सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

प्रेम मिरविले


मिरविले प्रेम
*********

मिरविले प्रेम 
जिरविले प्रेम 
हरविले प्रेम 
प्रेमापायी  ॥

प्रेम प्रेमिकांचे 
प्रेम देवतांचे 
घराचे दाराचे
सारे फुगे ॥

प्रेम माझ्यातले 
माझ्यात जन्मले 
माझ्यात विरले 
काळ ओघी 

मज वगळता 
प्रेम वगळते
बीजची जळते
मोड आले 

देहाच्या सुखाची 
मनाच्या सुखाची 
सावली हव्याची
सर्व ठाई ॥

ऐसे मी पाहीयले
जग सजलेले
प्रेम मांडलेले 
विकायला ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

स्मृती भुतावळ


स्मती भुतावळ
*******

स्मृतीत जगणे 
नसते जगणे 
अरे ते मरणे 
सर्वकाळ ॥

सारी भुतावळ 
झालेल्या क्षणांची 
वाटते आताची 
जरी इथे ॥

आठवी आठव 
सारा विसरतो 
मलाच पुरतो 
मीच खोल ॥

कालच्या डोळ्यांना 
आज हा दिसतो 
क्षण निसटतो
म्हणुनिया ॥

मनाचे खेळणे 
मनाचे जगणे 
मनाचे राहणे 
सर्वकाळ ॥

पाहतो विक्रांत 
कालचे सोडून 
आजचा होऊन 
काही नवे॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

संत


संत
****

विसर्जित देह 
करुनिया संत 
जाहले अनंत 
विश्वाकार ॥

संपली मर्यादा 
आता त्या देहाची 
काळजी विश्वाची 
वहायाला ॥

पंच महाभूत 
जाहले ते धन्य 
आकारा येऊन 
चैतन्याच्या॥

घेऊनी कवेत 
अवघी अवनी 
भरवी प्रेमानी
माऊली ती॥

ज्ञान भक्ती योग 
उठती पंगती 
धनी न पुरती 
वाढायची ॥

विक्रांत पंक्तीत 
कृपा अलौकिक 
पावतो मौतिक 
घास सुखे ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

चाल सवे दत्ता

चाल सवे दत्ता
**********::

सगुणाची काठी 
मज सोडवेना 
वाट पाउलांना 
सापडेना ॥

निर्गुण आकाश 
मज आकळेना 
पंख गवसेना 
उडायला ॥

निर्ढावलेले मन 
कोडगी वेदना 
दंश साहतांना 
अस्तित्वाचा ॥

वासनांचा जथा 
आहे सोबतीला 
मद्य पाजायला 
देह सुखी ॥

कुठून फुटला 
जिज्ञासा अंकुर 
पाठीवर शूळ 
वाहण्याला ॥

बरं तर मग 
तुला न सुटका 
चाल सवे दत्ता 
विक्रांतच्या ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

आले देव

आले देव
*******:
आले देव आले
गणराय आले 
डोळे हे भरले 
आनंदाने॥१

टाळ खणाणले 
घोष निनादले 
मन सुखावले 
देव आले॥२
 
दुख हरवले
दैन्य विसरले
सुख उधाणले
जग झाले ॥३

आरास मांडली
दिप पाजळली
रांगोळी काढली
कौतुकाने॥४

फुले जमविली 
हार गुंफीयली 
सुंगधे दाटली 
घर दारे ॥५

मोदक शिजले 
लाडू बांधियले 
भातुके मांडले 
किती  एक ॥६

प्रकाश दाटला 
चैतन्य भरला 
हर्ष ओसंडला 
कणोकणी ॥७

विक्रांत गणात 
खेळतो रंगात 
बाप्पा मोरयात 
हरखून ॥८


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .




शून्य पाळणा



शून्य पाळणी
********

हवे पण उद्याचे 
असे ते कालचे 
साठल्या स्मृतीचे 
शिळे अन्न ॥

स्मृतीला स्मृती
जोडूनिया स्मृती 
साखळी चालती 
अनिर्बंध ॥

स्मृतीचा मिडास 
स्पर्शता क्षणाला 
जन्म दे सोन्याला 
मृतमय ॥

नावगावाविन 
वाहू दे जीवन 
नवा उमलुन 
हर क्षण ॥

पाहतो विक्रांत 
हाच एक क्षण 
होऊनिया प्राण 
श्वासातला

परी जातो झनी 
पुन्हा निसटून 
मनी हरवून 
त्याच जुन्या ॥

हरवते बळ ॥
राहण्या सजग
अन् तगमग 
आग होते॥

बाप अवधूत
गालात हसुनि
शुन्याच्या पाळणी
निजवतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


वेळूचे स्वर


तू नाहीस  
तुझ्या कविताही नाहीत 
ॠतु गेला 
साहजिकच
भ्रमरही निघून गेले 
वेडया वेळूला
आजन्म शापागत
पडलेली छिद्र
त्यातून वाहतो 
कधीतरी चुकार वारा 
अन उमटतात स्वर 
जे जागवतात 
काही वेड्या आठवणी 
पण त्यांच्या कविता 
नाही होत .

तो असतो
नुसताच नाद 
नुसताच हुंकार
जो थांबवतो श्वास 
अन
अपुर्णतेचा विवशतेचा
पराधिनतेचा  निश्वास उमटवून 
हरवतो शुन्यात .

न मागता न बोलावता 
तू आली होतीस 
न सांगता न थांबता 
निघून गेलीस  
तश्याच तुझ्या कविताही 
आता मी त्यांना 
साद घालत नाही 
बोलावत नाही
पण ते वेळूचे स्वर
त्यांनाही थोपवत नाही

*******


ती आपली
एक गोष्ट होती
अन प्रत्येक गोष्टीला 
एक शेवट असतो 
नाहीतर ती गोष्ट 
गोष्ट कशी राहील .
ती रुजते वाढते 
फुलते अन अंती संपते 

पण सरलेली गोष्ट 
मनात घर करून राहते 



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...