१०
ठेवुनी हृदयी राहतो मी उगा 
तया जीवलगा म्हणुनिया ॥११
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

कृपेची अक्षरे

कृपेची अक्षरे
**********
कृपेची अक्षरे मनी ओघळली 
सुखानंद झाली वृत्ती सारी ॥१

काय ते कळले मनात शिरले 
हृदयी जिरले ठाव नाही ॥२

विचारील कुणी सांग रे म्हणुनी 
नये ठरवूनी बोलता ते ॥३

सुखावतो वृक्ष झेलूनी पर्जन्य 
मृदा होते धन्य भिजुनिया ॥४

तैसे काही झाले मन चिंब ओले 
ज्ञानदेवी ल्याले कणकण ॥५

तयाच्या शब्दात जन्म सारा जावा 
पांगुळ मी व्हावा कडेवरी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

फक्कड

फक्कड
*****
तो म्हणाला 
माझे प्रश्न सुटले आहे
मला सर्व कळले आहे 
आता मी मोकळा 
अवधूत झालो आहे ॥
वाहवा किती छान 
असे कोणी आहे इथे 
म्हटलो मी मग तयाते 
सांगाल का मजला 
कसे हे घडते ॥
करूनी डोळे 
आपले बारीक 
खोल ओढत
चिलमीचा धूर 
वदला तो सवे 
मजला उडवीत ॥
बसकी तुम्हारे 
बात नही है रे 
गांजा सगळ्यांनाच 
झेपत नाही रे ॥
तो नक्कीच 
खोटे बोलत नव्हता
त्या धुरातही मला 
ठसका लागत होता ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...