रविवार, १० सप्टेंबर, २०२३

सुंभ

सुंभ
****
मिटल्या मनात मिटले चांदणे
मिटलेले गाणे एक तुझे ॥
तुज भेटायचे तुज जाणण्याचे
हृदी ठेवण्याचे भाग्य उणे ॥
तरीही जगणे रेटतेच पुढे
पाठीवर कोढे प्राक्तनाचे ॥
होय निपचित जाणीव लाचार 
काय अंतपार तया नाही ॥
परि मिटते ना वेड सरते ना 
स्वप्न मिटते ना तुझे तेच ॥
विक्रांत जळता सुंभ क्षणोक्षणी 
वेदना घेऊनी कणोकणी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आधार

आधार
*******
अवघ्या जगता 
देतसे आधार 
गुरु कृपा कर 
दत्तात्रेय ॥१
चालवतो पथी 
धरूनिया हाती 
साधनेची रिती 
दाखवतो ॥२
हात सुटताच 
गती खुंटताच 
धाव घे स्वतःच 
भक्तासाठी ॥३
विक्रांत मनात 
संदेह तो नाही 
दत्त जैसा नेर्ड 
तैसा जाई ॥४ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 
ज्वालामुखी (रूपक)
*********
धुमसतो ज्वालामुखी उंच त्या शिखरावर
वाहे लाव्हा येतो धूर रूप असे घनघोर 

पान पान जळू गेले रान सारे मरू गेले
जाणिवेच्या हुंकारात गाव नामशेष झाले 

भय फार पाखरांना त्राण जाई उडतांना 
दुमदुमे  भयनाद फळ कुण्या कामनांना 

अंतरात कोंडलेला किती खोल असे जाळ
 ठाऊक न उलटला किती युगे युगे काळ 

पुन्हा एक जाग येता तोच तप्त वेगावेग
आणि नभी उलटते एक दैवी गोल रेघ 

थरारत्या स्मरणात हादरतो कणकण 
उठूनिया लोपतसे सनातन जागरण ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

म्हातारपण

म्हातारपण
********

कुणालाही कधी काही मागू नये 
अन् म्हातारे झाल्यावर 
कुणावरही अवलंबून राहू नये 
चांगली असतील मुले तर ठीक आहे 
नाही तर आपणच आपली वाट 
वेगळी केलेली बरे
चार पैसे गाठीला ठेवलेले 
तर कधीही चांगली असते 
आपल्या बचतीत कुठलेतरी 
वृद्धाश्रमात शोधून सुखात जगणे 
हे सुद्धा चांगलेच असते 

प्रिय असतात नातलग अन्
सांभाळतात मुले नातवंडे
अहो भाग्य नाही या परते 
पण सगळेच काही 
एवढे नशीबवान नसतात 
वृद्धाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम 
त्यांच्यासाठीच असतात
तिथे जगावे मस्त आनंदात 
नवनवे मित्र जमवत 
नवनव्या गोष्टी शिकत 
नवीन छंद जोपासत 
राहावे सदैव वाहत गंगेगत 
मागील सारे किनारे विसरत 

मला सांभाळा रे 
अशी  अर्ज आर्जवे नकोत 
सांभाळत नाही म्हणून 
शिव्या शापही नकोत 
मुले जन्माला येतात ती
आपल्या आणि त्यांच्या प्रारब्धाने 
पुरे करण्यास काही मागील देणे घेणे
तर मग जे वाट्याला आले 
ते भोगणे क्रमप्रात आहे

अपेक्षात अडकणे म्हणजे 
संसारात अडकणे आणि 
संसारात अडकणे म्हणजे 
जन्मा मरणाच्या चक्रात अडकण
म्हणून सर्व अपेक्षांचा अंत जिथे होतो 
त्या भक्तीसागरात स्वतःला लोटून देणे 
किंवा कर्मयोगाचा कर्तव्याचा पथ पकडून
त्या मार्गाने चालत राहणे 
हेच तर अध्यात्मात शिकणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

प्रियतम

प्रियतम
******
तुझिया शब्दाची भूल मनावर 
प्रीत खोलवर रुजलेली ॥
तुझ्या स्मिताची मधु उधळण 
वेचता वेचून सरती ना ॥
तुझे ते पाहणे डोळे उजळून 
मन हरखून खुळे होते ॥
तुझिया स्पर्शात चैतन्य चांदणे 
देह होतो गाणे सुरावले ॥
तव परिमळ धुंद चंदनाचा 
कस्तुरी उटीचा विश्वाकार ॥
इंद्रिया वेढून नेशी पलीकडे 
प्रियतम कोडे जीवीचे तू ॥
तुझिया ध्यानात नावात प्रेमात 
जीवन वाहत राहो सारे ॥
पुनः पुन्हा घ्यावा जन्म तुझ्यासाठी 
तुजविण चित्ती नको अन्य ॥
आनंद विभोर होय कणकण 
तुजला स्मरण करताच ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

