शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

मर्जी


मर्जी 
****
दत्ता तुझी मर्जी म्हणून राबतो 
जगती जगतो प्रारब्धात ॥१

जैसे तू ठेवीसी राहील मी तैसा
 नाम मुद्रा ठसा लेवुनिया ॥२

राही प्रामाणिक कर्तव्य पाईक
 जरी अगतिक दलदली ॥३

फुकाचा तो पैसा उगविल पाप 
जाणूनिया माप पाहतो ना ॥४

दावली दुनिया पुरे दया घना 
तुझिया चरणा नेई आता ॥५

विक्रांत निवृत्ती लावुनिया डोळा 
जाण्या भक्त मेळा कासावीस ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

गणराय!!

गणराय
******

नागबंध ब्रहमसुत्र
पिंगलेस शुंडावक्र 
रिद्धीसिद्धी दोन्हीकडे 
डोईवर स्वर्ण छत्र ॥

मदमस्त गंडस्थळ 
रक्त वर्ण सतीबाळ
नयनात कृपा जळ
शोभती कर्ण विशाळ ॥
 
चतुर्भुज दिव्य मूर्त
पुष्प परशु हातात 
जपमाळ मोदकात 
सम दृष्टी समचित्त ॥

भक्तकाम रीपु र्‍हास 
ब्रीद शोभते जयास 
विघ्नहर गणराय
माझे नमन तयास ॥

देई बुद्धि सदाचार 
देई भक्ती अविकार 
पुण्य भारे पाप सार 
पदी विक्रांता स्वीकार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने










बुधवार, २५ जानेवारी, २०२३

सोंगटी

सोंगटी
*****

कालचा पडदा तुझा मखमली कापडाचा 
आज झाला आहे जणू  वज्रकाय पोलादाचा ॥

काल तुझी साथ होती क्षणोक्षणी संगतीला
आज जणू काळ मध्ये युगा युगांचा लोटला ॥

जगणे ते भाग आहे अर्थ जरी बदलला
सुखाचाच भास येथे खेळ उदास चालला॥

मी कशास सांगू कुणा दर्द माझ्या मनातला
आणि हाती खेळ देऊ जगास या खेळण्याला ॥

तुझे काय कसे काही विचारण्या अर्थ नाही
कोरडेच पात्र सारे बोललीस जरी काही ॥

भेटू नको पुन्हा कधी  दैवास आहे मागणे 
मिटून घेतो लोचने दिसताच मी चांदणे ॥

सरतील दिवस हे सारेच सरे शेवटी 
असे अमर वेदना जरी नवीन सोंगटी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने





सोमवार, २३ जानेवारी, २०२३

घाव


घाव
***

एक घाव एक डाग मिटलाय मनातला
एक भाला उकलला उरामध्ये घुसलेला

अजूनही कुठे कुठे आहे शस्त्र रुतलेले
तन मन अजूनही वेदनेने व्यापलेले 
 
द्वेषाविना सहजच जगलोय आम्ही इथे
काम क्रोध जिंकताना हरलो कट्यारी पुढे

व्हावे आता नीट सारे मागे काही चुकलेले 
चुकणाऱ्या साथ घेत चालू मार्ग निवलेले

परी नको त्याच चुका तेच युद्ध हरलेले 
उंच उंच ध्वज राहो राष्ट्रगाणं स्वरातले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने




रविवार, २२ जानेवारी, २०२३

कळकळ

कळकळ
*******

एक कळकळ  हवीय केवळ 
तेणे तो धावेल चक्रपाणी ॥१

तया नको दान   यज्ञ पूजा घर 
शुद्ध ते अंतर जाणे फक्त ॥२

मांडली आरास  आणले जनास 
मांडावे धनास देवा सवे ॥३

येणे वाढे मान  व्यर्थ उपादान 
माझे मी पण पुष्ट झाले ॥४

चैतन्य कृपेने  विक्रांता कळले 
मन हे वळले अंतरात॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जान २३

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

राम भागीदार

 
राम भागीदार
***********

राम भागीदार माझिया धंद्याला 
मग रे तोट्याला वाव नाही 

साऱ्या भांडवला तयाची मालकी 
स्मरणात चुकी घडेचि ना 

होता व्यवहार जगती असार 
म्हणती संसार फोल जया 

तोच होय सार फायदा अपार 
जीवना आधार पूर्णपणे 

तयाला काळजी अवघ्या धंद्याची 
जणू जगण्याची भक्तांचिया

पडे पुण्य गाठी सांगती चैतन्य 
होताच अनन्य देवापायी

विक्रांते व्यापार केला केल्याविन 
हृदयी ठेवून हाच बोध

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

फुटता फुटता

फुटता फुटता
**********
मी चांदण्याचे गुज तुजला 
सांगण्यास आलो होतो 
पाहून नभा मिठीत तुझ्या 
परतून पण गेलो होतो ॥१ ॥
भरवशावर ज्याचा मी 
किती युद्ध जिंकलो होतो 
ते शस्त्र मोडले दारी तुझ्या 
इमान द्यायला आलो होतो ॥ २॥
कितीदा तरी स्मृतीत तुझ्या 
चिंब चिंब भिजलो होतो 
ते आषाढाचे स्वप्न लाघवी 
पाहण्यास नच धजलो होतो॥३॥
नावही तुझे माहीत नव्हते 
दारावरून कितीदा गेलो होतो 
आणि कळता कधी अचानक 
हृदयी गोंदून बसलो होतो ॥४॥
ते गोंदनही किती काळ मग 
उगाच धरून जगलो होतो 
जीवनातून तू हरवून जाता 
मी जीवनावेगळा झालो होतो ॥५॥
घाव भरले अन व्रण उमटले 
जीवनात जरी रुळलो होतो 
फुटता फुटता कळे दिव्याला 
मी ज्योतीला  मुकलो होतो॥६॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...