शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

मोजतोय वर्ष

मोजतोय वर्ष 
**********

मोजतोय वर्ष 
आता सुटायची 
माझ्या जगण्याची 
मीच आता ॥

दिसते आकाश 
इवला प्रकाश 
कळू येई भास
असण्याचा ॥

अन मग मिठी 
देहा अंधाराची 
रात्र काळोखाची 
दीर्घ अशी ॥

असणे नसणे
कुणा न कळते 
तरीही वाहते 
अस्तित्व हे ॥

कशासाठी जीणे
कुणा न ठाऊक 
पोटातली भूक 
जगवते ॥

आकळेना गुन्हा 
शिक्षा आठवेना 
विझलेल्या खुणा
दिवसाच्या ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

नाही


नाही
*****
भोगात तू नाही 
त्यागातही नाही 
पांघरून "नाही"
लपशी तू ॥

जे जे दावू जाय 
तयाला नकार 
देऊन अपार 
सर्व ठाई ॥

भक्तीचे आकाश 
देऊनी मनाला 
लावतोस लळा
जरी काही ॥

परी दत्ता दिसे 
तोही एक खेळ 
प्राप्तीची सबळ 
अभिलाषा ॥

पेटली जिज्ञासा 
शुद्ध जाणिवेत 
तिज या जगात
वाव नाही ॥

एकट्याचा पथ
एकटीच वाट 
जाणे उतरत
अंतहीन ॥

विक्रांत मागतो 
दत्ता तुझा हात 
रहा अंतरात 
दिशा देत ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

खेळ


खेळ
****::

माझेपण माझ्या
दृष्टित येईना 
कळतोय वारा 
हातात गावेना 

मागचे आठवे 
मन गुंतलेले
सुटते गाठोडे 
गच्च भरलेले 

काय काय करू 
गोळा ते कळेना 
सांडले ते काय 
माझेच होते ना 

बकुळ वेचू का
प्राजक्ताचे सडे 
गुलाब मोगरा
मन होते वेडे 

गंध घाले पिंगा 
दाटे सभोवत
पल्लव मार्दव 
नेतसे ओढत

कधी गमतो हा 
खेळ असे तुझा 
घडविण्या बोध 
दत्ता स्वरूपाचा 

कधी गमतो हा 
व्यर्थ कारभार 
जगण्यास नाही
मुळीच आधार 

जैसा कारागिर  
चुकल्या मुर्तीला 
देतसे लोटून 
पुन्हा त्या मातीला 

तैसे काही व्हावे 
वाटे या घडीला
माती जावी माती
तेज चैतन्याला 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

ढगफुटी

ढगफुटी
******

ढग फुटल्या गावाचे
आसू आटले डोळ्यात
मिळे दरड समाधी 
देह मातीच्या वेढ्यात 

अशी करणी कुणाची 
कुणी कुणा सांगायची 
पाप वदुनिया मुखी
काय छाती पिटायाची 

जाते हरवून गाव 
पिढ्या पिढ्या नांदलेले 
जाते हरवून नाव 
पंचक्रोशीत गाजले 

एक फटका काळाचा 
बसे आंधळ्या हाताचा 
जन्म मातीमोल होतो 
काल फुलल्या फुलाचा 

दोष द्यावा का दैवाला 
दोष द्यावा का देवाला 
जीणे माणूस मुंगीचे 
एक तारा तुटलेला 

ऐसे मरण पाहून 
मनी विक्रांत भ्यायला 
पराधीनता जाणून 
खेळ सोडुनिया गेला

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

प्रेम मिरविले


मिरविले प्रेम
*********

मिरविले प्रेम 
जिरविले प्रेम 
हरविले प्रेम 
प्रेमापायी  ॥

प्रेम प्रेमिकांचे 
प्रेम देवतांचे 
घराचे दाराचे
सारे फुगे ॥

प्रेम माझ्यातले 
माझ्यात जन्मले 
माझ्यात विरले 
काळ ओघी 

मज वगळता 
प्रेम वगळते
बीजची जळते
मोड आले 

देहाच्या सुखाची 
मनाच्या सुखाची 
सावली हव्याची
सर्व ठाई ॥

ऐसे मी पाहीयले
जग सजलेले
प्रेम मांडलेले 
विकायला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

स्मृती भुतावळ


स्मती भुतावळ
*******

स्मृतीत जगणे 
नसते जगणे 
अरे ते मरणे 
सर्वकाळ ॥

सारी भुतावळ 
झालेल्या क्षणांची 
वाटते आताची 
जरी इथे ॥

आठवी आठव 
सारा विसरतो 
मलाच पुरतो 
मीच खोल ॥

कालच्या डोळ्यांना 
आज हा दिसतो 
क्षण निसटतो
म्हणुनिया ॥

मनाचे खेळणे 
मनाचे जगणे 
मनाचे राहणे 
सर्वकाळ ॥

पाहतो विक्रांत 
कालचे सोडून 
आजचा होऊन 
काही नवे॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

संत


संत
****

विसर्जित देह 
करुनिया संत 
जाहले अनंत 
विश्वाकार ॥

संपली मर्यादा 
आता त्या देहाची 
काळजी विश्वाची 
वहायाला ॥

पंच महाभूत 
जाहले ते धन्य 
आकारा येऊन 
चैतन्याच्या॥

घेऊनी कवेत 
अवघी अवनी 
भरवी प्रेमानी
माऊली ती॥

ज्ञान भक्ती योग 
उठती पंगती 
धनी न पुरती 
वाढायची ॥

विक्रांत पंक्तीत 
कृपा अलौकिक 
पावतो मौतिक 
घास सुखे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...