रविवार, १९ डिसेंबर, २०२१

दत्त पदी


दत्तपदी
******

शाई मधले शब्द उडू दे
पाना मधले शब्द भिजू दे 

परी ठसले मनी आत ते   
दत्त नाम  नित्य असू दे 

दत्त राम रे दत्त कृष्ण रे 
स्वामी साई नि दत्त हरी रे 

काही म्हण तू  काही रे 
तत्त्व तेच ते दृढ धरी रे 

दत्तास्तव मन रडू हसू दे 
काव्या मध्ये दत्त दिसू दे 

ध्यानी असू दे मनी असू दे 
चित्तवृत्तीत सदा वसू दे 

दत्ता येई रे माझा होई रे 
मीपण मग हे सवे नेई रे 

हेच मागणे विक्रांतचे रे
दत्ता पदी तव जागा दे रे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

वसे ह्रदयात

वसे ह्रदयात
********
वसे ह्रदयात 
दत्त माझा देव 
सापडली ठेव 
मज येथे ॥

देव हा विरक्त 
साधकांचे इष्ट 
करी दृष्टादृष्ट 
भव पार ॥

पुरवितो काम 
ऐश्वर्य देऊन 
मोक्षाचे साधन 
मुमुक्षांस॥

जडले हे मन 
तयापायी आता 
सुख ते अन्यथा 
सापडेना ॥

विक्रांता नुरली 
अन्य काही आस
करी दत्ता दास 
तुझा मज ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

नको ते



नको तेच काज
*****:*****

नको तेच काज 
देऊनिया दत्त 
बसला हसत 
दूरवरी ॥

भरतेय पोट 
चालतेय घर 
वाहतो संसार 
पाठीवर ॥

करतो गुलामी 
जनाची मनाची 
करणी जन्माची 
हीच झाली ॥

आणिक नोकरी 
एक ती लाचारी 
घातलेच भरी 
वाहण्याला ॥

तुझा असा खेळ 
कळेना मजला 
आलाय कंटाळा 
बहु परी ॥

विक्रांत ढकले
जीवनाची गाडी 
जाय गडगडी 
उतारास ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

वृक्ष

 वृक्ष
*******

जेव्हा पडे बीज 
उत्तम मातीत 
सहज रुजत 
फळा येते ॥१

सफळ होताच 
पुण्यकर्म सारी  
बघ मुक्ती चारी 
घरी येती ॥२

तरारून येते 
श्रध्येचे अंकुर 
अनुभूती पूर 
ये दाटून ॥३

अैसे  काही होते 
कुण्या जीवनात 
भाग्याचा वसंत 
डोकावतो॥४

लगडते झाड 
पिकल्या फळांनी 
सुखाने भरूनी 
जग जाते ॥५

आत्मतृप्त होता 
सुख ते वाटता 
विश्रांती न घेता  
सुखी होतो ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

नर्मदामाई अन धरणे


नर्मदामाई अन धरणे 
***************

बुडाली शहरे .
देवळे बुडाली 
प्रगती ही झाली .
थोर इथे॥

हरवली घरे 
आणिक शिवारे  
जीव तया झुरे 
आठवून ॥

माय तुझा पथ 
त्यात हरवला 
दृष्टिदूर झाला
किनाराही ॥

शुलपाणी देव 
निसर्ग सुंदर
पाणी तयावर 
ओढवले ॥

माय तुझी मर्जी 
आम्हाला कळेना .
परी साहवेना .
व्यापार हा ॥

विक्रांत चालतो. 
चालल्या वाचून।
परिक्रमेतून 
लाखो पायी.॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

पदावर

दत्त पायावरी
*********
दत्ता पायावरी 
मज घ्या एकदा 
जन्मही आपदा 
सरू द्या हो ॥

दत्ता संसारात 
नको वाटे आता 
व्हावा मी चालता 
तुझ्या पथी ॥

दत्ता कशाला रे 
पाठवले इथे 
मज न कळते
काही केल्या॥

पण एक बरे 
बसतात ठेचा 
तेणे येते वाचा 
नाव तुझे ॥

विक्रांत जगात 
जगतो उदास 
धरुनिया आस 
दत्ता तुझी॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

साद


साद
*****

तुझ्या डोळीचे चांदणे 
साद घालती कुणाला 
ओठ व्याकूळ अधीर
याद करती कुणाला

स्वप्न तेच जरी जुने 
नवी फुटली पालवी 
ताप साहून उन्हात 
मनी उभारी हिरवी 

बटा पिंगट मोकळ्या 
सोन झळाळी मिरवे 
फुलपाखरू अल्लद 
तिथे कुणीतरी यावे

काय कानी तुझ्या पडे 
बोल गुज अलगुज 
जग द्वाड चहाटळ 
नको ऐकू कुजबुज

तुझा यमुनेच्या तीर
चिंब अमृत पुनव 
मनी घालतो ना रुंजी 
मंद बासरीचा रव   ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...