गुरुवार, ४ मे, २०२३

गायत्री चौधरी सिस्टरांना निरोप


एम.टी. अगरवाल रुग्णालयातील अनेक व्यक्ती मनात घर करून आहेत गुरव सिस्टर चंदने सिस्टर पाटील मॅडम भोत  वाघमारे साळी पिचड मनीष यादी तशी खूपच मोठी आहे त्यात आवर्जून नाव घ्यावे अशी आणखीन एक व्यक्ती म्हणजे गायत्री सिस्टर. गायत्री सिस्टर. त्या प्रमोशन होऊन भगवती /बीडीबीआय ला गेल्या .त्यामुळे निवृत्ती च्या वेळेला त्या तिथेच होत्या .त्यांना निवृत्तीच्या शुभेच्छा तशा देता आल्या नाहीत पण त्या शुभेच्छा मनात रेंगाळत होत्या, आज शब्दबद्ध झाल्या म्हणून देत आहे.

गायत्री सिस्टर
***********
एक उत्साहाचा झरा 
खळाळता वाहणारा
कलकल करत नाद 
आसमंत व्यापणारा
 म्हणजे गायत्री सिस्टर 

वाहता वाहता स्ववेगी 
दुःखाचा काटा कचरा 
सहज फेकत किनाऱ्याला 
सुखाला आनंदाला 
सदा मिठी देणारा
सर्वांना सुखावणारा 
ओघ म्हणजेच गायत्री सिस्टर 

उगमाला आरंभाला 
कडेलोट झाला तरी 
खोल डोही तळाशी 
सौख्य सूमने फुलवणारा
आनंदाचा ओलावा
म्हणजे गायत्री सिस्टर 

किती मित्र गोळा करावे 
किती जिवलग व्हावे 
जवळ येणाऱ्या प्रत्येकाला 
अमृत सिंचन करावे 
हे ज्याला कळले 
असा स्नेह 
म्हणजे गायत्री सिस्टर 

सदैव नितळ राहायचा 
हा तर धर्म या झऱ्याचा 
निर्मळता ओतून भवती 
स्वर्ग उभा करायचा 
स्वभाव गायत्री सिस्टरचा 

अश्या सुंदर झऱ्याची 
साथ संगत भेटली 
निरपेक्ष सहवासाची 
कलकल कानी पडली 
खरेच दुर्मिळ असती
झरे असे वाहती 
ज्यांच्या जीवनात येती
तिथे आनंद तुषार विखुरती
🙏🙏🙏
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, ३ मे, २०२३

ज्ञानदेवा

ज्ञानदेवा
*******
जाणल्या वाचून जाणतो तुजला 
कृपाळा दयाळा ज्ञानदेवा ॥१

पहिल्या वाचून पाहतो तुजला 
अंतरी साचला घनदाट ॥ २

भेटल्या वाचून भेटतो तुजला 
जीवीचा जिव्हाळा होतं उरी ॥३

काय सागराचे ठाव सागराला 
कण तो इवला कुठे आहे ॥४

अवघे व्यापून आकाश जगता 
ठाव नच रिता कुठे तया ॥५

तैसा तू असतो सदा माझे ठाई 
कृपेची बढाई काय सांगू ॥६

विक्रांत सुखात होवुनिया सुख 
पाहतो कौतुक आपलेच ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २ मे, २०२३

जिभेचे जिव्हार



जिभेचे जिव्हार
************
काय सांगू बाई जिभेचे जिव्हार
चवीला अपार लाचावले ॥१
पाहुनिया गोड तया ये उधाण
जातसे वाहून गोडीत त्या ॥ २
आमरस पुरी विविध त्या खिरी
अन् बासुंदीवरी ताव मारी ॥३
कुठेही पाहता भजी तळलेले
खातच सुटले अपार ते ॥४
आणि सोबतीला विविध ते वडे
पाहताच वेडे होत जाय ॥५
कधी आला ठेचा वाटा भरिताचा
तवंग तेलाचा लाल रंगी ॥६
तर मग काही विचारूच नका
खाये बकबका पाणी पीत ॥७
बरेच खारट थोडे कडवट
तयाला म्हणत  नाही कधी ॥८
लोणची पापड कारले कंटोली
स्वादही निराळी किती एक ॥९
जणू खाण्यासाठी जन्म हा झाला
त्याच त्या सुखाला हपापला . ॥१०
अगं हे पुराण संपणार नाही
पाने वही वही सरतील ॥११
वाढ लवकर पिठले भाकर
जीव तयावर जडलासे ॥१२
विक्रांत दरवळी झाला असे दंग
वास तो खमंग भाजलेला ॥१४
बाप गजानन देत असे खूण
हेच रे संपूर्ण परब्रम्ह ॥१५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १ मे, २०२३

