शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

लज्जत

लज्जत
*******

माझ्या तथाकथित 
दुःखाबद्दल  
माझ्याशी हुज्जत 
घालणाऱ्या कविता 

जेव्हा उतरतात 
संध्याकाळी खाली
माझ्या घराच्या छतातून 
दाटणाऱ्या अंधाराचा हात धरून
वा येतात स्मृतीच्या अडगळीतून 
मनाचे कवाड उघडून 
रेंगाळत दबकत धूर्तपणे 
किंवा आक्रमक आगावू पणाने 
अन् पसरु पाहतात सभोवताली 
माझे अस्तिव गिळून 

मी  त्यांना पकडतो अन्
टाकतो  बुडवून 
चहाच्या कपात 
मग पितो चवीचवीने 
हलकेच फुंकर मारत 

खरच सांगतो 
तो चहा खूपच चविष्ट असतो 

मला ठाऊक आहे 
कविताची हुज्जत कधीच 
थांबणार नाही 
आणि चहाची तलपही 
सरणार नाही

अर्थातच तोवर
सुख दुःखाला कवटाळून 
असोशीने जगणाऱ्या झिंगणाऱ्या 
जीवनाची लज्जतही
मिटणार नाही 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

काय चूक अन्

काय चुक अन ....
***********
काय चूक अन् काय बरोबर 
कुणास कधी कळते काय ?

आकाशाच्या डोक्यावर 
कोण देतो कधी पाय ?

का कधी अन असे कशाला 
प्रश्न उगा का हवे पडायला ?

आभाळ भरते पडते पाणी 
मनी उमलती उगाच गाणी 

या साऱ्याला अर्थ असतो 
ज्याला दिसतो त्याला दिसतो 

कुणा पाहुनी मन हरखते 
बोलून कुणाशी मन उमलते 

नाते नसते तरीही असते 
उगाच का मग सुख वाटते 

जगणे म्हणजे असते जगणे 
ऊन कोवळे टिपूर चांदणे 

जगून घ्यावे क्षण हातातले 
उधळीत मोती ओंजळ भरले
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

ना.धो.महानोर

ना.धो. महानोरांची गाणी
******************

ही गाणी 
पावसाची अन् रानाची 
गर्भार मातीच्या 
सृजनत्वाची 

तिच्यासारखी 
रुजलेली फुटलेली 
फाडीत अंतर 
उफाळलेली 

रानाचे चैतन्य 
रानाच्या भाषेत 
रानाच्या गंधात 
घेऊन आलेली 

ओलीचिंब झालेली 
रानाच्या गंधाने 
दरवळणारी
उत्कतेने भारावली 

ही गाणी
गावाचे दैन्य 
विद्ध शब्दात 
मांडणारी

हृदयाला भिडणारी 
काळीज पोखरणारी 
मातीच्या कुशीत 
शिरून रडणारी 

ही गाणी जेव्हा 
मी वाचली 
तेव्हा माझी नाळ 
माझ्याशी कुजबजली 
म्हणाली 

इथूनच
यायचे असते
रुजून 
या मातीचे अन् आकाशाचे
सत्व घेवून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

गरज


गरज
*****
माझिया शब्दाची तुला न गरज 
कळतेय मज दत्तात्रेय  ॥१
लिहिणे हे शब्द माझीच गरज 
कळतेय मज अवधूता ॥२
आता सरू आली शब्दाची ही रास 
लिहिण्याची आस पुन्हा पुन्हा ॥३
वाटते सोडावी आता ही लेखणी 
कृपेची मागणी अर्थशून्य ॥४
मातीच्या फुलाला गंध तो कुठला 
दोष त्या कुलाला मग कैसा ॥५
मिटून ठेवतो तुझ्या पायी वही 
फार दूर नाही होळी आता ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

सोमवार, ३१ जुलै, २०२३

प्रेम काय असते

प्रेम काय असते
************
शब्दां वाचून शब्दांनी
बोलणे प्रेम असते
पाहिल्यापासून डोळ्यांनी 
पाहणे प्रेम असते ॥
असू देत क्षणभर 
असू देत कणभर 
परिस स्पर्श जीवनाला 
अरे तो होणे असते ॥
ते कुठे काय मागते 
नि कुठे काय देते 
आकाशच जलाशयी
उमटणे ते असते ॥
प्रेम भेटणे जीवनात 
जीवनाचे ऋण असते 
या मनाने त्या मनाची 
आरती करणे असते ॥
भाज्य भजन भाजक 
हे द्वैत तिथे नसते 
आपल्या वाचून आपले
अस्तित्व एक ते असते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, ३० जुलै, २०२३

मज तारियले

मज तारतसे
********
माझं तारतसे पुन्हा पुन्हा स्वामी 
येवसे धावुनी 
हरघडी ॥

आठवता तया  ठाके होत दत्त 
कडेवर घेत 
नेई पार ॥

कुठली पुण्याई मज ना आठवते 
मन हे भरते 
तया कृपे ॥
 
करतो स्मरण हीच त्यांची सेवा 
स्वीकारली देवा 
झालो धन्य ॥

राहू दे ऋणात तुझ्या सदोदित 
वसा हृदयात 
प्रेम भरे ॥

विक्रांत जगात अंध हा चालतो
परी सांभाळतो 
स्वामी राया ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, २९ जुलै, २०२३

श्रावण

श्रावण
*****
मनातला ओला श्रावण 
पंख्या खाली गेला वाळत
किती टाळले भिजायचे 
वितभर छत्री डोई पकडत 

फुटपाथवर पाणी चढले
कुठल्या कुठल्या नाल्यातले 
सारे वेणी फुले हारवाले
कधीचेच ते गायब झाले 

कधी कुठली ट्रेन भेटणार 
मस्टरला वा खाडा पडणार
तो तिचा अन् डबा कुठला 
चढण्याचीच जर मारामार 

रंग गंध अरे भान कसले  
ओले दमट श्वास कोंडले 
डोळ्या मधले चित्र तिचे
धावपळीत जणू ओघळले 

स्वप्नांचेच हे परी असे शहर
स्वप्न जगते मुठीत घेवून 
दिसता ती थकली भिजली
वादळ झेलतो वादळ होवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘









परिक्रमा

परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे  अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा  माईकडे मागत आहे  प्रचंड पाणी प्रवाहाचे  नितळ नि...