गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

साथ

साथ
*****

सोडुनिया हात आता तू कुणाची 
सोडुनिया साथ आता तू स्वतःची ॥१

नव्हती कधीच गाठ बांधलेली 
चालता प्राक्तनी गाठ पडलेली ॥२

कुणाचे असे हे काही देणे घेणे 
तयालागी इथे असे हे भेटणे ॥३

घडे भेटणे नि घडे हरवणे 
उमलून कळी फूल ओघळणे ॥४

परी जाहले हे गंधित जगणे 
जाणुनिया वृक्ष उभा कृतज्ञतेने ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

मंडप


 मंडपात
********
चालला सतत नामाचा पाहारा
आनंदाचा वारा मंडपात ॥१

थोडा तार स्वर लय बोटावर 
नाम ओठावर कोरलेले ॥२

घासलेल्या तारा घासलेला स्वर 
देह दैवावर सोडलेला ॥३

तेच पुरातन वस्त्र परिधान 
धोतर पैरण जुनेरसे ॥४

परी मुखावर शांती समाधान 
स्वानंदाचे भान डोळियात ॥५

चाले वाटसरू सापडली वाट
होऊनी आश्वस्त तया रिती ॥६

विक्रांता कौतुक वाटे त्यांचे थोर 
ठेवी पायावर माथा मग ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

निर्व्याज

निर्व्याज
******
तुझे चाफेकळी नाक हनुवटी निमुळती
गर्द डोळीयात दिसे डोह यमुनेचे किती १

केस मोकळे विजेचे देती आषाढा आव्हान 
मुक्त हसण्याला अन्  शरदाचे वरदान २

येते समोरून जेव्हा गाणे मनात सजते 
आसमंती दरवळ फुल फुल उधळते ३

कुणी म्हणते तू तेज तीक्ष्ण असे तलवार
कुणी म्हणते शितळ गंगाजळ सर्वकाळ    ४

जरी जाणतो न तुला तरी गमे ओळखीची 
माझ्या मनात प्रतिमा कुण्या मागील जन्माची ५

तुला सांगू आणि काय रहा अशीच हसत 
तुझे निर्व्याज हसणे राहो मनी खळाळत ६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

पालखी


पालखी
*******
निघाली पालखी माझ्या मावुलीची
वृष्टी कौतुकाची होत असे ॥

खणाणती टाळ गजर कानात 
मृदुंग छातीत धडाडले ॥

पावुलांचे फेर फिरती चौफेर 
आनंद लहर कणोकणी ॥

गिरकी क्षणात टाळ ताल त्यात
तडीत भूमीत पिंगा घाले ॥

नामाचा गजर भरले अंबर 
पताका अपार उसळती ॥

अवघे विठ्ठल सावळे सुंदर 
देव भक्तावर भाळलेले ॥

विक्रांत क्षणाला भारावला साक्षी 
डोळियात पक्षी मोरपंखी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

पोचारा


पोचारा 
 
*****
चार साहेब एक डायरेक्टर 
एका मीटिंगमध्ये होते 
छान सजून आले होते 
नमस्कार झेलीत होते 

पण का नच कळे ते 
कुणाकडेच पाहत नव्हते 
ते पदवी अन् खुर्चीच्या का 
मऊ उबेत रमले होते ?

मग पाहता पाहता कळले 
अरे ते माणूस म्हणून नव्हते 
खुर्चीच्या स्वप्नात जणू की 
खुर्चीच जाहले होते 

खांद्यावरती तयांच्या 
अमाप ओझे होते 
हुकमाचे खादी भगव्या 
ताबेदारच ते होते 

तो ओरडे कामगार नेता 
पचनी पडत नव्हते 
ते फोन फालतू पीएचए चे 
कानाला डाचत होते 

कठ पुतळी रे कठ पुतळी 
तिज शब्दच फुटत नव्हते 
हालती सूत्रे वरती 
ते झुकत वाकत होते 

ती विद्वत्ता त्या ज्ञानाचे 
पोचाराच होत होते 
उरलेले काही वर्ष 
 त्या दम धर म्हणत होते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

रविवार, १० डिसेंबर, २०२३

गाभारा


गाभारा
*******
निगुढ गाभारा देवतुल्य चिरा 
डोळियात धारा असावांच्या ॥१
ओलावला हात ओलावला माथा 
ओलावल्या  चित्ता खळ नाही ॥२
असे ज्ञानदेव खाली विवरात 
ध्यान समाधीत विश्वाकार ॥३
तयाच्या ऊर्जेचे चैतन्य भरीव 
जाणूनिया भाव तदाकार ॥४
ढकलले कुणी आत मी बाहेर 
देहाचा वावर यंत्रवत ॥५
बुडालो मौनात गर्द घनदाट 
रान चांदण्यात पुनवेच्या ॥६
विक्रांत काळीज जहाले निवांत 
सुख उमाळ्यात दर्शनाच्या ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

ज्ञानदेवा


ज्ञानदेवा
*******
सिद्धेश्वर नंदीश्वरा 
एक वार बाजू सरा
मज लगी पाहू द्या हो 
ज्ञानदेव याची डोळा 

पायावरी डोके तया
मज लागी ठेवू द्या हो
चिद् घन चैतन्यात 
अमृतात न्हावू द्या हो 

अन कानी गुज पडो 
कथिले जे विसोबाला 
चांगदेव नामदेव  
प्रियबंधू सोपानाला 

दिव्य रव कानी पडो  
मंत्र हृदयात जडो 
नको नको आणि काही 
फक्त तोच संग घडो 

संजीवन  देव रूप 
माझ्या अवाक्यात नाही 
चर्म चक्षु विना आम्हा 
आधार तो मुळी नाही 

म्हणूनिया  ज्ञानदेवा 
डोळ्या मध्ये उभा राही
इंद्रायणी काठावर
मज नवा जन्म देई 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .




महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...