पैसा

पैसा
****

जर मी वेचला पैसा तो कुठला 
रस्त्यात पडला अनामिक ॥
तेणे मज होईल बहुत सायास 
चटके हातास बसतील ॥
तर मग घेऊ कैसे पापी धना 
पापाचा उगाणा पुण्या देवू ॥
दिसते या डोळा लोकामाथी पाप 
जन्माचे अमाप वाढलेले ॥
तया न कळते तया न दिसते
नरकाचे रस्ते विस्तारले ॥
देई गा श्रीदत्ता सर्वांना सुबुद्धी 
नुरावी कुबुद्धी कुठलीही ॥
आधी कळू यावे पाप घडणारे 
फेरे पडणारे जन्ममृत्यू ॥
विवेकाची फुटो पालवी मनात 
वळावे न हात पाप कर्मी ॥
सुख न धनात सुख न मानात 
सुख कामनात अरे नाही ॥
निर्मळ अंतर सुखाचे आगर 
वसे प्रभूवर नित्य तिथे ॥
विक्रांत पित्याचा असे सदा ऋणी 
दावीली वाहणी मज त्यांनी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

चित्ती राहा

चित्ती राहा 
********
नको मज शालू देखणी पैठणी 
राहू दे रे जुनी 
साडी चोळी ॥१
मग मी रावुळी सहज बसेन 
संत रजकण 
घेत भाळी ॥२
नको माझं वाक्या पाटल्या सोन्याच्या 
हिऱ्याच्या मोत्याच्या 
एकावळी ॥३
गोष्टी सांभाळत उगा राहायच्या
देहा स्मरायाच्या 
सर्वकाळ ॥४
तुळशीची माळ देई एकतारी 
आणि तू श्रीहरी 
चित्ती राहा ॥५
मागते मी तुज एकच मागणे 
करू नको जीणे 
भक्ती उणे ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

 

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

भेटत जा


भेटत जा
*******

कधी कधी पाहत जा 
कधीकधी बोलत जा 
कारण काही नको तू 
डोळ्यात उतरत जा ॥

स्वप्न तुझे मागतो ना 
चंद्र हाती ओढतो ना 
फक्त काही किरणे ती 
मनी या उधळत जा ॥

उगाचच हसतेस 
उगाच बहरतेस 
कधीतरी पाकळ्या त्या 
माझ्यासाठी पेरत जा ॥

आकाशात रंग नाही 
मनात तरंग नाही 
अशा गूढ एकांतात 
मजला तू भेटत जा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


बुधवार, २६ एप्रिल, २०२३

मित्र


मैत्री
*****

मित्र टिकवायचे असतात 
मित्र जपायचे असतात 
कारण मित्र हेआपली 
प्रतिबिंब असतात 
आरशा वाचून पडलेली
मित्र हे आपली स्वप्न असतात 
निद्रे वाचून दिसणारी

तिथे आपणच आपल्याशी बोलतो 
आपणच आपल्याला ऐकतो 
दिशा ठरवतो मार्ग बदलतो 
आपल्या ध्वनी नादाचा 
प्रतिध्वनी मित्र असतो .

पण कधी कधी 
आपल्या त्या मित्राचे 
मित्रही वेगळे होवू लागतात
तेव्हा ते मित्रही
वेगळे वाटू लागतात
वेगळे वागू लागतात
वेगळ्या रस्त्याने जाऊ लागतात 
अन वेगळी गाणी गाऊ लागतात 
त्याला काही इलाज नसतो 
सारीच फळे एकाच झाडाची 
किती दिवस सोबत राहतात 

तरीही आपण असतो 
शतशः त्यांचे ऋणी 
त्या ओघळत्या सोनेरी क्षणी 
जीवन सुंदर केलेले असते त्यांनी 

तेच मित्र अन  ती मैत्री सदैव राहावे ही 
इच्छा असते मनात अन असावी ही 
पण अट्टाहासने होत नसते काहीही 

कारण आज उगवला 
मित्र जरी तोच असला
तरी तो दिवस तोच नसतो 
जरी तेवढाच सुंदर असला
तरी तसाच नसतो 

जेव्हा मित्र सोबत असतो 
तेव्हा तो त्या दिवसाचे सार्थक करतो 
तो दिवस ग्रेटच असतो
कारण आपण आपल्या सोबत असतो

 पण तो जातो 
त्यानंतर तो चंद्र ही आपलाच असतो 
रात्रही आपली असते 
ते ग्रह तारका आपली असतात 
नदी वृक्ष आपलीच असतात 
मित्र होऊन आपल्याला रिझवतात 
सदैव सोबत करत असतात 
त्या वृक्षाची कुरणाची नदीची क्षितिजाची 
आपली मैत्री ही तशीच उत्कट असते 
तेही जीवनाचे गाणे असते .
कारण मैत्री ही मित्राहूनही मोठी असते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...