शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

जीवन स्वीकार

जीवन स्वीकार
******

वितळणाऱ्या धुक्यागत 
जीवन हळूहळू सरत आले आहे 
या जगण्यातील आकार 
भ्रम हळूहळू विरघळत आहेत 
आणि आपण  कोणी नाही 
काही नाही 
याचे दर्शन हळूहळू स्पष्ट होत आहे
तसे म्हटले तर भय नाही 
या देहात अन मनात 
पण खंत जरूर आहे 
निसटून गेलेल्या क्षणांची 
विसरून गेलेल्या माणसांची 
मित्रांची  सग्या सोयर्‍यांची
त्या प्रिय जनांची
तसेच हुकलेल्या संधीची
ज्याचे झाले असते सोने
कदाचित.

मी आकाश आहे 
असे उंच उंच उडणाऱ्या 
झाडाच्या पानाला 
गवताच्या काडीला 
किंवा कणभर धुळीला 
वाटत असते
आणि ते खरेही असते
त्या क्षणी 
कुठल्यातरी नशिबाची हवा 
प्रसंगाची वावटळ 
घेऊन जाते माणसाला 
उंच अस्मानात 
आणि दाखवते 
एक विस्मित करणारे दृश्य 
त्या जगाच्या 
त्या आश्चर्यकारक देखाव्यात 
तो विसरून जातो 
स्वतःचे अस्तित्व 
आपलेअसलेपण 
आणि ते असीम दृश्य
पाहता-पाहता समजून जातो 
की मीच आकाश आहे 
पण थांबते ती हवा 
थांबते ते वादळ जेव्हा 
 लहरत पुन्हा येऊन पडतात 
ती अस्तित्व धरतीच्या कुशीत 
माती होऊन 

 पण ते माती होऊन पडणे
असते स्वरूपात मिळून जाणे
आपण जे काही असतो 
तिथे परतणे
आणि आणि ते घडते
प्रत्येकाच्याच बाबतीत 
अपरिहार्यपणे.

त्याच्या या संपूर्ण स्वीकारात 
किती अथांग अपार शांती असते 
किती सौख्य असते 
हे त्या स्वीकारावरतीच अवलंबून असते.
जीवनाच्या शेवटाचा
अंताचा स्वीकार 
हाच खरोखर 
जीवनाचा स्वीकार असतो  


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

नृसिंहवाडी


नृसिंहवाडी
********

वाडीच्या व्यापका 
कृपेच्या कारका 
जगत चालका 
नृसिंह देवा ॥

करुणा अलोटा 
उगा मी चालता 
भाग्याचिया वाटा 
आलो सुखे॥

तुझिया कृपेने
घडले दर्शन 
मनी विराजून 
भक्ताचिया ॥

मनाचे मालिन्य
गेले हरवून 
जागले चैतन्य 
दर्शनाने ॥

जाहलो तिथला 
असून इथला 
दर्शनी मिटला 
काळवेळ ॥

कालची पुनव 
मनी उगवली 
पुन्हा रे जाहली 
कोजागिरी ॥

विक्रांत रूप ते
साठवी  नेत्रात
जाहले क्षणात 
लक्ष कोटी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

भोगवी


भोगवी
*****
का रे भोगवी वेदना 
मज दत्त दयाघना ॥

पाप इतुके का झाले 
भोग वाट्यास हे आले ॥

आता टाकावा म्हणतो 
देह जड हा वाटतो ॥

पुन्हा भोगायची भीती 
आहे ठेवली संगती ॥

तूच मुद्दलही देतो 
व्याज माथ्याला मारतो ॥

चक्रवाढी सावकार 
तुझा कळेना व्यापार ॥

विक्रांत चक्रात फिरे 
जन्म मृत्यू गरगरे ॥

दुःख वेदना साहतो 
त्यात प्रारब्ध पाहतो ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

जीवीचे जिव्हार

जीवीचे जिव्हार
***********

जीवीचे जिव्हार 
माझा ज्ञानदेव 
स्वानंदाची ठेव 
मुर्त पुढे ॥१

शब्द रत्नाकर 
पाऊलांसी रत 
असे सदोदित 
तया ठायी ॥२

नव सहस्त्र त्या 
ओव्या सवंगडी 
नेती पैलथडी 
हसतच ॥३

तिथे असे काय 
बुडायाची मात 
एकटीची साथ 
पुरी होय॥४

विक्रांत धरतो 
तयाला अंतरी 
शब्द शब्दांतरी
माय माझी ॥५

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मनीचे आकाश


मनीचे आकाश
****
मोह रंगल्या पाखरा
खुले  आकाश दिसेना 
फांदी सावली सुखाचे
हवे पण रे सुटेना  

क्षितिजाला अंत नाही 
मन सांगे पुन्हा मना
भय गोठलेले पंख 
वारा कवेत घेईना

वृक्ष पायतळी दिसे
लाख पंख पिसलेले 
हिरव्या झाडीत असे 
डोळे हिरवे रोखले

उड उड रे पाखरा 
फांदी सोड आता जरा 
तुझ्या मनीचे आकाश 
जावो आकाशाच्या घरा.

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

कोविड अपेक्षाभंग

😂
😃😄
😬😬😬
😅😅😅😅
😋😋😋😜😝

कोविड आला आणि 
सवे भीती घेऊन आला 
त्याचबरोबर थोडीशी 
आशा ही घेऊन आला 
की आता कदाचित 
काही नको असलेली धेंड सोंग 
आपोआप नाहीशी होतील म्हणून 
पण झाले भलतेच 
ढेंड आणि सोंग शाबूत राहीली
आणि भलतीच विकेट पडून गेली.
त्यामुळे माझी तर नक्कीच खात्री झाली 
की हा कोविड 
काही स्पेसिफिक लोकांसाठीच
बनवला गेला होता
सारे वी आय पी शाबूत 
सारे स्टार शाबूत 
माझ्यासकट 
किती मैत्रिणींचे नवरे ही शाबूत
किती अपेक्षाभंग हा 
केवढी मोठी शोकांतिका!!



🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

फांदी आभास

फांदी
****

हिरवीच असते 
तुटलेली फांदी 
झुलत असते 
वार्‍यावरती

जरी आता ती 
झाड नसते 
तरीही तिच्यात ते
वृक्षपण असते 

तसेच होते अस्तित्वाचे इथे 
जेव्हा ते जाते सुटून
जीवनाच्या आसक्तीतून
हवेपणाच्या मागणीतून

हिरवळ असते
सळसळ असते
ओलेपण असते
पण संकर्प तुटलेला असतो
आधार मोडलेला असतो

किती अन कसे पुढे
याला अर्थ नसलेला 
जगण्याचा आभास 
फक्त 
जीवन मिटलेला 


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...