बुधवार, २९ मे, २०२४

वाटा


वाटा
*****
साऱ्याच वाटा समोरच्या जगायच्या असतात . 
समोर आल्यावर चालायच्या असतात . 
वाटा कधी कधी अपरिहार्य असतात 
तर कधी कधी बदलता येतात 
पण पर्याय हातात असेपर्यंतच .
 कारण काही वाटा परत फिरत नसतात 
एकतर्फी वाहतूक असते तिथे 
परत फिरायला वेळ नसतो हातात 
किंवा परतीचे मार्गही बंद होतात 
आणि मग जी वाट आपण चालतो 
ती निमुटपणे चालावी लागते .
नशीबवान असतात ते 
ज्यांना भेटते हवी ती हवी तशी वाट 
काटे कुटे दगड तर प्रत्येक वाटेवर असतात 
अगदी राजमार्गावरही कधी कधी ठेचा लागतात 
पण चालणाऱ्याला जी वाट सुटू नये
असे वाटते ती वाट खरच नशीबवान असते 
आणि चालणाराही 
बाकी कधी ऊन कधी सावली 
हा खेळ तर चालतच असतो .
कधी कधी वाटते वाट पाया खाली नसते 
तर ती मनात असते 
अन
चालण्यात आनंद वाटू लागला 
की वाट कुठली कुठे जाते याला मूल्य नसते .
काही लोक वाटेवरून घसरतात 
चुकत चुकत आडवाटेला ही लागतात .
कधी कुणाला ते कळतं तर कधी कळतही नाही तर कधी कोणी कळूनही 
ते मुद्दाम त्याच वाटेने चालत राहतात
त्या आडवाटेचे सुख त्यांना अधिक आवडू लागते 
शेवटी प्रत्येक वाटेला एक शेवट असतो . 
मुक्काम असतो जो येणारच असतो . 
प्रवास चांगला असो किंवा वाईट असो 
पथ सुखकर असो किंवा दुःख कर असो 
कालौघात बुडून जातो .
विस्मृतीच्या मातीत मिसळून जातो 
विराट विश्व संचालनात 
ती एक नगण्य हालचाल असते . 
तरी चालणाऱ्या साठी ती 
किती महत्त्वपूर्ण आणि मोठी असते 
कारण त्याच्यासाठी ती तेवढीच असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २८ मे, २०२४

बंदीवान


बंदीवान
*******
तुझ्या संभ्रमाची वेल 
तुला बुडवते खोल 
मी होऊनिया खिन्न 
ऐके उदासीन बोल 

तू घेतेस ओढवून 
उगा वृथाचे वादळ
होत कस्पट नशीब
मज गिळते आभाळ 

तुझे बिंब प्रतिबिंब 
वाद घालते स्वतःशी 
माझा हरवे आकार
जातो कुठल्या मितीशी 

तुला वेढून अमृत 
परी डोळ्यात तहान 
माझ्या ओंजळीचे पाणी 
जाते फटी झिरपून 

सुख सुंदर विखारी 
तरी नाही सोडवत 
तुझ्या डोळ्याचे गारुड 
माझा जन्म बंदीवान

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २७ मे, २०२४

हस्तांतरण

हस्तांतरण
********
जीवाकडून जीवाकडे
हस्तांतरण जीवनाचे  
आहे युगा युगाचे 
हे गूढ निर्मितीचे

ही साखळी अमरत्वाची 
देहा वाचून वाहायची 
सोडूनही देहास या 
देहपणी मिरवायची 

नसेल तेव्हाही मी 
असेल तेव्हाही मी 
सांगतो बजावूनी
इथे जणू मलाच मी 

बाप जगतो मुलांमध्ये 
आहे कुठे वाचलेले 
हे साज गुणसूत्रातले 
राहतेच तिथे साचले 

पुन्हा मी पुन्हा मी 
येतच राहतो पुन्हा मी 
पुन्हा पुन्हा नवेपणाने 
जीर्णत्व भिरकावूनी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २६ मे, २०२४

