शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

वैरी

वैरी
****
देहाची ही वाट देहाच्या गावाला 
जातसे वळून सुखाच्या डोहाला 
हिरव्या जाळीत पिकलेली फळे 
आंबट वा गोड रुचिर मधाळे 
थांबणार पाय वळणार हात 
घेता ओंजळीत कैसी रीत भात 
कधी जाता भेटे बकुळीची सडा 
वेचतांना फुले जीव होतो वेडा 
हसू देत कुणी बघू देत कुणी 
छातीत भरुनी  घ्यावी ती हुंगुनी 
फळ फुले पाने बहराचे गाणे 
पहावे ऐकावे म्हणावे प्रेमाने 
सुख नाकारून आनंद मारून 
कर्म दरिद्री तो जातसे निघून 
तयाला कैसे रे कळेल जीवन
घेतो जो वैरी स्वत:ला करून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

प्रकाश


प्रकाश
*****:
प्रकाशाच्या घरी प्रकाशाच्या सरी 
एक एकावरी ओघळती ॥१

प्रकाश अंतरी प्रकाश बाहेरी 
प्रकाश उजरी दिशा होय॥२

एक एक पेशी देहात प्रकाशी 
चैतन्याच्या राशी स्वयंभूचि॥३

घनीभूत झाली प्रभा ती कोवळी 
मूस वितळली सुवर्णाची॥४

मी पणे विक्रांत जाणीवी जिरत 
पाहणे पाहत  कौतुकाने॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

सावळी राधा


सावळी राधा
**********

पाहणे ते तुझे शब्दाविण गाणे 
लाख लाख तारे उरी कोसळणे
हसणे ते तुझे वासंतिक वारे 
तार काळजाची झणाणे थरारे 
दिसणे असे की आषाढ दाटला
मल्हार सावळा गात्री थरारला
रुसणे जणू की हिम गोठलेला 
अंतरात उष्ण बाहेर थिजला 
टाळले तुजला किती ठरवून
उमलते कळी येता तू दिसून
भाळलो कसा मी मला न कळून
हरवलो जळी जळचि होवून
जाणतो जरी हे असे व्यर्थ  खुळ 
क्षण सवे तुझ्या सुखची केवळ 
असू दे अंतरी चित्र सावळे ते 
सावळ्या राधेस कृष्ण तो कळू दे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

कण


कण
*****

डोळे वितळले भान .साकळले 
दिशात कोंदले पाहणे हे ॥१

अद्वैत फुलाला शून्य गंध आला 
ध्वनी निनादला अनाहत ॥२

गूढ अस्मानात झगागली वीज 
सरू गेली निज जन्मांतरी ॥३

पाषाण फुटले सूर्य उगमीचे 
झाले अशनीचे शतखंड ॥४

उजेड लाजला अंधार निमाला 
तेजाने तेजाला गिळियले ॥५

विक्रांत कुठला कुठे पोहोचला 
कण पांघरला अवनीने॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

रविवार, ३१ जुलै, २०२२

वर्तुळ


वर्तुळ
*****

सुटल्याच अंती साऱ्या व्यर्थ गाठी 
दूरावले धागे गेले ताटातुटी ॥

तुला दोष नाही तुझा द्वेष नाही 
झाला अपघात पण गुन्हा नाही ॥

विझल्या मनाचे जग एकट्याचे
एकटे वाहणे ओझे जीवनाचे ॥

तुझे जग तुला आता माझे मला 
भेदल्या वाचुनी वर्तुळ वर्तुळा ॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.
529

शनिवार, ३० जुलै, २०२२

रिते डोह


रिते डोह
*******

तुझी गाणी
झाली जुनी
कोमेजल्या 
फुलावानी

रंग नाही 
गंध नाही 
विझलेले 
स्वप्न काही

तरी जीव 
तुटतोच
देठ उरी
रुततोच 

कातरश्या
संध्याकाळी 
काही शब्द 
ओठावरी 

नको तरी
आठवती 
रिते डोह
उपसती 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.


गुरू त्वा केला


गुरू त्वा केला
*********

मंत्र घेतला गुरु त्वा केला 
धोंडा ठेवला आरक्षणाला ॥

खुण ठेवली रांग लावली 
जरी न आली आपली पाळी ॥

चाले संसार हा व्यवहार 
पाय ठेवला  दो दगडावर ॥

तशी ती घाई तुजला नाही 
तरीही असे गळा माळही ॥

त्यावर तुझी भली वकीली 
ऐकून बुद्धी थक्क जाहली ॥

"मोक्ष असेल वा नसेलही
स्वर्ग दिसेल न दिसेलही॥

कुणा ठावुक कुणी पाहीला 
असला तर वांदा कशाला ॥

रिस्क कशाला हवी घ्यायला 
गुरुदेव तो असो हाताला " ॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५२७

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...