रविवार, १५ मे, २०२२

जखमेवर मीठ


जखमेवर मीठ 
*****:*****:

ज्याने माझ्या राजाला 
हाल हाल करून मारले 
त्याचे डोळे फोडले 
त्याची चामडी सोलली 
मेल्यावरही तुकडे तुकडे 
करून टाकले 
आपल्या राक्षसी वृत्तीने 
कोत्या खुज्या श्रद्धेने
असंख्य मंदिर तोडली 
देव फोडली देऊळं लुटली 
त्यावर उभी केली 
त्याची श्रद्धा स्थान 

ज्याने माझे हजारो 
बंधू कापून काढले 
ज्याच्या सरदारांनी 
आणि शिपुर्ड्यानी 
माझ्या लाखो माय बहिणींना 
बलात्काराने ओढून नेले 
जनानखान्यात कोंडले
आपली अवलाद वाढवणारी 
जिवंत यंत्र बनवले 

त्याच्या थडग्या पुढे 
कोणी नतमस्तक होत असेल 
फुले वाहत असेल
चादर चढवत असेल
सन्मान करत असेल 
जाणून बुजून 
आमच्या जखमेवर 
मीठ चोळून

तर त्या महाभागाला
मोठे म्हणणे नेता ठरवणे
त्याच्या हात हातात धरणे 
त्याच्या पंगतीत बसणे 
त्याला आदरार्थी बोलणे 
हा आमचा षंढपणा ठरेल 

आणि ते
जे चार दिवसांच्या सत्तेसाठी 
करतात लाळघोटेपणा 
त्याच्यासमोर 
झोडतात त्याच्या पार्ट्या 
करतात जयजयकार
ते  तर वारांगणाच ठरतात .

आणि मला कळत नाही 
कि ही लोक आपल्या वाचेने
महाराजांचे नाव तरी
कसे घेऊ शकतात?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

दत्त माय


दत्त माय
********
कैसा जीवनाचा
चालला प्रवास
अवघे सायास
करू जाता ॥१

सदैव समोर 
असतो उतार 
न मिळे आधार 
थांबावया ॥२

नामाची ती काठी 
मिळता हातात 
बळ पावुलात
येते काही ॥३

ध्यानाचे झुडूप 
येता जीवनात 
होय यातायात 
सहनही ॥४

पण कधीकधी
पडताच खाली 
वेदना आरोळी 
मुखी येता ॥५

धावे दत्त माय
प्रेमे सावरते 
हातास धरते 
चालविते ॥६

किती रुपातून
किती हातातून
घेते सांभाळुन 
प्रेमळास ॥७

विक्रांता पातला
किती अनुभूती 
जीव तयाप्रती 
वाहीयला ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




शनिवार, १४ मे, २०२२

ते डोळे

ते डोळे
*******

ते डोळे 
विस्फारलेले
मोठमोठाले
थांग नसले
डोह जाहले

ते डोळे 
बावरलेले
किंचित खुळे 
भान विसरले 
हरखून गेले

ते डोळे 
केसा आडले 
लज्जित ओले
काजळ ल्याले 
दूर थबकले 

ते डोळे 
नितळ काळे
टपोर भोळे
भूल पडले
जीवन भरले

ते डोळे 
हरखून गेले 
मनी ठसले 
गीत जाहले 
वसंतातले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘४५२

केतकीचे शब्द

केतकीचे शब्द
***********
कुठे घोस केतकीचा
कुठे चंद्र शरदाचा ? ॥

एक शब्द मतासाठी 
एक शब्द सत्वासाठी ॥

म्हणताच कुणी अरे 
तेथे उमटतो का रे ॥

जातिभेद गाडा सारा 
धर्मध्वज हाती धरा ॥

बोलू नये जाणत्याने 
ज्याने दुखावती मने ॥

अजाणाचे शब्द तेही 
नको करणारे लाही ॥

जग सारे जाणते रे 
पाणी कुठे मुरते रे ॥

घेत हाती फावडे ते 
कोण पुढे धावते ते ॥

खणू नका कुणी अरे 
रोप मराठी ते मरे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, १३ मे, २०२२

दत्त सर्वव्यापी


दत्त पाहिला 
*********
दत्त पाहिला जनात 
दत्त पाहिला मनात 
दत्त पाहिला वनात 
दत्त ठाई ठाई ॥१

दत्त पाहिला प्राण्यात
दत्त पाहिला पक्षात
दत्त पाहिला वृक्षात 
दत्त कणोकणी ॥२

दत्त पाहिला पाण्यात 
दत्त पहिला धान्यात 
दत्त पाहिला अन्नात 
दत्त प्रसादात ॥३

दत्त पाहिला डोळ्यात
दत्त पाहिला मनात 
दत्त पाहिला हृदयात 
दत्त अंतर्बाह्य ॥४

दत्त  पाहिला स्थुळात 
दत्त पाहिला सूक्ष्मात 
 दत्त पाहिला सर्वांतरात
 दत्त महाशून्यात ॥५

दत्त उणे या जगात 
काही दिसेना विक्रात 
दत्त गाण हे दत्तात 
उमटे कौतुकात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, १२ मे, २०२२

असे कसे म्हणू


असे कसे म्हणू
***********

जर का तू अजूनही
सापडली नाहीस मला
तर तू हरवली आहेस
असे कसे म्हणू मी तुला॥

जर का तू  अजूनही
दिसलीच नाहीस मला 
तर तू कळली आहेस 
असे कसे म्हणू मी तुला॥

तुझे सोनसळी लावण्य 
अन उर्जेचे  अवतरण
मजला जाणवत नाही 
असे कसे म्हणू मी तुला॥

एक अनाकलनिय 
गुढ तरीही हवे हवेसे
अनूभुतीचे जग नकोय
असे कसे म्हणू मी तुला॥

येण्या जाण्याचे सारेच
स्वातंत्र्य आहे तुला
तू बेपर्वा चंचल आहेस
असे कसे म्हणू  मी तुला॥

शक्ती वृती जगण्याची 
आस प्यास ह्रदयाची
तुुला विसरून जगावे
असे कसे म्हणू मी तुला॥

स्वप्नांचा देश दाखवते 
सुखाची सावली होते
तुझी प्रतिक्षा सुंदर नाही
असे कसे म्हणू  मी तुला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, ११ मे, २०२२

जुगार


जुगार
******
खेळलो बहुत खेळ हा शब्दांचा 
भक्तीचा प्रेमाचा दत्तात्रेया

फिरवून शब्द तेच मागितले 
अक्षरी घोटले प्रेम तुझे 

पाहियली स्वप्ने मनाच्या मुक्तीची 
नि:संग चित्ताची पुन्हा पुन्हा 

लाविले पणास अवघे जीवन 
पाठ फिरवून आकांक्षांना

फुका गेला डाव बहुदा खेळून 
जाणार येथून रिक्त हस्त 

सारेच जुगारी कुठे जिंकतात 
तरीही येतात खेळायला 

जिंकण्या तुजला येईल परत 
राहिल खेळत विक्रांत हा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘१८९

वाट (नर्मदा काठावरील कविता)

वाट (नर्मदा काठावरील कविता) ******* देही सजलेली वाट मळलेली  उधळून माती नभी दाटलेली  तीच तीच वाट जरी पायाखाली  हर दिन नव्या स्पर्...