गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

नर नारी


नर नारी 
******

काय शाप माणसाला इथे मनाचाच आहे
जळते अखंड आग सूर्य तसाच आहे ॥१

कसे वेग वासनांचे उठतात आदीम जे 
तोडला वृक्ष कितीदा उभा तसाच आहे ॥२

सरणार ना कधीच का या हट्ट जीवनाचा 
हव्यास सृजनाचा जीवना तसाच आहे॥३

म्हटले जरी विसरू तो साराच भुतकाळ
स्मृतीवरी सोनियाचा तो डाग तसाच आहे .॥४

कुणास कशास आता हा द्य‍ावा नवीन साचा 
घडला जसा की नंदी दारात तसाच आहे ॥५

तो दाह जाणतो मी नारी तुझ्या मनाचा 
दे लाख जन्म पुरूषा गर्भ तसाच आहे ॥६

घेवून कामना कोटी वाहती किती सरीता
झेलून प्रवाह पोटी सागर तसाच आहे ॥७॥

हरवला ध्यानी जरी धरून दत्त ह्रदया
पाहतो स्वत:स सदा विक्रांत तसाच आहे ॥८॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘














चूक

चूक
*****

त्या तुझ्या दुनियेत जरा जाऊन आलो 
हरवलो होतो कुठे ते पाहुनी मी आलो ॥

लाख स्वप्ने होती निखळून पडलेली 
ठसे त्या वरचे हळू पुसून मी आलो ॥

मुग्ध तुझे हासू कणोकणी होते कुठे
ठेवले चोरून तयास वेचून मी आलो ॥

भेटायचा तुझ्या जरी नव्हताच भरोसा 
नशिबाची सोंगटी तरी टाकून मी आलो 

हसणार नाही तू आता रडणार नाही 
बंद दारास त्या कडी लावून मी आलो 

किती आग विझली ती बघावयास गेलो 
पण तीच धग जाणवून जळून मी आलो 

सुखामध्ये कोण किती दु:खी कोण आहे 
तीच चूक शोधायची पुन्हा करून मी आलो

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

पौर्णिमा


पौर्णिमा
*******
जेव्हा चंद्र येतो हळू  
सारत घन पटल 
संगमरवरी शिल्प 
साकार होते समोर ॥

मुग्ध नितळता जाते 
आत खोल झिरपत
चंद्रोदय एक नवा 
मनात माझ्या करत ॥

दोन कृष्ण मेघ माझ्या 
गहिवरल्या डोळ्यात 
जाती भारावून असे
कडा चिंब भिजवत ॥

आकाश व्यापून गंध 
रात राणी उधळत 
स्वप्न सीमेवर भान 
जाते कुठे तरंगत ॥

अशी पौर्णिमा येते जी 
फक्त माझीच असते 
हरखतो जीव खुळा 
स्वप्न सुखाला पडते ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

अमृतान्न

अमृतान्न
********

दत्ता मज देई 
नामाचा प्रकाश 
ध्यानाचे आकाश 
कधीतरी ॥

मग मी गुंतला 
संसारी रमला 
होईन जागला 
परमार्थी ॥

तुझिया प्रेमाचे 
घेता अमृतांन्न 
काय ते तुषांन्न 
आवडेल ॥

वर्णितात संत 
मिटक्या मारत 
गोडवे नि गात 
त्याचे सदा ॥

विक्रांत हातात 
भोग खरकटे 
जगाचे या उष्टे 
फेकलेले ॥

मज वाटे शीण
त्याचा दत्तात्रेया
येऊन सदया 
प्रसाद दे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

चेतना

चेतना
*****

स्मरता भजता 
श्री दत्तप्रभूला 
जगण्यामधला 
अर्थ कळे ॥

उगाच जगती
आणिक जळती
वणव्यात किती 
तृणपाती  ॥

मरण ठेविले
आहेच पुढती
सरणावरती
जाणे कधी॥

मरणा आधीच 
मरण पाहणे
श्रीदत्त कृपेने
व्हावे इही ॥
 
मरण असते 
गाठी सुटणे
त्या पंचभूतांला
स्थळी जाणे ॥

परंतु चेतना 
होता दत्तमय 
अन्य कुठे लय
तिचा घडे॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

दत्त पदी


दत्तपदी
******

शाई मधले शब्द उडू दे
पाना मधले शब्द भिजू दे 

परी ठसले मनी आत ते   
दत्त नाम  नित्य असू दे 

दत्त राम रे दत्त कृष्ण रे 
स्वामी साई नि दत्त हरी रे 

काही म्हण तू  काही रे 
तत्त्व तेच ते दृढ धरी रे 

दत्तास्तव मन रडू हसू दे 
काव्या मध्ये दत्त दिसू दे 

ध्यानी असू दे मनी असू दे 
चित्तवृत्तीत सदा वसू दे 

दत्ता येई रे माझा होई रे 
मीपण मग हे सवे नेई रे 

हेच मागणे विक्रांतचे रे
दत्ता पदी तव जागा दे रे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

वसे ह्रदयात

वसे ह्रदयात
********
वसे ह्रदयात 
दत्त माझा देव 
सापडली ठेव 
मज येथे ॥

देव हा विरक्त 
साधकांचे इष्ट 
करी दृष्टादृष्ट 
भव पार ॥

पुरवितो काम 
ऐश्वर्य देऊन 
मोक्षाचे साधन 
मुमुक्षांस॥

जडले हे मन 
तयापायी आता 
सुख ते अन्यथा 
सापडेना ॥

विक्रांता नुरली 
अन्य काही आस
करी दत्ता दास 
तुझा मज ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...