शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

उरलेले श्वास

उरलेले श्वास
*****
उरलेले श्वास किती नसे ठाऊक कोणाला 
सरलेले दिस शुन्यी जाती एकाच क्षणाला ॥१

बसलेली खुर्ची खोटी पसरली कीर्ती खोटी 
अन जमवली माया सवे कधी नच येती ॥२

कळतो ना अर्थ जरी जन्म वाहतोच पुढे 
कर्तव्याची बाराखडी रोज नवनवे धडे ॥३

देह जेव्हा जन्मा आला काळ घास ठरलेला 
द्यायचा रे सोडूनिया आज उद्या परवाला ॥४

तरी किती अहंकार ठासूनिया भरलेला 
आकाशात ढगावर राजवाडा बांधलेला ॥५

प्रिय नातलग मित्र सोडूनिया जेव्हा जाती 
जागे स्मशान वैराग्य माया पुन्हा वेटाळती ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

वाहता वाहता

वाहता वाहता
***********
कळल्या वाचून चाललो गर्दीत 
सुखाच्या धुंदीत 
रात्रंदिन ॥१
यशाच्या खाईत नशेच्या राईत 
जन्म सराईत 
वाहणारा ॥२
वाहता वाहता कळली व्यर्थता 
खुंटूनिया वाटा 
थांबलो मी ॥३
मग दूर गेले साथी जमलेले 
हाती धरलेले 
सुख यंत्रे ॥४
पुन्हा उगमाचा ध्यास जीवनाचा 
क्षण जगण्याचा 
उगवला ॥५
विक्रांत पाहतो मागे वळुनिया 
खुणा मिटलेल्या 
पावुलांच्या ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

असणे

असणे
******

संतृप्त स्तब्ध मनाचे
आकाश विरक्त होते 
वितळून मेघ सारे 
अस्तित्वही शून्य होते 

उरात न मावणारी 
अफाट पोकळी होती 
असणे कुठे कणाचे 
कोणास ठाव नव्हते 

नसण्यात निजलेले 
जग अधांतरी होते  
परी स्पंदनात काही 
चैतन्य दडले होते

नयनात प्रकाशाचे 
सागर भरले होते 
उगम सर्व नादांचे
कर्ण युगलीच होते 

मी सांगू कुणास काय 
शब्दास रूप नव्हते 
वाहून दश दिशात 
असणे अनादी होते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

रितेपण

रितेपण
****

सुखाची ही ओढ सुखे मावळली 
डोळे झाकलेली उघडेना ॥१

किती मनोहर बाई हा अंधार 
प्रकाशाची सर आठवेना ॥२

सारे धुरकट स्मृतीचे आकाश 
पाण्यावर रेष उमटली ॥३

गळे एक एक शिशिराचे पान 
पाचोळ्याचे गाणं वाऱ्यावर ॥४

एक जरतारी चांदण्याची वेल
मनात अबोल लख्ख उभी ॥५

किती घनदाट असे रितेपण 
नको नकोपण तेही मज ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

आडवे यमुना


आडवे यमुना
**********

तिचे गुणगाण निजला कळेना 
देऊळ सुटेना सजलेले ॥

तिचे जन्मभान मुळी मावळेना 
काकण सुटेना पिचकली ॥

तिच्या ती जगात परी ना मनात
पहातसे वाट कुणाची गा ॥

आला क्षण देई खुळे समाधान 
तृप्तीचे साधन सापडेना ॥

परी आस मोठी दडलेली पोटी 
व्याकुळली दिठी तयासाठी ॥

जाणे कुठवर तिजला कळेना 
आडवे यमुना पदोपदी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

सुखगोष्टी

सुखगोष्टी
********
सुखाच्या साऱ्याच तऱ्हा 
सारख्याच असतात 
त्याच गोष्टी त्या वयात 
बघ तशाच घडतात ॥१
तेच चक्र गरगर 
फिरते रे जगभर 
झाडे वेली फुले पाने 
येतो नि जातो बहर ॥२
तीच पार्टी तीच मस्ती 
फक्त बदलती साथी 
तीच आशा तीच उर्मी 
देश वेष भिन्न प्रांती ॥३
सुखदुःखाचे फार्मूले 
अगदी तेच असती
फॉर्मुल्यात जगणारी 
खरेच काय जगती ॥४
कोडे असते जीवन 
सोडवणाऱ्यासाठी 
वेडे असते जीवन
हे धावणाऱ्या साठी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 


रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

गिरणार काठी

 
गिरणार काठी
************

ठक ठक ठक हातामध्ये काठी
गिरणार घाटी चालणारी ॥१

कितीतरी वेळा गेली वर खाली 
होऊन सहेली घेणाऱ्याची ॥२

कुणा सांभाळले कोणा बळ दिले 
शिखर दाविले आवडीने ॥३

दत्तनाथ भक्त तापस शर्थीचे 
जणू की काठीचे रूप झाले ॥४

सांभाळा तयाला करा हो आदर 
आणिक साभार परत द्या ॥५

 ठक ठक ठक दत्त दत्त दत्त
राहो उच्चारत ध्वनी तिचा ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️ 

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...