शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

सांत्वना

 सांत्वना
.*****
झरतात नेत्र माझे 
वादळूनी अंतरात 
जळतेय रक्त माझे 
भावनांच्या वणव्यात 

पेटवली तूच वात 
सांभाळली आहे आत
उजळून प्रकाशात 
जगू दे रे उजेडात 

जरी जीवा धीर नाही 
शिरी भार सोसवत 
हर दिसी हर निशी
शूल सले काळजात 

तुझ्याविना मुळी सुद्धा 
अर्थ नाही जगण्यात 
चाचपडे जन्म सारा 
वाट नाही सापडत 

क्षणभर स्पर्श दे रे 
ओथंबल्या स्पंदनात 
व्यर्थतेची खंत जावो 
धीर तुझ्या सांत्वनात ।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

मरणा




मरणा
*****
जरा थांब ना रे माझिया मरणा 
जाणून घेऊ दे मज या जीवना ॥
सुखाचे दुःखाचे घेऊ दे उखाणे 
कधी चांदण्यात गाईन मी गाणे ॥
परी ते अवघे वर वरचे रे 
खोलवर मज डुबी घेऊ दे रे ॥
भिजलेले अंग छान ते रे होते 
उडवले पाणी गोड ते रे होते ॥
लेवूनी जीवन घडावे जगणे 
थांब ना जरासा बाकी ते रे होणे ॥
जाणल्या वाचून जीवन सुटणे 
प्रेमळा निर्मळा हे लाजिरवाणे ॥
नाही कधी तुज कोण म्हणू शके 
तुझी गोड मिठी सांग कुणा चुके ॥
अडकल्या विना पण घडो येणे 
त्यासाठी हवे रे मजला जाणणे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

खांब

खांब
*****
घणाणली घंटा बधिरले कान
 कुठले कशाचे गारठून भान 

उंच उंच खांब अंगठा त्यावर 
खोली नसलेला अथांग अंधार

डोळे मिटुनिया तेच दृश्य भान
चढला कुठून असे हा रे कोण ?

भय हे कुठले सुख नि कशाचे 
झुलणे तरीही चालले देहाचे 

अस्तित्वाचा तिढा सुटता सुटेना
 तन मन घट्ट धरून जीवना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ३१ जुलै, २०२४

स्वप्न वाट


स्वप्न वाट
********
कधीतरी वाट वाकडी करून 
स्वप्नांना भेटायचं असतं 
नभातल तारांगण 
डोळ्यांनी पाहायचं असतं 
तो प्रकाश पाझरणारा 
कणकण व्यापणारा
त्यात स्वतःला 
झोकून द्यायचं असतं
जगणं तर रोजचंच असतं
घडाळ्याच्या काट्यावर 
नित्य धावणं असतं 
पण येताच गंध फुलांचा 
आडवळणानं जायचं असतं
त्या तिथं कुणीच नसतं 
फक्त तुमचं स्वप्न असतं
येताच तुम्ही स्वागत करतं
अन कवटाळून बाहुत घेतं
त्या स्वप्नावर करावीत कुरबान
 मग लाखो जन्म 
अन लाखो मरण

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २९ जुलै, २०२४

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी
*********

तुझ्यासाठी माझे गाणे 
माझ्या मध्ये झंकारते 
तुझे शब्द तुझे हास्य 
कणोकणी खळाळते 

तुझी साद वेडी खुळी 
मज पुन्हा बोलावते
किनाऱ्याला लाट लाट 
पुन्हा पुन्हा आदळते 

आकाशात विखुरले 
रंग माझे स्वप्न होते 
पाण्यावर परावर्ती 
रूप तुझे त्यात येते

जगण्याला जीवनाची
लसलस डिरी येते 
धमन्यात निजलेले 
प्राण पुन्हा जागे होते 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

आम्ही खूप काम करतो .

आम्ही खूप काम करतो .
**†***************
जरी आम्ही हातावर हात ठेवून बसतो 
जरी आम्ही गप्पाटप्पात वेळ घालवतो 
जरीआम्ही कधीही येतो कधीही जातो 
तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आम्ही दारी चा माणूस परत पाठवतो 
आम्ही इर्मजन्सीला महिन्याची तारीख देतो 
आम्ही आमची काम दुसरीकडे पळवतो
 तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आम्ही दिवसाला अर्धा एक तास काम करतो आम्ही दोन तीन होताच पार थकून जातो 
मान्य पगार जरी पाव पावून लाख घेतो .
तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आमचा साहेब 
रात्री अपरात्री  रावूंड घेतो
अन आमच्यावर वचक ठेवतो 
तो येताच आम्ही कामा लागतो 
पण साहेब येत अन् जातच राहतो
पण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

आता ही गोष्ट वेगळी आहे की 
माणुसकी हरवून गेलोय आम्ही 
नोकरीच्या शाश्वतीत  सुखावलोय आम्ही 
पण आमचे कोण बिघडू शकतो 
कारण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

संघटित आहोत आम्ही सही करून काम करतो 
अहो आम्ही असू निर्ढावलेले 
अन सरकारी पाणी प्यायलेले  
 सांगा आम्हा कोण सुधारतो 
तरी आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

हा जर कधी काही झालेच तर 
आणि कुणी कुठे सापडले तर 
एखाद दुसरा घरी बसतो संघ आमचा जोर धरतो
त्याला पुन्हा इथे आणतो आम्हा समोर कोण टिकतो 
कारण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

ही नियमांची घट्ट घडी ही नोकरीची शाश्वती 
आणि आमच्या संघाची मजबुती 
आमचे कोण वाकडे करतो 
खरंच आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

काम आमचे संथगती मिरवीत चालते लाल फिती 
अडली नडली इथे येती त्यांना लायकी दाखवतो
आणि जणू उपकृत करतो 
कारण आम्हा वाटते आम्ही खूप काम करतो .

शनिवार, २७ जुलै, २०२४

जीवलगा विन

जीवलगा विन
************
देहास बांधले या ते 
नव्हतेच माझे नाते 
देहधर्मा जागलेले
आदीम संस्कार होते ॥१
येताच फुले वेलीस 
जपणे तयास होते 
वाघीण धेनू वा घार 
मातृत्व एक असते ॥२
ते स्पर्श नको नकोसे
परके अजून खोटे 
ते शब्द ओल नसले 
बाजार घरात होते॥३
मनी आस ही कुणाची 
अजूनही आत जळते 
स्मरतात कुणा कधी 
गात्रात वीज पेटते ॥४
ही असेलही वंचना 
कुणी काहीकाही म्हणा 
जिवलगा विन जन्म 
तो मिळू नयेच कुणा ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

परिक्रमा

परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे  अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा  माईकडे मागत आहे  प्रचंड पाणी प्रवाहाचे  नितळ नि...