महाडच्या पोरेबाई( शिक्षक दिनानिमित्त)

महाडच्या पोरेबाई( शिक्षक दिनानिमित्त)
**************

महाडच्या एक नंबरच्या दगडी शाळेत 
अहमदनगरच्या खेडवळ तालुक्यातून  
आलेला तो तिसरीला पोरगा 
काळेला गावंढळ बरचसा हडकुळा 
प्रचंड अशुद्ध बोलणारा न व ण न कळणारा 
कुठलीही रितभात न पाळणारा 
पण चौकस नजरेचा हपापून जग बघणारा  दिसणारे सारे डोळ्यात साठवणारा
 शाळेत आला की व्हायचा एकदम बुजरा 
त्याला मिळाला एकच मित्र 
तोही त्याच्यासारखा नवीन पण बडबडा 
अन् पक्का कोकणी 
त्याचा एकमेव आधार
बऱ्याच  दांड्या मारणारा 
बाकी साऱ्याकडून  वाळीत टाकल्यागत 
तो  असायचा मागे बसत 
एकटा एकटा 
शाळा सुटायची वाट पाहत 
टारगट पोराकडून उगाचच मार खात 
..**
तिसरीतल्या बाई तर लक्ष द्यायचा नाहीत 
त्या काय शिकवतात काय नाही 
कुणास माहिती 
त्याच्या डोक्यात काही शिरायचेच नाही 
त्यांच्या डोळ्यातील तुच्छता दुर्लक्ष 
त्याला काही ग्रहणच करू द्यायची नाही 

सगळे जग धूसर होते 
आणि दिवस भरभर उलटत होते 
एका बागेतून उपटून 
दुसऱ्या बागेत लावावे तसे
रोप मरगळलेले होते
ते थांबलेले थबकलेले जीवन होते 
जरी जीव धरत होता मुळे पसरत होती 
पण अस्तित्व तसेच होते 
 न वाढणारे न फुलणारे
जगणे झाले होते गारगोटीगत 
थंड निष्क्रिय निस्तेज सर्वसामान्य 
**
अन्  तेव्हाच जीवनात आल्या पोरेबाई 
रत्नपारखी नजर घेऊन 
आणि त्यांनी घेतले त्याला जवळ ओढून 
अचानक महत्त्व देऊन वाहवा करून 
गुणाचे कौतुक करून 
त्यांच्या त्या आश्वासक शब्दांनी 
आणि दिलेल्या आधाराने 
हरवला अंधार विरघळली उदासीनता 
भेटला दिलासा पेटला दिवा 
अन जमू लागले सभोवती मित्र मैत्रीत्सुक
करू लागले हुशार मुले स्पर्धा त्याच्याशी 
तो कधी येऊन बसला पहिल्या रांगेत 
त्याला कळले सुद्धा  नाही
ते एक वर्ष सारे जीवन बदलणारे
पंख देणारे उडायला शिकवणारे
होते उमलून आणणारे
आणि त्यानंतर 
सदैव तळपणारी स्वत्वाची जाणीव 
कधीही न विझणारी स्वाभिमानाची  ज्योत 
राहिली अखंड अविरत तेवत
ते झाड तगले जगले वाढले 
स्वतःचा आकार घेऊन फुलाफळांनी बहरले 
****
पण ती माळीन 
कदाचित गेली असेल तेव्हाच त्याला विसरून 
आणि आता कदाचित हे जगही सोडून 
खूपदा ठरवूनही मनात लाखदा पुजुनही
 नाही जमले त्याला त्यांना प्रत्यक्ष भेटायला 
भीती वाटत होती त्याला 
कदाचित त्यांनी ओळखलं नाही तर 
खरंतर त्याने फारसा फरक पडला नसता 
वर्षा आली होती ऋतू बरसला होता 
आणि कृतज्ञता भरून धन्यवाद मनात ठेवून 
हे झाड जगले होते
जगत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

रस

रस
****
कैवल्याचा रस वाहे पानोपानी 
हिरवा होऊनी सळाळता ॥
जगती नांदता येतसे कंटाळा 
आतला उमाळा नावरतो  ॥
झन झन झन चालले कंपण 
पिंजारी कोठून आला बरे ॥
कण कण कण  मन ये पिंजून 
विचार कुंठुन जाती क्षणी ॥
कुण्या विरहात डोळा येई पाणी 
ओठात दाटूनी शब्द खुळे ॥
कधी अनामिक नशा ये दाटून
वाटते झिंगून सृष्टी गेली ॥
वरुषती घन साऱ्या दिशातून 
भिजल्या वाचून गती नाही ॥
भिजता भिजता जाहला मेघुटा 
विक्रांत कोरडा होता कधी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...