गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

सोहं सरोवरी


सोहं सरोवरी
**********

काडसिद्ध पथे गेलो 
सिद्धरामेश्वर घरा 
दत्त निसर्ग भेटला 
उभा जाळ शब्दातला 

वृक्ष भाऊराव तेथे 
चहूबाजू विस्तारला 
मूळ निम्बर्गी ते खोल
रस सोहम ओतला 

गेली निंबाळी कन्हेरी 
प्रेमगंगा ही पावन 
कलकलतो तरंग 
उसळून आहे पण 

नाथ रेवनाचे बीज 
दत्त म्हणे  घे हसून 
मार्ग सारेच नेतात 
त्याचं लक्षी रे ओढून 

काका निकम प्रेमळ 
झाले निमित्त कृपेला 
प्रेमे नेवूनिया हंस
सोहं सरोवरी केला

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .


बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

रूजले बीज

रूजले बीज
*****

रुजले बीज 
भिजले बीज 
आज आले फळाला ॥

केली त्वरा 
देऊन वरा 
मीन बांधला गळाला ॥

बळे आलो 
शिष्य झालो 
मेवा मिळाला भुकेला ॥

पुण्य फळले 
वृक्ष जाहले 
अर्थ कळाला मूढाला ॥

भक्ती नसून 
सेवे वाचून 
मेघ ओळला थोरला ॥

कोण दातार 
कोण घेणार 
स्वार्थ नसल्या कृपेला ॥

खूण विक्रांत 
आली ध्यानात 
मोड फुटला भाग्याला॥

जरी ना मेलो 
परी मिटलो
तपच आले दाराला 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

तुच जाणतोस

तुच जाणतोस 
***********

तूच जाणतोच 
माझा खटाटोप 
मांडलेला व्याप 
प्रेम बळे ॥

तूच जाणतोस 
केलेली प्रार्थना 
गर्जना याचना 
ऐश्या तैश्या ॥

तूच दिली जाण
कळे मूर्खपण 
रडणं भेकणं 
थांबविले ॥

हरक्षणी तूच 
आहे सभोवती 
खुळी द्वैत दृष्टी 
मावळली ॥

आता मी पाण्यात 
भरलेला माठ 
आला गेला भ्रांत 
भीती नाही ॥

मावळल्या चिंता 
भ्रमाचा आकार 
जन्माचा प्रकार 
कळू आला ॥

अवघा उजेड 
जाणवतो अरे
चंद्र सूर्य तारे 
जाणीवेत ॥

विक्रांत फुटका 
देहात भरला 
परंतु सुटला 
दत्त कृपे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

जागव जाणीव

जागव जाणीव 
**********
जागव जाणीव 
माझी दिगंबरा 
मनाला मोहरा 
लावी आता ॥

सदा राहो दत्त 
स्वरूपी जागृत 
वाहत्या पाण्यात 
तळ स्वच्छ ॥

आहे पण माझे
शब्दाच्या वाचून 
रूप हरवून 
मौन व्हावे ॥

विक्रांता कळावा 
दत्त हा आतला 
सहज चालला
जन्म व्हावा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

सक्ती


सक्ती 
**********

बोलतो आपण
तिला 
सक्ती नाही कश्याची
ती तर 
राणी आहे घराची 

ओहोहो 
किती थोर 
आहेत हे विचार 
किती  महान
किती  उदार

होय 
एवढे शिकले सवरले तर  
पडणारच फरक 
दृष्टिकोनात

पण येताच वेळ 
देण्याची घेण्याची 
वारश्याची 

येताच वेळ 
कामाची कष्टाची 
त्रासाची 

अन महत्वाची 
म्हणजे
तथाकथित त्यागाची 

होते ऐसी की तैसी
सार्‍या उदारतेची 
आणि तिलाच
सक्ती होते 
पुन्हा सती जायची


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

सोहम भाव

सोहम भाव
*********

सोहम सोहम 
घोकून घोकून 
सोहम होऊन 
गेले कुणी 

सोहम सोहम 
ऐकून ऐकून 
सोहम रंगून 
गेले कुणी 

सोहम सोहम 
जाणून घेऊन 
सोहम सांगून 
गेले कुणी

सोहम भाव हा . 
हृदयी जागता 
नुरेच  वार्ता 
मरणाची

सोहम भावात 
जाता  हरवून
मुक्त हो जीवन
त्याचे जणू

सोहम ऐकून
स्वामी मुखातून 
गेला हरखून
विक्रांत हा 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

काळाचा काळोख


काळाचा काळोख
**************

काळाचा काळोख 
खोलवर आत
गर्द विवरात 
अथांगसा ॥

तिथे न प्रकाश 
आकार आकाश
गूढ अवकाश 
अनिर्बंध ॥

सारी हालचाल
चाले वरवर 
लाट लाटेवर 
उमटते ॥

फेन बुडबुडे 
लोभस तरंग 
तयावरी रंग 
जीवनाचे ॥

अवघे सुंदर 
अवघे भीषण 
जीवन मरण 
चाललेले॥

अतळ जळाचा 
घेण्या जावा ठाव 
हाती येतो गाव 
क्लेशाचाच ॥

घेई रे हलके
ओंजळीत पाणी
जातसे वाहूनी
अर्धे जरी ॥ 

तेवढेच तुझे
तुजलागी पुरे 
अर्ध्यांलागी अरे 
वाहण्यास ॥

ओंजळीत पाणी
सागरात पाणी 
वेगळी कहाणी 
जीवा नाही॥

विक्रांत क्षणात 
जगतो जागून
गेली हरवून 
काळव्यथा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘  . .



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...