दीपक


दीप
******
सांजवता दिन दीप उजळला
दत्ताच्या समोरी हळूच  ठेविला ॥१

दीप प्रकाशला गाभारा भरला
तम दाटलेला क्षणी दुरावला ॥२

इवला प्रकाश झाला घरभर
अन पुढे किती गेला दूरवर॥ ३

मग मिटू गेले थकलेले डोळे
शब्दाविन शब्द काही मनी आले ll४

भाग्य या दिव्याचे देई मज देवा
जळत पदाशी मिळावा विसावा ll५

तुझाच अंधार अन हा प्रकाश 
परी पेटण्याची मनास या आस ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २५ मे, २०२४

लायक


लायक
******
नच का लायक तुझ्या मी पदाला 
सांगावे मजला दत्तात्रेया ॥१
अजुनी आत का भाव न जागला 
भेटी न मजला म्हणुनी ती ॥२
उघडे सताड अतृप्तीचे दार 
घुसतो अपार वारा आत ॥३
सरू आले जिणे जन्म आटाअटी 
रितेपण गाठी दिसे पुढे ॥४
झाली पारायणे झाल्या प्रदक्षिणा 
भाकली करुणा किती वेळा ॥५
काय तुझी भक्ती मज ना घडते 
नच काय होते भांडे रिते ॥६
तर मग फुटो पात्र ही अनंता 
ही निरर्थकता नको आता ॥७
असणे नसणे तेही तुझ्या हाती 
करावे विक्रांती काय मग ॥८
बाकी मनातले दत्ता तुज ठाव 
करणे उपाव मर्जी तुझी ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


शुक्रवार, २४ मे, २०२४

सरोवर

सरोवर
*******
त्या मोहमयी सरोवराचे जल 
चाखले तुम्ही एक वेळ 
तुम्हाला तिथे पुन्हा यावे वाटणे
आहे अगदी अटळ 
तो स्पर्श शितल मधुर 
ती जीवावर पडणारी भुरळ 
ते तृप्तीची अवीट महूर 
ते निस्पंदतेत जाणारे पळ 
किती विलक्षण असतात 
ती स्वप्नांची मदीर कमळ 
ते पेशी पेशीत उमटणारे कूजन 
ते रोमांचित होणारे तनमन 
आणि हरवून गेलेला काळ वेळ 
खरे तर ते असे सरोवर 
अचानक अनाकलनीयपणे 
सापडणे जीवनाच्या पथावर 
हा मोठा चमत्कारच 
आणि त्या सरोवराचे आमंत्रण 
शुभ्र बाहू पसरून 
आपल्या प्रतिबिंबासह 
आपल्याला घेणे सामावून 
अन अपूर्णतेला जीवनाच्या देणे कारण 
किती विलोभनीय असते .
तरीही ते मोहमयीच आहे
अन सोडून जाणेच आहे 
हे कडवट आणि दुःखद सत्य
व्यापून उरते येता जागृतीच्या काठावर 
मग मधूर सुखाचे स्वप्नाचे ते ठिकाण 
ठेवून हदयात निघतो आपण
ओढत नेते जीवन आपल्याला दूरवर 
त्याच आपल्या धुळीच्या रुळलेल्या
म्हटले तर ठरलेल्या-नियत वाटेवर
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, २३ मे, २०२४

अटळ

अटळ
******
दत्ता तुझे येणे आहे रे अटळ 
जरी काळ वेळ ठाव नाही ॥१ 

आगीत कापूर जळणे अटळ 
नसे फार वेळ थांबणे ते ॥२

लागे तुझा नाद सुटणे अटळ 
प्रारब्ध केवळ नाममात्र ॥३

येताच वसंत फुलणे अटळ 
सर्वांगी सुफळ होतो वृक्ष ॥४

भरताच पाणी वाहणे अटळ 
काठोकाठ तळं आत्म तृप्त ॥५

विक्रांत जाणतो दत्त हा कृपाळ
घेईन जवळ निश्चित रे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...